epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

माझे जत्रेतील अनुभव

         माझे जत्रेतील अनुभव 



         हेलावे जनसागर माझ्या अवतीभवती खरे सांग, ही नाना रूपे तुझीच नव्हती? मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना कर्माकर्मातून होती तुझी प्रेरणा

 मंगेश पाडगावकरांच्या या अनुभूतीचा साक्षात्कार केवळ जत्रेतच होत असतो. चंद्रकुमार नलगे यांना 'गावाकडच्या जत्रेत जे अनुभव आले तसे बरेचसे पण त्याहून काही वेगळे अनुभव मला माझ्या गावच्या जत्रेत आले. दसऱ्याच्या नवरात्रात नागपूरला बंगाल्यांच्या देवीजवळ नऊ दिवस जत्रा भरत असते. जत्रा म्हणजे हौस, मौज सर्वांचेच नटाथटायचे दिवस. गोरगरीब जत्रेसाठी आधीपासूनच पैसे साठवतात. मुलं नवेनवे कपडे, घालून जत्रेला येतात. तरुणांना आपला दिमाख दाखवावासा वाटतो. लहानगे नात नातू गर्दीत हरवू नयेत म्हणून आजोबा त्यांना सारखे दटावत, त्यांचा हात घरत, इकडून तिकडे धावपळ करताना दिसतात. 

             देवी शृंगारलेली असते. तिने आपल्या भाल्याने अक्राळविक्राळ राक्षसाला ठार केले आहे. त्याचे लहान मुलांना मोठे कौतुक वाटते. देवी ज्यावर विराजमान झाली आहे त्या वाघाकडे काही लहानगे अगदी कुतुहलानं पाहतात आणि वडीलधाऱ्यांना नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. देवीच्या अंगणात बेलफूल विकत मिळतं. ते घेऊन देवीला वाहताना स्त्रिया अत्यंत भाविकपणे प्रार्थना करतात आणि त्यांचे पाहून लहानगेही देवीला हात जोडतात. अशावेळी आरती चालू असली तर बहुधा कुणीही आरती संपल्याशिवाय जत्रेला जात नाहीत. आरती घेऊन पुजारी माणसांच्या समुद्रात शिरतो. लोक त्याला पुढं सरकूच देत नाहीत. गर्दी एवढी असते की पुजाऱ्याची फक्त पगडीच मागंपुढं होताना दिसते. 

              इथे जत्रेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे तिकीट असलेले प्रदर्शन आणि दुसरा म्हणजे तिकीट नसलेली जत्रा. बहुतेक लोक प्रदर्शन पाहल्यावर जत्रेत जातात. प्रदर्शन हा जत्रेचा प्रतिष्ठित भाग असतो. इथे वेगवेगळी दुकाने असतात. भाव महाग असल्यामुळे दुकानात फारशी गर्दी नसते. पण लहान मुलांच्या खेळणीचा चांगला उठाव होतो कारण तुला देवीच्या प्रदर्शनातून खेळणी घेऊन देईन' असे मुलाला आईवडिलांनी सांगितले असते त्याची आठवण मुल आईवडिलांना वारंवार करुन देत असतात. पाळणे व मेरी गो राऊंडला चांगली गर्दी असते. प्रदर्शनाचा काही भाग पाहल्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, भेळ, पॉपकॉर्न, आइसक्रीम तेथल्या तेथेच टॉवरजवळील जमिनीवर बसून खाण्याचा आनंद अनेक कुटुंब उपभोगताना आढळतात. मुलगा हरवल्यास ध्वनिक्षेपकावरुन हे वृत्त सांगण्यात येते. आपल्या मुलाचे नाव ध्वनिक्षेपकावरुन घेतले जावे म्हणून मुलाला आईजवळ बसवून तो हरवला असल्याचे वृत्त ध्वनिक्षेपक संयोजकाला देतानाही अनेक बाप पाहायला मिळतात. मोठे मजेदार अनुभव येतात. 

          लोक देवीच्या दर्शनापर्यंत मोठ्या श्रद्धेने वागतात. मग मात्र मौज करावी एवढ्याच हेतूने जत्रेत सामील होतात. राजरोसपणे ज्यांना भेटता येत नाही असे तरुण-तरुणी प्रदर्शन हे आपले भेटण्याचे संकेतस्थळ बनवतात. देवीच्या दर्शनाला जाण्याचे निमित्त आणि प्रदर्शनात कुणाबरोबरही बोलण्याची मुभा ही त्यांना पर्वणीच असते. गर्दीचे निमित्त साधून रोडसाईड रोमिओंनी मुलींना धक्के मारू नये यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असते. 

             पण खरी मजा येते विनातिकिटाच्या जत्रेत इथं खाऊची दुकानं असतात आणि गरिबांना ती परवडणारी असतात. फोटोच्या दुकानात सिनेनटीसोबत किंवा विमानात बसून असे फोटो काढून मिळतात. खेड्यातील लोकांना हे फोटो काढण्यात मजा वाटते. बंदुकीच्या गोळीने फुगा फोडणे किंवा एखाद्या वस्तूवर रिंग फेकणे व ती वस्तू मिळवणे अशाही ठिकाणी गर्दी असते. बहुधा प्रत्येक लहान मुलांच्या हाती फुगा असतोच. 

            इथे खरोखरच एक छोटा मुलगा हरवला होता. जोरजोराने रडत होता. त्याला काहीतरी घेऊन द्यावे, त्याचे रडणे थांबवावे व मग त्याला पोलिसांच्या स्वाधीन करावे म्हणून मी त्याचा हात धरला. काय घेऊन देऊ म्हणून विचारले पण तो काहीही घ्यायला तयार नव्हता. त्याला फक्त त्याची आई हवी होती. मला प्रसिद्ध उर्दू लेखकाची कथा आठवून गेली. 

             जत्रेचे अनुभव वेचायला मी बहुधा नऊही दिवस जत्रेला जात असतो. दसऱ्याच्या दिवशी जत्रा संपते. एकदोन दिवसांनी पालं उठतात. नऊ दिवस उडालेले रंग आणि गंध मागे पाळणेवाले, फुगेवाले, शेंगावाले आणि दुकानदार सारेच आपापले सामान गुंडाळून निघून टाकून जातात. दहापंधरा दिवसांनी मी जेव्हा त्या रस्त्यावरून जातो तेव्हा जत्रेतल्या स्मृती जाग्या होतात. उगीच एक अनामिक हुरहुर मनाला स्पर्श करून जाते, जत्रेच्या जागेकडे मी मागे पाहतो आणि तुकोबाची सासुरवाशीण कानात गुणगुणते. वळून

 कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा