epranali

This is educational blog.

Res

Breaking news

भाषण संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाषण संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

जानेवारी १९, २०२२

महात्मा जोतीबा फुले

 महात्मा जोतीबा फुले 




            माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, अखंड अविरतपणे फिरणाऱ्या काळाच्या चक्रावरील एखादे शतक इतके महान असते की,त्या शतकाला एखाद्या युगप्रवर्तक महात्म्याचे स्वप्न पडते आणि ते साकारही होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाला असेच एक स्वप्न पडले आणि ते स्वप्न सत्यातही उतरले. ते स्वप्न केवळ स्वप्नच नव्हते तर ते एक जिवंत चैतन्यच होते. ते चैतन्य म्हणजे दलितांचे व उपेक्षितांचे कैवारी, स्त्रियांचे उद्धारकर्ते 'महात्मा जोतीबा फुले' होय. "सत्याचा पालनवाला । तो धन्य ज्योतिबा झाला । पतितांचा पालनवाला । तो धन्य महात्मा झाला ॥" 

महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी चिमणाबाई व गोविंदराव यांच्या पोटी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी एका सामान्य अशिक्षित माळी कुटुंबात झाला. लहानपणी त्यांच्या जीवनात क्रांतीची ठिणगी पेटविणारा एक प्रसंग घडला. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राचे लग्न होते. आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे जोतीबा त्या लग्नसमारंभात सहभागी झाले. परंतु तेथे क्षुद्र म्हणून त्यांचा अपमान केला व त्यांना मिरवणुकीतून बाहेर काढले. आतापर्यंत आयुष्यात सामान्य ज्योतीप्रमाणे संथपणे तेवत असलेली ही ज्योत अपमानाने विझली नाही तर उलट तिचे क्रांतिज्योतीत रुपांतर झाले. त्यावेळी समाजामध्ये शुद्रातिशुद्रांना मिळणारी वागणूक, स्त्रियांची स्थिती, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती इ. गोष्टीचे जोतीबांनी अवलोकन केले. हजारो वर्षे अमान आणि दारिद्र्याच्या खाईत निद्रिस्त अवस्थेत पडलेल्या दीन-दलितांच्या जीवनामध्ये कायापालट करायचा असा निर्धार ज्योतीबांनी केला.


         शिक्षण हा सर्व सुधारणांचा मूळ पाया आहे हे त्यांनी ओळखले आणि म्हणूनच त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली आणि आणि स्री-शिक्षणाची घंटा घणघण वाजवली. हजारो वर्षाच्या रुढीवर आघात केला तो घंटानाद ऐकून बहुजन समाज खडबडून जागा झाला. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगताते उद्धारी। ही महात्मा फुल्यांची भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचली. फुल्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी त्या शाळेमध्ये स्वत: स्र शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले. ज्योतीबा आणि सावित्रीबाई यांच्या या कार्यामुळे पुण्यातला सर्व वर्ग खवळून उठला. त्यांनी ज्योतीबा आणि सावित्री यांच्या अंगावर दगड, चिखल फेकले. परंतु, आले जरी कष्ट दशा अपार । न टाकिती धैर्य तथापि थोर ।। या न्यायाने ते खचले नाहीत. अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून फुल्यांनी स्वत:पासून परिवर्तनाच्या कृतीला सुरुवात केली. म्हणूनच ज्योतीबा हे केवळ शाब्दिक पंडित नव्हते तर ते एक खंदे कृतिवीर होते   'सत्यशोधक समाजा'च्या माध्यमातून अनिष्ठ रुढींना विरोध करणारे समाजसुधारक होते. त्या काळात ब्रिटिश सरकारकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे ज्योतीबा हे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ व समाजहितचिंतक होते. महात्मा फुले धर्मशास्त्रीमहात्मा फुले धर्मशास्त्री नसतील पण आत्मज्ञानी निश्चितच होते. 'गुलामगिरी', शेतक-यांचा आसूड', 'ब्राह्मणांचे कसब' ही त्यांची साहित्य-संपदा पाहिली की फुल्यांमधील वास्तवाचे प्रखर चित्रण करणारा साहित्यिक आपल्याला समजतो. फुल्यांच्या रुपाने जणू या भूमीवर सत्य अवतरले आणि त्याने असत्याशी झुंज दिली. सत्य हा त्यांचा देव आणि सेवा हा त्यांचा खरा धर्म होता. ज्या समाजाने फुले दांपत्याला शेण, दडग फेकून मारले त्या समाजासाठीच या दांपत्याने ज्ञानफुले, क्रांतिफुले अर्पण केली. समाजसेवेच्या खडतर मार्गावरून चालताना या समाजावर अनंत उपकार केले. आणि या समाजासाठीच स्वत:चे जीवनपुष्प अर्पण केले. 


         आजही या समाजाला अनेक ज्योतीरावांची आणि त्यांनी पेटविलेल्या ज्योतींची आवश्यकता आहे म्हणून शेवटी एवढेच म्हणन. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा . जय हिंद

जानेवारी १९, २०२२

स्वातंत्र्यवीर सावरकर

  स्वातंत्र्यवीर सावरकर 




             माननीय अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, भारतया आधुनिक इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असे महामानव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! 

      जाज्वल्य देशभक्तीबरोबरच प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक वक्तृत्व, तत्वनिष्ठ राजकारण, धर्माभिमान व विज्ञानवादी समाजसुधारक अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले सावरकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. देशासाठी क्रांतीची पताका खांद्यावर घेऊन ब्रिटिशांच्या छातीवर थयथय नाचणार्या या क्रांतिकारकाचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर' गावी झाला. इ.स. १८९८ साली इंग्रजांनी चाफेकर बंधूंना फाशी दिली. चाफेकरांच्या बलिदानाने सावरकरांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, त्यांनी 'मित्रमेळा' ही संघटना स्थापन केली. तिचेच पुढे 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेत रुपांतर झाले. त्यांनी केलेल्या सरकारविरोधी घडामोडीमुळे बॅरिस्टर होऊनही ब्रिटिश सरकारने त्यांना पदवी देण्याचे नाकारले. देशसेवेपुढे पदवीचे भेंडोळे त्याज्य मानून बॅरिस्टर झालेला हा माणूस देशाला स्वातंत्र्याकडे नेणारी पायवाट तडवत राहिला. 


        परदेशातून भारतीय क्रांतिवीरांना पिस्तुले आणि शस्त्रास्त्रांची माहिती पुरविण्याचे काम सावरकरांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय सहभागामुळे इंग्रज सरकारने त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावली. बंदिवासातल्या अंधाऱ्या भिंतीवरही आपल्या प्रतिभेच्या प्रकाशाने महाकाव्य रेखाटणारा एकमेव महाकवी म्हणजे सावरकर होय! 



 

       सावरकरांनी लिहिलेले '१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'सहा सोनेरी पाने', 'माझी जन्मठेप' हे ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यविश्वाला मिळालेली महान देणगीच आहे. सावरकरांचे ''ने मजसी परत मातृभूमीला' हे आर्त गीत व 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र आजही प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची प्रेरणा देत आहे. धार्मिक बाबींना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणारे सावरकर हे एक द्रष्टे समाजसुधारक होते. अशाप्रकारे सावरकरांचे चरित्र म्हणजे इतिहासातील एक दीपस्तंभ आहे. 


जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

पंडित जवाहरलाल नेहरू

  पंडित जवाहरलाल नेहरू 




     माननीय अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, जगाच्या पाठीवर फारच थोड्या नेत्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान लाभला. त्यातीलच एक महान नेतृत्व म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होय. पंडित नेहरूचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांन लहान मुले फार आवडत. मुले त्यांना आदराने 'चाचा नेहरू' म्हणत. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आज भारतभर 'बालदिन म्हणून साजरा केला जातो. 

             बालपण अतिशय अलिशान श्रीमंतीत व शिक्षण पाश्चात्य वातावरणात होऊनही त्यांच्या निष्ठा मात्र सदैव भारतभूमीशी बांधील राहिल्या. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी गांधीजींचे नेतृत्व त्यांनी मान्य केले होते. 


          देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी केलेल्या सर्व चळवळींमध्ये नेहरू सक्रीय होते. उत्तर प्रदेशातील किसान सभेचे अध्यक्ष असताना ते ग्रामीण भागात फिरले. सामान्य माणसांमध्ये सामान्य बनून राहिले. गरिबांच्या व्यथा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आणि देशाचे दारिद्र्य दूर करून जनतेचा विकास करणे हेच आपले परम कर्तव्य मानले. १९४७ साली देशाच्या हाती असलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी भारताचा हा पहिला पंतप्रधान अविरतपणे प्रयत्न करीत राहिला तब्बल सतरा वर्षे पंतप्रधान म्हणून भारताच्या पुनर्निर्माणाचा ध्यास त्यांनी घेतला. देशाचे दारिद्र्य दूर करून जलद आर्थिक विकास साधण्यासाठी नियोजनाचा नवा मूलमंत्र त्यांनी देशाला दिला. पंचवार्षिक योजना ही त्यांचीच देणगी आहे. औद्योगिक, वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे बीजारोपण भारतभूमीवर करण्याचे महान कार्य नेहरूंनी केले. राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहून देशामध्ये धर्मनिरपेक्ष शासन प्रस्थापित व्हावे असा आग्रह नेहरूंनी सुरुवातीपासूनच धरला होता.

एकूणच पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर भारताने फिनिक्स पक्षाप्रमाणे जी उंच भरारी घेतली त्यामागे पंडित नेहरूंचा महत्त्वाचा वाटा होता. स्वतंत्र भारताची उभारणी करत जगातील इतर राष्ट्रांनाही असतानाच गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी शांतता, सांमजस्य, विचार विनिमय या मार्गाचा अवलंब केला. नेहरूंनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. मानवाची प्रतिष्ठा राखली जाऊन प्रत्येकजण भयमुक्त व स्वयंपूर्ण झाला पाहिजे म्हणून त्यांनी समाजवादाचाही पुरस्कार केला. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर निर्माण झालेला असंतोष मिटविण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न सुरू केले.


            संपूर्ण जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिला. 'पंचशील त्त्वांसारखी' मौल्यवान देणगी नेहरुंनी जगाला बहाल केली म्हणूनच जागतिक शांतिदूत म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखत होते. जय हिंद

जानेवारी १९, २०२२

शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील

 शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील 





              माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, दीन-दलितांच्यासाठी ज्ञानदीप लावीला पंखफुट्या पाखरांसाठी वटवृक्ष रोवीला । महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात अज्ञानाचा अंध:कार पसरलेला होता. दीन-दलित बहुजन समाज अज्ञानाच्या खोल गर्तेत रुतत चालला होता. 

           अशा या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी एक तेजस्वी ज्ञानसूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवला. त्या ज्ञानसूर्याचे नाव होते कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर अण्णांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ रोजी निसर्गरम्य कुंभोज या गावी झाला व तेथेच त्यांचे बालपण हळूहळू हरवू लागले. कुंभोज गावी जन्मलेला हा बाळ पुढे ज्ञानाचे कुंभ घेऊन सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात फिरू लागला. 

          त्याच्या कार्याने सारा महाराष्ट्र दिपून गेला. लहानपणी एकदा त्यांच्या अस्पृश्य मित्रांना विहिरीवर पिण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून भाऊरावांनी त्या विहिरीवरील पाणी ओढण्याचा रहाट विहिरीत ढकलून दिला. आणि येथूनच त्यांच्या समाजक्रांतीच्या कार्याला सुरुवात झाली. छ. शाहू, फुले व आंबेडकर या त्रिसुत्रीतूनच भाऊरावांच्या मनामध्ये समाजसेवेचे बिजारोपण झाले. 

          दुधगाव येथे 'दुधगाव विद्यार्थी शिक्षण संस्था' ही छोटीशी संस्था काढून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून अस्पृश्यांसाठी बंद असलेली ज्ञानाची कवाडे खुली केली. त्यांनी सुरू केलेल्या शालेत, वसतिगृहात सर्व जाती-जमातीच्या मुलांना प्रवेश होता.

          यातूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समतेचा धडा रुजवण्याचं काम अण्णांनी केलं. एकदा एक व्यक्ती अण्णांकडे आली व म्हणाली, 'तुम्ही मागाल तेवढे पैसे मी तुम्हाला देतो फक्त तुम्ही साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजचे नाव बदलून त्या कॉलेजला माझे नाव द्या.' त्या इसमाला अण्णांनी सडेतोड उत्तर दिले. "एकवेळ मी माझ्या बापाचे नाव बदलीन पण या कॉलेजला दिलेले छत्रपतींचे नाव बदलणार नाही." यावरून अण्णांची तत्त्वनिष्ठा आपल्या लक्षात येते. 

         भाऊरावांनी माणसातील अस्मिता जागी केली, अज्ञान हेच बहुजनांच्या झोपडीतील दारिद्र्याचे कारण आहे हे ओळखून त्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. अठरापगह जातीच्या मुलांना एकत्र आणून ज्ञानाची बाग फुलवली. कर्मवीरांनी साताऱ्यात लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरविला.  

          कर्मवीर अण्णा केवळ शिक्षण महर्षीच नव्हते, तर ते एक थोर गुरू होते. बॅरिस्टर पी.जी. पाटील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम अण्णांनी केले. माधुकरी मागून खाणे व शिक्षण घेणे त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र आपल्या विद्यार्थ्यांना दिला. 

          समाजसेवा करताना स्वत:च्या संसाराची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. अज्ञानरुपी गर्तेत रुतत चाललेल्या बहुजन समाजाला ज्ञानगंगेच्या तीरावर आणण्यासाठी आपल्या आयुष्याची गंगा त्यांनी खर्च केली. अशा या महान तपस्वी शिक्षण महर्षीना आणि त्यांच्या दिव्य कार्यकर्तृत्वाला शतशः प्रणाम! 

           जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

  युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज





            माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, महाराष्ट्रातील विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून, महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्य उगवलाच नव्हता. महाराष्ट्राची भूमी ३०० वर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशा वेळी शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य स्थापन' करून महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय निर्माण केला.

               युगपुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील 'शिवनेरी' किल्ल्यावर १९ फेब्रुवारी, १६३० रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्काराचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला.                      जिजाबाईंनी शिवबांना लहानपणी रामायण, महाभारतातील शूरांच्या कथा सांगितल्या म्हणूनच स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर 'शिवभारत' घडले. आजच्या मातांनी आपल्या मुलांना हे 'शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉ. कलामांच्या स्वप्नातील 'व्हिजन भारत' साकार झाल्याशिवाय राहणार नाही. 

            वयाच्या सोळाव्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्ष ठेऊन, आपल्या तरुण मित्रांच्या सोबतीने 'स्वराज्याची शपथ घेतली. अत्यंत कमी वयात शिवबांनी हे अग्निदिव्य हाती घेण्याचे धाडस केले आणि ते पूर्णत्वासही नेले. 

          त्यासाठी त्यांनी पुणे, सुपे, मावळ यांसारख्या प्रांतात स्वत: फिरून लोकांची परिस्थिती, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये स्वधर्म आणि स्वराज्य याबद्दल आस्था निर्माण केली. एक कवी म्हणतो, 'माणसांना अस्मितेचे भान यावे लागते. पायचाटू श्वापदांची इन्सान व्हावे लागते!' या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील माणसांना स्वत:च्या अस्मितेचे भान करून देण्याचे काम शिवरायांनी केले. 

         त्यामुळेच इथल्या माणसांना स्वराज्याचे महत्त्व पटले आणि त्यातूनच तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर, नेताजी पालकर यांसारखी अनेक तरुण मंडळी शिवबांभोवती जमा झाली आणि याच मावळ्यांनी पुढे स्वराज्याचा गोवर्धन स्वत:च्या हातावर पेलला.                 रणांगणावर योद्धा लढत नसतो, त्याचे हात किंवा हातातील समशेर ही लढत नसते, लढत असते ते फक्त त्याचे मन! शिवरायांनी हीच लढणारी मनं घडविण्याचे महान कार्य केले. परकीयांशी लढण्याअगोदर त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून स्वराज्याची पायवाट मोकळी केली.                अफजलखानाचा प्रतापगडावर   वध करून स्वराज्यावरील पहिले मोठे संकट शिवरायांनी सहज धुळीस मिळवले. पन्हाळा गडावरून केलेली सुटका आणि शाहिस्तेखानाची केलेली फटफजिती यातून शिवाजींनी स्वत:ची आणि आपल्या सहकारी मावळ्यांची योजनाबद्धता काळालाही सिद्ध करून दाखविलि.

            औरंगजेब बादशहाच्या कैदेतून अद्भूत सुटका करून घेऊन संपूर्ण भारतवर्षाला हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली. या आणि अशा अनेक संकटांनी सामना करत-करत शिवरायांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व देदीप्यमान बनत गेले.

            शिवरायांनी उभे केलेले स्वराज्य कुणा एकट्या-दुकट्याचे नव्हते तर, ते संपूर्ण रयतेचे होते. स्वराज्यात सर्व जातिधर्मातील माणसांना स्थान होते. भ्रामक- भोळ्या समजुती आणि परंपरांचे मात्र तिथे उच्चाटन होते आणि म्हणूनच ते स्वराज्य म्हणजे एक प्रकारचे समाजपरिवर्तनच होते. 

            समाजपरिवर्तनाच्या पायावर उभे असलेले हे राज्य न्यायाचे, नीतीचे, जनतेच्या कल्याणाचे राज्य होते. आणि असे राज्य उभे करणारे शिवछत्रपती हे 'रयतेचे राजे' होते. 

             जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

श्री छत्रपती शाहू महाराज

         श्री छत्रपती शाहू महाराज 




           माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो. गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे तेवत राहणारा एक नंदादीप, अठरापगड जातीच्या माणसांना एकाच पंक्तीला बसवून जेवू घालणारा महामानव रंजल्यागांजल्यांच्या शिरावर मायेचं छत्र उभं करणारा एकमेव छत्रपती, कोल्हापूर संस्थानातील रयत, त्या रयतेतील माणसं, त्या माणसांची मनं आणि मनावर अधिराज्य गाजवणारा रयतराजा म्हणजे लोकराजा शाहू महाराज होय. 

            मानसशास्त्र सांगते व्यक्तीमध्ये गुण हे अनुवंशाने येतात. इतिहासामध्ये बऱ्याच वेळा राजाचाच मुलगा राजा होतो पण याला काही असामान्य अपवाद असतात हे इतिहासाने मान्य कैले आहे. सतराव्या शतकात, वयाच्या १६ व्या वर्षी हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी हे शहाजी भोसले या सरदाराचे सुपुत्र होते आणि १९ व्या शतकामध्ये कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण करणारे छ. शाहू हे जयसिंगराव घाटगे या सरदाराचे सुपुत्र होते.

            राजा हा जन्माला येत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. "झाले बहू, होतील बहू! आहेतही बहू, परि यासम हा " वयाच्या २० व्या वर्षी सत्ता, संपत्ती, वैभव हाती आलेलं असताना त्या मोहपाशात गुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला हे खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या मातीचे सद्भाग्यच समजावे लागेल. हातात आलेला राजदंड वापरून शाहू महाराजांनी सर्वप्रथम वर्णभेदाची उतरंड उद्ध्वस्त केली. 

          या भूमीवर संतांनीउभी केलेली समतेची पताका शाहूंनी स्वत:च्या खांद्यावर पेलली. अस्पृश्यता, जातीय विषमता याविरुद्ध शाहूंनी रणशिंग फुंकले, परिणामी बहुजन समाज जागा झाला. कोल्हापूरमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचे कार्य छत्रपती शाहूंनी केले. सार्वजनिक नळ आणि खानावळी दलितांसाठी खुल्या केल्या. 

           स्त्रियांच्या कल्याणासाठी विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंधक व घटस्फोट विरोधी कायदे छ. शाहूंनी केले. तसेच सहकारी नियोजनाचा कायदा व सहकारी सोसायट्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दाढेतून सुटका व्हावी म्हणून राधानगरी धरणं बांधले. 

            या सगळ्या सुधारणांचा विचार केला तर शाहू महाराजांच्या रुपाने कोल्हापूरला परिवर्तनाच्या  वाटेने नेणारा प्रवासी भेटला असेल म्हणावे लागेल. शाहू महाराजांनी आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली एवढंच नाही तर कर्मवीर भाऊरावांच्या मनात शिक्षण प्रसाराची बिजे शाहू महाराजांच्या सहवासातूनच पेरली गेली. 

            म. फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी आपल्या विधवा सुनेला इंदुमतीला प्रथम साक्षर केले आणि नंतर स्री शिक्षणास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर सरकारने घटनेनुसार अस्पृश्यांसाठी नोकरीमध्ये राखीव जागा ठेवण्याची तरतूद केली. हीच तरतूद शाहूंनी स्वातंत्र्यापूर्वी आपल्या राज्यात लागू केली होती. १९१७ साली शाहूंनी कोल्हापुरात सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू केले होते.                       यावरून छत्रपती शाहूंच्या प्रदीर्घ दूरदृष्टीची आणि आधुनिकतेची कल्पना येते. अशा प्रकारे शाहू महाराज हे महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचा पाया घालणारे विचारवंत होते. परिवर्तनाची सुरुवात स्वत: पासून करणारे कृतिवंत होते. 

             महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे अग्रदूत होते. शाहू महाराजांच्या रुपाने महान राजातला माणूस आणि माणसांचा महान राजा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला द्रष्टा समाजसुधारक पाहायला मिळाला. 

           अठरापगड जातीच्या माणसांना आपल्या अंगा-खांद्यावर घेऊन परिवर्तनाच्या वाटेने विकास साध्य करत चाललेले छ. शाहू पाहिले की, संत मेळ्यासह उभ्या असलेल्या लेकुरवाळ्या विठ्ठलाची आठवण होते आणि ओठांतून शब्द बाहेर येतात.  धन्य धन्य तू शाहूराया, 

            जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

लालबहादूर शास्त्री

              लालबहादूर शास्त्री 




                माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, अवध्या १९ महिन्यांच्या पंतप्रधापदाच्या कारकिर्दीमध्ये देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कणखर व कर्मयोगी पंतप्रधान म्हणजे लाल बहादूर शास्त्री होय. शास्त्रीजींचा जन्म गरीब कुटुंबात २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. शास्त्रीजी दीड वर्षांचे, असतानाच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांना परिस्थितीचे चटके सोसावे लागले. मामाच्या गावी राहूनच त्यांनी आपले प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केले. 
            त्यावेळी गांधीजींची असहकार चळवळ सुरू झाली होती. गांधीजींच्या विचारसरणीने प्रेरित होऊन शास्त्रीजींनी शालेय जीवनातच असहकार चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्णच राहिले. ललितादेवी यांच्याशी १९२७ साली शास्त्रीजींचा विवाह झाला.                             स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनात शास्रीजींनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. एकदा शास्रीजी तुरुंगात होते, घरी त्यांची मुलगी आजारी असल्याचे पत्र त्यांना आले तेव्हा तुरुंगात परत येण्याच्या अटीवर मला सोडावे अशी विनंती शास्त्रीजींनी तुरुंग अधिकाऱ्याला केली. 
            एक कागद शास्त्रीजींच्या हातात देत तुरुंग अधिकारी म्हणाले, "आपणास पॅरोलवर सोडण्यात येईल, पण कोणत्याच राजकीय कार्यात भाग घेणार नाही, असे या कागदावर लिहून देत असाल तरच." शास्त्रीजींनी तो कागद फाडतच त्या तुरुंग अधिकाऱ्यांना म्हणाले, "देशांतला कायदा पाळणे मला माहिती आहे पण गुलामाप्रमाणे लिहून देऊन सुटका करून घेणे मला मान्य नाही." शास्त्रीजींच्या तत्वनिष्ठेवर विश्वास असल्याने लिहून न घेताच पंधरा दिवसांसाठी घरी जाण्याची परवानगी तुरुंग अधिकाऱ्याने त्यांना दिली. पण दुर्दैवाने शास्त्रीजी घरी जाण्यापूर्वीच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. शास्त्रीजींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले व लगेचच तुरुंगात परतले. 
             एवढा प्रचंड नैतिकतेचा आदर्श शास्त्रीजीच्या जीवनपटातून आपणास मिळतो. १९५२ साली नेहरूंच्या मंत्रीमंडळात ते रेल्वेमंत्री झाले. रेल्वेमंत्री असताना सामान्य प्रवाशांच्या समस्या समजावून घेण्यासाठी ते स्वतः रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करत. रेल्वे मंत्री असताना झालेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी आपल्या रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
            लालबहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदाच्या काळातच १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. तेव्हा राष्ट्रीय नेते म्हणून खंबीरपणे प्रतिकाराचे आदेश त्यांनी दिले. 'जय जवान, जय किसान' अशी प्रेरणादायी घोषणा देऊन संपूर्ण भारतामध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित केली. त्या युद्धात भारताने विजयही मिळवला. १० जानेवारी १९६६ मध्ये शांततेच्या करारासाठी ते ताश्कंद येथे गेले असताना शास्त्रीजींचा अनपेक्षित मृत्यू झाला आणि आपला देश एका निस्वार्थी राष्ट्र सेवकाला मुकला.
              अखंह आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी बांधील राहून निस्वार्थी भावनेने राष्ट्राची सेवा करणाऱ्या या 'निष्काम कर्मयोग्या'च्या देदीप्यमान कर्तृत्वापुढे आजही सारा देश नतमस्तक होतो! “थोर तुमच्या चारित्र्याची उंची गर्व तुमच्या तत्वनिष्ठेचा करावा, वर्तमानातल्या नेतृत्वान राजमार्ग त्या पावलांचा धरावा. जय हिंद!
जानेवारी १९, २०२२

राजीव गांधी

                      राजीव गांधी 





             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, म. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी प्रजासत्ताक गणराज्य स्थापून देशाला प्रगतीच्या वाटेवर आणून सोडले. त्यांच्यानंतर हे कार्य इंदिरा गांधी यांनी समर्थपणे स्वत:च्या खांद्यावर पेलले. 

           इंदिराजींच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांनी राष्ट्रविकासाचे हे स्वप्न उराशी बाळगून देशाला खऱ्या अर्थाने २१ व्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याइतपत सबळ व सक्षम केले. २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबई येथे राजीव गांधी यांचा जन्म झाला. घरातील स्वातंत्र्यलढ्याचे, राजकारणाचे वातावरण राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी पोषक ठरले. 

        लंडनमध्ये उच्च शिक्षणपूर्ण केल्यानंतर त्यांनी हैद्राबाद येथे विमान पायलटचे ट्रेनिंग घेतले. विमान चालवण्यात त्यांना अधिक रस होता. बंधू संजय गांधींच्या निधनानंतर काँग्रेसचे महासचिवपद राजीव गांधीनी स्वीकारावे असे अनेक काँग्रेस सदस्यांचे मत होते.त्यांना राजकारणात आवड नसल्याने शेवटी इंदिराजींना मदत करण्याच्या उद्देशाने मे १९८१ मध्ये त्यांनी काँग्रेसचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. जून १९८९ च्या निवडणूकीत ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. 

        लोकांना त्यांच्या तत्पर व उमद्या नेतृत्वाची, जाणीव झाली आणि येथूनच युवकांचे प्रेरणास्थान ठरलेल्या या नेतृत्वाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. संसद सदस्य म्हणून शेतकरी, युवक, पर्यावरण संतुलन, गंगा शुद्धीकरण शैक्षणिक सुधारणा यासारख्या धटकांचा अभ्यास करत त्यांनी स्वत:ला पूर्णपणे राजकारणात झोकून दिले. 

         इंदिराजींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधींनी समर्थपणे पेलली. इंदिराजींच्या मृत्यूनंतर देशात निर्माण झालेली दंगल शमवून प्रतिकूल परिस्थितीतून देशाला योग्य दिशा देण्याचे काम अवघ्या चाळीस वर्षाच्या या युवा नेत्याने केले. "२१ व्या शतकात प्रवेश करणाच्या सक्षम भारताची बांधणी करण्यासाठी सर्व भारतीयांनी सहकार्य करावे."असे आवाहन केले.

        राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवून धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार साऱ्या भारतीयांनी करावा असा त्यांचा आग्रह होता. देशातील दारिद्र्य दूर करून गरिबांचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिक्षण, आरोग्य  यासारख्या मुलभूत सुविधांना त्यांनी विकास आराखड्यात अग्रक्रम दिला. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देऊन जगामध्ये भारताची मान उंचावली. 

          १९८५ मध्ये बांगलादेशात झालेल्या वादळानंतर वादळग्रस्तांना भेट देण्यासाठी राजीव गांधी बांगलादेशात गेले होते. तसेच श्रीलंकेतील तामिळ लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लंकेलाही भेट दिली. सर्व जगात शांतता प्रस्थापित व्हावी व संपूर्ण जग एक कुटुंब व्हावं अशी त्यांची भावना होती. उत्तमसंघटन कौशल्य, समस्या सोडविण्यात हातखंडा, नाविन्यपूर्ण विचार, तत्पर कृती, जबाबदारीची जाणीव, कर्तव्याची कास यासारखे अनेक गुण या चैतन्यशील नेतृत्वाच्या ठायी होते. 

          २१ में १९९१ या दिवशी पेरांबुर (मद्रास) येथे होणाऱ्या प्रचारसभेसाठी राजीव गांधी गेले होते. सभेसाठी व्यासपीठावर जाण्यापूर्वीच झालेल्या बॉम्बस्फोटात राजीवजींचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारताच्या राजकीय क्षितीजावर कर्तृत्वाच्या देदीप्यमान प्रकाशाने तळपणारा तेजस्वी तारा अनंतात विलीन झाला. अत्यल्प काळामध्येसुद्धा या देशाला अनोखा प्रकाश व आगळी-वेगळी दिशा देऊन गेला. 

           जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

नेताजी सुभाषचंद्र बोस

           नेताजी सुभाषचंद्र बोस 





                माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, सातासमुद्राच्या पलिकडून आलेल्या मूठ भर इंग्रजांनी भारत देशावर दीडशे वर्षे राज्य केले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाची मुक्तता करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी प्रयत्न केले त्या देशभक्तांच्या नामावलीत 'सुभाषचंद्र बोस' हे नाव अग्रगण्य ठिकाणी असल्याचे जाणवते. कटक येथे इ.स. २३ जानेवारी १८९७ रोजी नेताजींचा जन्म झाला. बालपणापासूनच अगाध बुद्धिमत्ता, धैर्य, जिद्द, सदाचार, सुधारणावादी दृष्टिकोन, मातृभूमीविषयी प्रेम इ. गुण त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे तेजस्विता, तत्परता व तपस्विता यांचा त्रिवेणी संगम असलेले व्यक्तिमत्व होते. 

             महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांच्या वडिलांच्या इच्छेखातर आय.सी.एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. १९२० साली ते चौथ्या क्रमांकाने आय.सी.एस. परीक्षा पास झाले. १९२१ मध्ये ते भारतात परतले तेव्हा त्यांचे वय होते अवघे तेवीस वर्षे. अत्यंत कमी वयात आय.सी.एस. परीक्षा पास झाल्याने सरकारच्या सनदी सेवेतील उच्चपदस्थ नोकरी त्यांच्या घरी चालून आली होती. परंतु भारतीयांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या पदरी नोकरी करण्यापेक्षा 'माझ्या भारतभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीन' असा निर्धार या तेजस्वी राष्ट्रवीराने केला. 

           संपत्ती, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सनदीनोकरीला लाथ मारून हा तरुण राष्ट्रसेवेची वाट चालू लागला. या वाटचालीत त्यांना आठ वेळा तुरुंगवास झाला. इ.स. १९३८ व १९३९ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद सुभाषबाबूंनी भूषविले. राष्ट्रीय काँग्रेसमधील मवाळ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी 'फॉरवर्ड ब्लॉक' हा स्वतंत्र पक्ष काढला. सन १९४९ मध्ये ते भारतातून गुप्तपणे जर्मनीला गेले. तेथे जपान, ब्रह्मदेश, मलेशिया या देशांच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. 

            आझाद हिंद सेना उभारून 'चलो दिल्ली, जयहिंद' अशा घोषणा दिल्या. आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन करून त्याद्वारे आझाद हिंद सेनेच्या कार्याची माहिती जनतेला देत लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. जपानच्या मदतीने १९४३ मध्ये त्यांनी ब्रिटिश मित्रराष्ट्राविरुद्ध सशस्त्र संघर्षाची घोषणा केली. आझाद हिंद सेनेने आपल्या तुटपुंज्या बळाने कडवी  झुंज दिली. पुढे दोस्त राष्ट्रांकडून जपानचा पराभव झाला. 

           जपानकडून मदत मिळेनाशी झाली आणि आझाद हिंद सेनेचाही पराभव झाला. परदेशात जावून इंग्लंड, अमेरिका यासारख्या बलाढ्य सत्तांशी त्यांच्याच शत्रूंची मदत घेऊन नेताजींनी केलेला संघर्ष असामान्य होता. त्यांचे कार्य जरी असफल झाले तरी त्यांच्या ज्वलंत क्रांतिकारी विचारांनी अनेकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. 

            १८ ऑगस्ट १९४५ मध्ये एका विमान अपघात नेताजींचा दुर्दैवी अंत झाला. स्वातंत्र्यासाठी धगधगणारी एक तेजस्वी क्रांतीज्वाला शांत झाली. अखेरच्या श्वासापर्यंत हा स्वातंत्र्य सेनानी भारत मातेच्या स्वातंत्र्याची काळजी वाहत राहिला. त्यांच्या त्या अतुलनीय शौर्याला त्रिवार अभिवादन! 

              जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

राष्ट्रपिता महात्मा गांधी

              राष्ट्रपिता महात्मा गांधी 





               माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, 'रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?' असे एका कवीने म्हटले आहे. 

         भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये रणाशिवाय विनयशील मार्गाने झालेला एक लढा अग्रगण्य ठिकाणी होता. तो लढा होता 'अहिंसा व सत्याग्रहाचा' आणि त्या लढ्याचे नेते होते राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी हे एकअलौकिक व्यक्तिमत्त्व होते. 


           त्यांचे सारे जीवनच प्रार्थनेप्रमाणे मंगल आणि पवित्र होते. सत्य व अहिंसा हा त्यांच्या जीवनाचा पाया होता. असीम त्यागाने भारलेल्या त्यांच्या जीवनाला तत्त्वाचे अधिष्ठान होते. सत्य हा गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. सत्याचे दुसरे नावच गांधीजी होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही

आफ्रिकेतील संघर्षापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनकार्याला सुरूवात झाली. आफ्रिकेतील संघर्ष हा केवळ हक्कांसाठी दिलेला लढा नसून सापेक्ष सत्याच्या जतनासाठी त्यांनी केलेला हा पहिला सत्याग्रहच होता. परदेशातून ' भारतात आल्यावर गांधीजींनी आपल्या मातृभूमीची व्यथा पाहिली. 


           आपल्या देशबांधवांची परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिली. या मातृभूमीच्या मुक्तीसाठी आणि इथल्या रंजल्या गांजल्या माणसांसाठी स्वत:चं आयुष्य समर्पित करणे हेच आपले जीवितकार्य मानले.


           युरोपातून भारतात आल्यावर आपल्या अंगावरील वकिलीची पोषाख खाली उतरवून शिक्षणाची झापडं झटकून टाकून दिली आणि हा महान योद्धा समाजसेवेसाठी तयार झाला ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, परंतु या संघर्षासाठी कोणतेही शस्त्र हाती न घेता, त्यांनी अहिंसा व सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला. 


           बाडौंलीतील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला. १९२० साली देशव्यापी असहकार आंदोलन उभे केले. आंदोलनाला हिंसक वळण लागताच ते आंदोलन थांबवणारा हा महामानव आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी बांधील राहिला. 


           साबरमती ते दांडी हे अंतर पायी चालत जाऊन त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. इ.स. १९४२ साली सुरू झालेल्या आंदोलनात त्यांनी 'करेंगे या मरेंगे' हा संदेश दिला. इंग्रजांना 'चलेजाव' असे ठणकावून सांगणाऱ्या गांधीजींनीच १९४२ चे आंदोलन तीव्र केले. 


           १५ ऑगस्ट १९४७ रोजी अनेक देशभक्तांच्या त्यागातून स्वातंत्र्याचं महान मंदिर उभं राहिलं. हे मंदिर उभे राहण्यामागे   गांधीजींच्यासारख्या महामानवाचा सिंहाचा वाटा आहे हे इतिहासाला कदापि नाकारता येणार नाही. 


          स्वातंत्र्यानंतर कोणतेही पद न स्वीकारता त्यांनी गरीब जनतेची निस्सीम सेवा केली आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ते देशाचे राष्ट्रपिता व महात्मा ठरले. जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 




              माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शोषितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या अंधारमय जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटविणारा प्रकाशसूर्य, स्वत:च्या विद्वत्तेचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणारा विद्वान, समाजसुधारक आणि स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणजेच शोषितांचे मुक्तिदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत. 

             डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. आंबेडकरांचे शालेय शिक्षण रत्नागिरी, सातारा, मुंबई येथे झाले. त्यांनी आपले उच्च शिक्षण परदेशात पूर्ण केले. त्यानंतर हिंदुस्थानातील त्यांच्या व्यावसायिक व शैक्षणिक जीवनात त्यांची सर्वांकडून 'अस्पृश्य' म्हणून मानहानी झाली आणि तेथूनच त्यांनी 'अस्पृश्योद्धार' हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरविले. समाजसुधारक महात्मा फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श मानले. 

      लोकहितवादीसारख्या समाजधुरिणांनी सुरू केलेली समाजसुधारणेची चळवळ भारतातल्या शोषितांच्या वस्तीपर्यंत नेण्याचे महान काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश त्यांनी आपल्या बांधवांना दिला आणि त्यातून दलितोद्वाराला प्रारंभ झाला. अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या आणि दलितांच्या कपाळी गुलामगिरीचा शिक्का मारणाऱ्या मनुस्मृती चे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. 

              महाडच्या चवदार तळ्यावर दलितांना। पाणी भरण्याचा हक्क मिळावा म्हणून डॉ. आंबेडकरांनी सत्याग्रह केला. समाजाने । धिक्कारलेल्या गावकुसाबाहेरच्या जगण्याला माणूसपण देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 'मूकनायक' व 'बहिष्कृत भारत' यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या माध्यमातून आपले विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये जागृती करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 

           अशा प्रकारे वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीतून शोषित समाजाची मुक्तता करण्याचे काम त्यांनी केले. स्वत:च्या असामान्य कर्तृत्वाने काळाच्या वाटेवर तेजाची दमदार पावले उमटविणारा हा तपस्वी ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. 

जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 





             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, ग्रीक देशातील प्लेटोया विचारवंताचे म्हणणे असे होते की, "तत्वचिंतक शासनकतें व्हावेत." प्लेटोचा हा विचार ज्यांच्या रुपाने भारतामध्ये साक्षात उतरला ते थोर तत्वचिंतक म्हणजे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होय. ५ सप्टेंबर १८८८ रोजी, तिरुत्तणी (आंध्रप्रदेश) येथे राधाकृष्णन जन्म झाला. म्रदास येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास विद्यापीठातच त्यानी अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्यानंतर म्हैसूर विद्यापीठातही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. 

                   त्यानंतर कलकत्ता विद्यापीठामधे अध्यापनासाठी त्यांना सन्मानपूर्वक बोलविण्यात आले. अशा तऱ्हेने उत्तम प्राध्यापक, थोर विचारवंत, तत्वज्ञ, उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. यांचा भारताबरोबरच परदेशातही या तत्वज्ञाची महती पोहोचली होती आणि म्हणूनच 'ऑक्सफर्ड सारख्या अनेक प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांतून त्यांना व्याख्यानाची व अध्यापनासाठीची निमंत्रणे येऊ लागली. विविध विषयांवर परदेशात व्याख्याने देत असताना, भारतीय तत्वज्ञानावरील समर्पक विश्लेषणाने त्यांनी पाश्चात्यांची मने जिंकली. 

                      स्वामी विवेकानंदाच्या नंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार सातासमुद्रापलीकडे नेण्याचे काम या ऋषितुल्य शिक्षकाने केले. भारतीय तत्वज्ञान', 'महात्मा गांधी', 'गौतम बुद्ध', 'भारत आणि चीन"यासारख्या अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. १९३१ साली ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर बनारस विद्यापीठाचे कुलगुरु व दिल्ली विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांना शासकीय प्रवाहात आणण्याचे काम पंडित नेहरूंनी केले. 

                  राधाकृष्णन यांच्यासारखे कुशाग्र बुद्धिवंत. थोर विचारवंत, ज्ञानसंपन्न तत्वज्ञ शासनात राहिल्यास भारताच्या राजकीय व्यवहाराला तात्विक अधिष्ठान प्राप्त होईल अशी नेहरूंची धारणा होती. १९५२ साली ते भारताचे उपराष्ट्रपती झाले व १९६२ मध्ये भारतातील सर्वोच्च स्थानी 'राष्ट्रपती' म्हणून विराजमान झाले. 

                उच्चविद्याविभूषित तत्त्वज्ञ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अध्यापक, उत्कृष्ट प्रशासक, द्रष्टे विचारवंत, देशाचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांसारख्या अनेक सन्माननीय पदांवर काम करूनही शिक्षण क्षेत्र हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र राहिले आणि  अगदी शेवटपर्यंत त्यांच्यातील शिक्षक सदैव जागा राहिला. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो. अशा या गुरुच्याही 'महागुरु पुढे नतमस्तक होणे हे आपल्यासारख्या ज्ञानसाधकाचे परमकर्तव्यच आहे. 

              जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

डॉ. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन

डॉ. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन 






        माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यांसाठीही प्रकाशवाटा निर्माण करणारी काही माणसे भारत भूमीवर जन्माला आली. अचल ध्येयवाद आणि दीर्घ कर्मवादाने भारावलेले असामान्य माणसांचे जीवन आपल्यासाठी आदर्शवत असते.

          साऱ्या भारत देशातील विद्यार्थी व युवकांसाठी आदर्शाचा दीपस्तंभ ठरावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम होय. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वर येथे एका गरीब मुस्लीम कुटुंबात झाला. वडिलांचा साध्या बोटी बनवण्याचा व्यवसाय होता व भावाचे पानाचे दुकान होते. 

      त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. अशा वेळी कलामांनी जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण चालू ठेवले. सध्या समाजामध्ये सर्व अनुकूल असणाऱ्या घरातील विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रतिकूलतेतून शिकणाऱ्या कलाम साहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. 

      संरक्षण संशोधन क्षेत्रातून १९५८ साली 'डिआरडिओ' या संस्थेतून कलामांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यानंतर 'इस्रो' या संस्थेतून अंतराळ संशोधन कार्य सुरू के. १९८२ मध्ये पुन्हा 'डिआरडिओ मध्ये दाखल होऊन क्षेपणास्त्र विकासाचा नियोजित कार्यक्रम तयार केला.             अमेरिकेने तंत्रज्ञान देणे नाकारल्यावर कलामांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी प्रक्षेपणास्रांची निर्मिती करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या या अथक परिश्रमातूनच पृथ्वी, नाग, आकाश, त्रिशूल, अग्नी इ. प्रक्षेपणास्त्रांची निर्मितीला यश आले. 

     संरक्षण साधनांच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी हा संशोधक अविरतपणे झटला. स्वदेशातच शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाच्या उपयोगाने देशाला स्वावलंबी बनवणारा हा संशोधक यात्री परदेशात शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होणाऱ्या आजच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचा दीपस्तंभच आहे. 

          संशोधन काळात दिल्लीमध्ये राहायला मोठे निवास मिळत असताना देखील कलामांनी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहणेच पसंत केले. हाच शास्त्रज्ञ भारताच्या संरक्षण खात्याचा सल्लागार व त्यानंतर भारताचा राष्ट्रपतीसुद्धा झाले. 

        अनेक नामांकित विद्यापिठाकडुन सन्मानाच्या पदव्या, अँवॉर्डस् कलमांना देण्यात आले आहेत. तसेच भारत सरकारकडून 'पद्मविभूषण' व 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मानही त्यांना बहाल करण्यात आला आहे. परंतु या साऱ्या यशाचे श्रेय डॉ. कलाम स्वत:कडे न घेता संशोधनात मदत करणाऱ्या आपल्या सहकारी यांना देऊन टाकतात. 

      त्यांच्या या मनाच्या मोठेपणातून एकीतून प्रगतीकडे जाण्याचा आणि संघटनात्मक मार्गाने राष्ट्रविकास साधण्याचा आदर्श साऱ्या भारतवासियांपुढे उभा राहतो. राष्ट्रपती पदाचा कालखंड पूर्ण झाल्यावर केवळ 'दोन सुटकेस' हातात घेऊन राष्ट्रपतीभवन सोडणारा हा राष्ट्रपती साऱ्या देशवासियांना जणू आदर्श निष्काम कर्मयोगीच भासला होता. युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत, त्याप्रमाणे विचार करावा व विचारांना कृतीत आणावे. 

          आपली राष्ट्रीय दृष्टी हेच आपले जीवनकार्य आहे असे समजून कार्य करावे हा डॉ. कलामांचा संदेश भारतीय तरुणांनी शिरोधार्य मानून आपले आचरण करावे.

             जय हिंद!


जानेवारी १९, २०२२

प्रियदर्शनी इंदिरा गांधी

 प्रियदर्शनी इंदिरा गांधी




             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, एखाद्या स्त्रीने प्रजासत्ताक गणराज्यातील सर्वोच्च पद प्रदीर्घ काळ समर्थपणे भूषविल्याचा इतिहास जगाच्या पाठीवर फक्त भारत देशामध्ये घडला. हा इतिहास घडविणारी वीरांगना म्हणजे भारतरत्न प्रियदर्शनी इंदिरा गांधी होय. 

             अलाहाबादमधील ऐशवर्यसंपन्न नेहरू घराण्यात १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी इंदिराजींचा जन्म झाला. नेहरू घराणे स्वांतत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असल्याने राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. वडील पंडित नेहरूंच्या सहवासातून इंदिराजींना राजकारणाचे बाळकडू प्राप्त झाले. शालेय जीवनापासूनच त्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेऊ लागल्या.

               स्वातंत्र्याच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी आपल्या बालमित्रांमधून इंदिराजींनी वानरसेना उभी केली होती. वयाच्या २१ व्या वर्षी त्या काँग्रेसच्या सदस्य बनल्या. त्यांचा विवाह १९४२ मध्ये फिरोज गांधी यांच्याशी झाला. 

            देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. याच काळात इंदिरा गांधी आपल्या वडिलांसोबत देश-विदेशात फिरल्या. नेहरूजींच्या उमद्या नेतृत्वाच्या छायेखाली इंदिराजींचे राजकीय व्यक्तिमत्त्व विकसित झाले. १९५९ साली त्या काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. लालबहाद्दुर शास्त्रीच्या मंत्रिमंडळात त्यांनी नभोवणी मंत्री म्हणून काम पाहिले.

            १९६६ साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि देशाला एक तेजस्वी नेतृत्व लाभले. नेहरूंची मूलभूत धोरणे त्यांनी पुढे राबवली. 'गरिबी हटाव' हा उल्लेखनीय प्रयत्न केला. २० कलमी कार्यक्रमाची नवाभिमुख योजना देशाला बहाल केली.

             शेतकरी, कष्टकरी, गरीब, यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले. देशाची अर्थव्यवस्था मजबून करण्यासाठी शेती, उद्योग व शास्त्र यांच्या विकासाला अग्रक्रम दिला. त्यांच्याच काळात देशात हरित क्रांती घडून आली. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रातही देशाने प्रगती केली.                 पृथ्वी, अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती झाली. मानवी विकास साधत असताना निसर्गाचे संतुलनही टिकून राहिले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी जागतिक पर्यावरण परिषदेत मांडली. 

               कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून १९८३ चा युनो लोकसंख्या पुरस्कार त्यांना देण्यात आला. १९७१ मध्ये पाकिस्तानने  भारतावर आक्रमण केले. इंदिराजींच्या प्रेरणेने भारतीय सैनिकांनी दोनच दिवसांत पाकिस्तानचा दारूण पराभव केला. 

               बांगला देशाच्या निर्मितीचे श्रेयदेखील इंदिराजींकडेच जाते. पक्षीय राजकारण, पाकिस्तानचे आक्रमण, पंजाबमधील शिखांचा आतंकवाद, निर्वासितांचा प्रश्न अशा अनक संकटांशी सामना करत त्यांनी देशाच्या प्रगतीची घोडदौड अखंड चालू ठेवली.

               ३१ ऑक्टोबर १९८४ चा दिवस भारतासाठी जणू दुर्दैव घेऊनच उगवला. सकाळी नऊच्या सुमारास इंदिराजींच्या अंगरक्षकानेच त्यांच्यावर गोळीबार केला. रक्षकच भक्षक झाला आणि जागतिक कीर्तीचं महान नेतृत्व शरीराची चाळण होऊन धरणीवर विसावलं. साऱ्या देशाला प्रकाशमान करणारी प्रियदर्शनी जीवनज्योत अनंतात विलीन झाली. 

             जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

माझा आवडता कवी

  माझा आवडता कवी 





माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, वि. दा. सावरकर - विनायक दामोदर सावरकर हे महाराणा प्रतापांप्रमाणे देशाभिमानी देशभक्त होते. छत्रपती शिवरायांप्रमाणे धाडसी, पराक्रमी योद्धे होते. लोकमान्य टिळकांप्रमाणे एक द्रष्टे झुंजार नेते होते. पंडित नेहरूंप्रमाणे वैज्ञानिक दृष्टी असलेले थोर हळवे साहित्यिक होते. आणि आजच्या विषयासंदर्भापुरते बोलताना की सावरकर हे कवी कालिदास भवभूती, रवींद्रनाथ टागोर, शेक्सपीअर, शेले, कीट्स यांच्या तोलामोलाचे जागतिक कीर्तीने महाकवी होते. डॉ. के. ना. वाटवे, डॉ. प्र. न. जोशी, ता. गो. मायदेव यासारख्या थोर काव्यसमीक्षकांचे हे मत आहे. कमला, गोमंतक यांसारखी महाकाव्ये लिहिली म्हणून सावरकर कवी आहेतच; परंतु जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडविणारे उज्ज्वल प्रतिभेचे कवी म्हणूनही सावरकर महाकवी आहेत. सावरकरांच्या काव्यात केशवसुतांचा क्रांतिकारक आदेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवीचे निसर्गप्रेम, माधव ज्युलियनांचा स्वप्नाळूपणा, कुसुमाग्रजांची सात्त्विकता आणि भव्यता प्रतीत होते. 


'हे ताऱ्यांनो जाणतसा का कुठूनही तुम्ही आला? 


कुठे चालला कवण हेतू ह्या असे प्रवासाला!"


किंवा


 'ऐश्वयें भारी । या अशा ऐश्वये भारी,


 महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी??


 दिक्षितिजांचा देदीप्य रथ तुझा सुटता, 


नक्षत्र कणांचा उठे धुराळा परता. '


यांसारख्या कविता कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतांची आठवण करून देतात. 


ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळून तिथे


 मृदू चेतन सोन्याची स्वर्ण चंपक! ही फुले 


किंवा 


'गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली


 स्वतंत्रते भगवती तुंच जी विलसतसे लाली 


यांसारख्या सावरकरांच्या कोमल कल्पना मनावर कुठे तरी हळुवार मोरपीस फिरवून जातात. सावरकर कुटुंब हे धगधगते देशभक्त यज्ञकुंड होते. त्यांची उक्ती, कृती आणि काव्य ही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आहुतीच होती. 


हे काय बंधू असतो जरी सात आम्ही 


त्वत्स्थंडीलात असते दिधले बळी मी ! 


त्वत्स्थंडीली ढकलली गृहवित्तमता, दावानलात वहिनी, नवपुत्र कांता ।


 त्वत्स्थंडीलीच बघ आता ममदेह ठेला ।' 


सावकरांच्या देशभक्तीला जगात तोड नाही. मातृभूमीसाठी त्यांच्या भावना अगदी कोमल हळुवार बनतात. त्यांचे व्याकुळ मन मातृभूसाठी तळमळते, तेव्हा सहजपणे आर्त स्वर निघतात. 


ने मजसी ने परत मातृभूमीला


 सागरा प्राण तळमळला।


कधी कधी सावकरांचे शब्द व्यास-वाल्मीकींच्या सारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात. 


'की घेतले व्रत न आम्ही अंधतेने


 लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने 


जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरीले करी हे सतीचे ।' 


सावरकरांची धाडसी कल्पना सौम्य बनून, बारीक बारीक कलाकुसरही मोठ्या खुबीने करते आणि शब्दांचे आणि अर्थांचे अलंकार घडविते. तानाजींच्या सिंहगडावरील समाधीसंबंधी सावरकर म्हणतात. 


'मग त्या गडची भूमी ठेवी तानाजीस उदरी ।


 तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी ।। सावरकरांची कविता प्रतिभेचा कल्पनाविलास नसून, त्यांचे जीवनच एक उत्तुंग काव्य आहे. पराक्रमाच्या- धाडसांच्या अनेक रोमांचक क्षणांतून त्यांचे जीवन दुःख आणि यातनांच्या महासागराने भरलेले असतानाही, त्यांचे कविमन सुख-दु:खांच्याही पलीकडे जाऊन, 'कमला'सारख्या काव्यात रममाण होते. जगन्नाथाच्या रथाचे, रवींद्रनाथांच्या पुरस्काराचे सहर्ष स्वागत करत, आकांक्षांनी फुलून जाते. ही महानता अवर्णनीय, चिरस्मरणीय आणि वंदनीय आहे. अशा थार मातृभक्ताला मातृभूच्या स्वातंत्र्यदिनी माझे कोटी कोटी प्रणाम! 


जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण

 महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण





 

             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शाहू, फुले, आंबेडकरांनी या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचे वरदान दिले. तीच विचारधारा खांद्यावर घेऊन आणि महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न डोळ्यांमध्ये साठवून यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्याची पायवाट तुडवली. सामान्यांतून असामान्यत्वापर्यंत एका प्रेरणेचा प्रवास म्हणजे यशवंतरावांचे जीवनचरित्र! १२ मार्च, १९१३ रोजी 'देवराष्ट्रे' या छोटयाशा खेड्यात यशवंतरावांचा जन्म झाला. वडिलांचे नाव बळवंतराव व आईचे नाव विठाबाई होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी यशवंतरावांचे पितृछत्र हरपले आणि तेथून पुढे त्यांची आई हीच त्यांच्या जीवनाचा आधारवड झाली. 


          क-हाड-साताऱ्याच्या काळ्या मातीवर आणि कृष्णा-कोयनेच्या काठावर यशवंतरावांची जडणघडण झाली. एकदा वर्गात गुरुजींनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले, " तू कोण होणार?" कोणी नेता होणार, कोणी खेळाडू होणार, कोणी साहेब होणार अशी उत्तरे दिली. परंतु यशवंतराव चव्हाणांनी गुरुजींना उत्तर दिले, "मी यशवंत चव्हाण आहे, मी यशवंतराव चव्हाण होणार" गुरुजींनाही आश्चर्य वाटले. प्रचंड आत्मविश्वास आणि स्वप्रयत्नातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व फुलविण्याचा ध्यास त्यांच्या या उद्गारातून जाणवतो. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनावर, म. फुले, कार्ल मार्क्स, आंबेडकर, पंडित नेहरू, म. गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराचे संस्करण झाले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता.   

स्वातंत्र्यानंतर १९५२ च्या सार्व्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला. मुंबई राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करून स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले. अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी, या प्रश्नाकडे केवळ तात्विक अंगाने न पाहता सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे अशी अचल भूमिका त्यांनी घेतली होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. त्याच ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारले गेले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील जातिभेद नष्ट होऊन बहुजन समाज उभा राहिला पाहिजे, अवघा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हे यशवंतरावांचे स्वप्न होते आणि म्हणूनच शिक्षण, राजकारण, प्रशासन, उद्योग, तंत्रज्ञान, समाजकारण या गोष्टी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील पिंपळपारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे दुःखाश्रू जणू यशवंतरावांच्या पापण्यांखाली दडलेले होते म्हणूनच त्यांनी कृषी विकासाला अग्रक्रम दिला. विकासासाठी सहकाराची गंगा खेड्यापाड्यापर्यंत नेली. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा पंडित नेहरूंनी देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची धुरा पेलण्यासाठी यशवंतरावांना मुंबईहून दिल्लीला बोलावले जणू हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! 'गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचते' हा आदर्शपाठ आजही महाराष्ट्राला तेजाचा प्रकाश देतो आहे. यशवंतराव चव्हाण हा केवळ एक जीवनप्रवास नाही तर तो होता एका ध्येयनिष्ठ जिद्दीचा प्रवास आणि असामान्य कर्तृत्वाचा देदीप्यमान इतिहास आहे. म्हणूनच, महाराष्ट्राचे शिल्पकार हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले पान आहे. अन् यशवंतराव चव्हाण या नावाला देशाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. जय हिंद!

जानेवारी १९, २०२२

संत गाडगे बाबा

  माणसात देव शोधणारा संत गाडगे बाबा

माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, 


देव नाही दगडात, देव नाही दगडात। 


देव दाखविला तुम्ही, माणसाच्या हृदयात ।।" 


स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय. विदर्भातील शेणगावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी बाबांचा जन्म झाला. त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचाराचे डोंगर रचले जात होते. त्यातून दुःखाच्या नद्या वाहत होत्या. अंधश्रद्धेचे थैमान माजले होते. मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. रक्ताचे पाट वाहत होते. माणसांचा चिखल होत होता. सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवळत होते. हे सारे काही बाबांनी जवळून पाहिले. त्यांना ते सहन झाले नाही. अखेर त्यांनी घराचा, संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्वीकारले. 


सोडून सर्व घरदार, तोडिले पाश मायेचे ॥ अनवाणी फिरून पायी, अश्रू पुसले बहुजनांचेडोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हाती फुटके गाडगे, एका हाती खराटा, फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजनपात्र असा बाबांचा वेश होता.


ज्या गावात बाबा जात ते गाव हातातील खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत.


 हाती घेऊन खराटा । 


अवघ्या झाडिल्या रे वाटा ।


 पुराणातील भाकडकथा बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाहीत. बाबांचे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होता.


 "अडाणी राहू नका, पोरांना शाळेत पाठवा, सावकाराचे कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका.


 दगडाच्या देवाची पूजा करू नका.


 देव दगडात नाही, 


अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे." 


बाबांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रद्धेला प्रखर विरोध केला. अनेक प्रसंगी स्वत: पुढाकार घेऊन सामान्य माणसांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले. 


तहानभुकेची पर्वा न करता बहुजन समाजाची दुःखी स्थिती पाहात, त्यांचे दुःख आपल्या हातांनी पुसण्यासाठी अनवाणी पायांनी बाबा वणवण भटकत राहिले. हातातील गाडग्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. एखाद्या गावात अंगावरील चिंध्यांमुळे चिंधेबाबा म्हणत तर विदर्भ व मराठवाड्यात वट्टीबाबा म्हणत. पण खऱ्या अर्थाने ते होते रंजल्या गांजलेल्यांचे बाबा होते. 


संत गाडगेबाबा म्हणजे मानवतेचे पुजारी. माणसातील देव शोधणारे खरे संत आणि वीर बुद्धिवंत होते. मानवाची पूजा करणाऱ्या या थोर संताकडे पाहिले की, संत तुकारामांच्यात अभंगाची आठवण होते - 


"जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । 


तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।" 


जय हिंद!

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

जानेवारी १८, २०२२

महात्मा जोतीबा फुले

 महात्मा जोतीबा फुले




            माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, अखंड अविरतपणे फिरणाऱ्या काळाच्या चक्रावरील एखादे शतक इतके महान असते की,त्या शतकाला एखाद्या युगप्रवर्तक महात्म्याचे स्वप्न पडते आणि ते साकारही होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाला असेच एक स्वप्न पडले आणि ते स्वप्न सत्यातही उतरले. ते स्वप्न केवळ स्वप्नच नव्हते तर ते एक जिवंत चैतन्यच होते. ते चैतन्य म्हणजे दलितांचे व उपेक्षितांचे कैवारी, स्त्रियांचे उद्धारकर्ते 'महात्मा जोतीबा फुले' होय. "सत्याचा पालनवाला । तो धन्य ज्योतिबा झाला । पतितांचा पालनवाला । तो धन्य महात्मा झाला ॥" 

महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी चिमणाबाई व गोविंदराव यांच्या पोटी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी एका सामान्य अशिक्षित माळी कुटुंबात झाला. लहानपणी त्यांच्या जीवनात क्रांतीची ठिणगी पेटविणारा एक प्रसंग घडला. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राचे लग्न होते. आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे जोतीबा त्या लग्नसमारंभात सहभागी झाले. परंतु तेथे क्षुद्र म्हणून त्यांचा अपमान केला व त्यांना मिरवणुकीतून बाहेर काढले. आतापर्यंत आयुष्यात सामान्य ज्योतीप्रमाणे संथपणे तेवत असलेली ही ज्योत अपमानाने विझली नाही तर उलट तिचे क्रांतिज्योतीत रुपांतर झाले. त्यावेळी समाजामध्ये शुद्रातिशुद्रांना मिळणारी वागणूक, स्त्रियांची स्थिती, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती इ. गोष्टीचे जोतीबांनी अवलोकन केले. हजारो वर्षे अमान आणि दारिद्र्याच्या खाईत निद्रिस्त अवस्थेत पडलेल्या दीन-दलितांच्या जीवनामध्ये कायापालट करायचा असा निर्धार ज्योतीबांनी केला.


         शिक्षण हा सर्व सुधारणांचा मूळ पाया आहे हे त्यांनी ओळखले आणि म्हणूनच त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली आणि आणि स्री-शिक्षणाची घंटा घणघण वाजवली. हजारो वर्षाच्या रुढीवर आघात केला तो घंटानाद ऐकून बहुजन समाज खडबडून जागा झाला. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगताते उद्धारी। ही महात्मा फुल्यांची भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचली. फुल्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी त्या शाळेमध्ये स्वत: स्र शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले. ज्योतीबा आणि सावित्रीबाई यांच्या या कार्यामुळे पुण्यातला सर्व वर्ग खवळून उठला. त्यांनी ज्योतीबा आणि सावित्री यांच्या अंगावर दगड, चिखल फेकले. परंतु, आले जरी कष्ट दशा अपार । न टाकिती धैर्य तथापि थोर ।। या न्यायाने ते खचले नाहीत. अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून फुल्यांनी स्वत:पासून परिवर्तनाच्या कृतीला सुरुवात केली. म्हणूनच ज्योतीबा हे केवळ शाब्दिक पंडित नव्हते तर ते एक खंदे कृतिवीर होते   'सत्यशोधक समाजा'च्या माध्यमातून अनिष्ठ रुढींना विरोध करणारे समाजसुधारक होते. त्या काळात ब्रिटिश सरकारकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे ज्योतीबा हे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ व समाजहितचिंतक होते. महात्मा फुले धर्मशास्त्रीमहात्मा फुले धर्मशास्त्री नसतील पण आत्मज्ञानी निश्चितच होते. 'गुलामगिरी', शेतक-यांचा आसूड', 'ब्राह्मणांचे कसब' ही त्यांची साहित्य-संपदा पाहिली की फुल्यांमधील वास्तवाचे प्रखर चित्रण करणारा साहित्यिक आपल्याला समजतो. फुल्यांच्या रुपाने जणू या भूमीवर सत्य अवतरले आणि त्याने असत्याशी झुंज दिली. सत्य हा त्यांचा देव आणि सेवा हा त्यांचा खरा धर्म होता. ज्या समाजाने फुले दांपत्याला शेण, दडग फेकून मारले त्या समाजासाठीच या दांपत्याने ज्ञानफुले, क्रांतिफुले अर्पण केली. समाजसेवेच्या खडतर मार्गावरून चालताना या समाजावर अनंत उपकार केले. आणि या समाजासाठीच स्वत:चे जीवनपुष्प अर्पण केले. 


         आजही या समाजाला अनेक ज्योतीरावांची आणि त्यांनी पेटविलेल्या ज्योतींची आवश्यकता आहे म्हणून शेवटी एवढेच म्हणन. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा . जय हिंद

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

जानेवारी ११, २०२२

स्वराज जननी जिजामाता

          सत्य शिव सुंदर जिजाऊ 



      चारशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ जाधव हिचा जन्म झाला. आईचे नाव म्हाळसाबाई जिजाऊ हे ट्रीपल एम टॉनिक आहे. ते म्हणजे मन मनगट आणि मस्तक' कर्तबगार. माँ जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले पाटील यांच्यासोबत झाला. मुलगी जन्माला आली तरी मुलाप्रमाणे तिचे स्वागत करा असे आज शासनदरबारी सांगण्यात येत आहे. परंतु ४०० वर्षापूर्वी जिजाऊंच्या जन्माचा आनंद व्यक्त करणाऱ्यांसाठी वडील लखुजी जाधव यांनी हत्ती वर बसून साखर वाटली .आई ही  पहिली शाळा असते. तर शाळा ही समाजाची आई असते. गुलाम माता गुलाम मुलांना जन्म देत असते. स्वयंप्रज्ञेची स्वाभिमानी जिजाऊ आई असली तरी ती शिवाजीला जन्म देते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका पराक्रमी व नीतिमान योद्धाचा जन्म झाला. त्याचे नाव शिवाजी शिव म्हणजे चांगले पवित्र, मंगलमय, जेथे शिव म्हणजे पवित्रता व शुद्धया असते. 'सत्य असतं तेथे सुंदरता असते पती शहाजीला कैदेत ठेवल्यावरही आदिलशाहाला किल्ला परत न करणारी जिजाऊ, अफजल खाना ची भेट घेण्यासाठी शिवाजीला पाठविणारी जिजाऊ, पुरंदरच्या वेढ्यातून शिवाजीला सोडविणारी जिजाऊ, सती प्रथेला त्याकाळी विरोध करणारी जिजाऊ, ४०० वर्षापूर्वी स्त्रिया शूद्र व गुलामीचे जीवन जगत असताना मुलाला समोर करून किल्ले लढविणारी लढाऊ बाण्याची जिजाऊ, रयतेचे  कल्याण करणारी, राज्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला घातले असे शिवाजींना ठकावून सांगणारी जिजाऊ, अशुभतेचे प्रतीक म्हणून पुण्याच्या भूमीवर नांगर ठेवणाऱ्या आदिलशाहाची भीती न बाळगता जमीन पवित्र असते, ती अशुभ कधीही नसते, असे बजावून तो नांगर हटविणारी जिजाऊ, अशी जिजाऊंची अनेक ऐतहासिक रूपे आहेत. जिजाऊ म्हणजे आदर्श माता, आदर्श पत्नी आणि आदर्श कल्याणकारी राज्यनिर्माती आहे. धर्मग्रंथ व धर्माचे ठेकेदार तेव्हाही होते, आताही आहेत. पण तेव्हा जावक रूढीपरंपरांमुळे व मनुस्मृतीच्या चौफेर जाचामुळे महिलांचे जीवन दुःखीत, कष्टी व गुलामीचे होते, त्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात जिजाऊंनी जो निर्भीड बाणा दाखविला ती अस्मितेची ललकारी बनली, त्या सद्प्रवृत्तीला भारतीय इतिहासात तोड नाही... समस्त स्त्रियांना माँ जिजाऊंचे जीवन कार्य लक्षात येईल व ती स्वातंत्र्याची प्राणज्योती आहे, हे समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने समाजत सत्य, शिव, आणि सुंदरतेचा मिलाफ दिसेल. प्रत्येक कुटुंबाला कदाचित वाटत असणार की, शिवाजीसारखा शूर, बीर, कर्तबगार मुलगा जन्माला यावा. परंतु शिवाजी जन्माला यायचा असेल तर नुसते शहाजी होऊन भागत नाही. त्यासाठी लागते एक सर्वागसुंदर पण लढवय्यी जिजाऊ.

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

डिसेंबर १६, २०२१

सरदार वल्लभभाई पटेल


15 डिसेंबर रोजी महान "राष्ट्राचे एकीकरण करणारे" सरदार वल्लभ भाई यांची पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे नेतृत्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांची दूरदृष्टी, शहाणपण आणि राजकारणीपणा यासाठी भारतातील लोक त्यांचे कायम ऋणी राहतील.

पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अहमदाबादमधील नगरपालिकेच्या सदस्या म्हणून केली आणि ते भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याला शासन आणि प्रशासनातील विविध भागधारक आणि त्यांची प्रासंगिकता, भूमिका आणि जबाबदाऱ्यांची बारीक माहिती होती. देशाची गुंतागुंत हाताळताना त्यांनी दाखवलेल्या स्थिर दृष्टिकोनामुळे ते जनतेचा एक जबाबदार आवाज बनले. त्यांनी १९२२-२३ मध्ये सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी लोकांना एकत्र करून स्वातंत्र्यलढ्याला सक्रियपणे बळ दिले.

अहिंसक बारडोली सत्याग्रह हा बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध शेतकऱ्यांचा अतुलनीय विजय ठरला. त्यातील त्यांच्या भूमिकेमुळे महिलांनी त्यांना "सरदार" ही पदवी बहाल केली. एक तडजोड नसलेले शिस्तप्रिय आणि ऐक्याचे पुरस्कर्ते म्हणून त्यांनी 1937 च्या प्रांतीय निवडणुका, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो आंदोलनात उल्लेखनीय योगदान दिले. त्यासाठी त्यांनी खर्च केलामूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि संविधान सभेच्या बहिष्कृत क्षेत्रांवरील सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून, पटेल यांनी मूलभूत आणि अल्पसंख्याक हक्कांशी संबंधित संविधानातील महत्त्वपूर्ण कलमे चालविली. अधिकार आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, यावरही त्यांनी भर दिला.


त्यांनी अल्पावधीतच संस्थानांचे एकत्रिकरण अत्यंत बारकाईने हाताळणे हे त्यांच्या आवेशाची आणि चिकाटीची साक्ष देते. पटेल यांच्या राजनैतिक डावपेचांनी संस्थानांचे "विलय" मिळवले आणि या भागांना घटनात्मक चौकटीनुसार आणून राष्ट्राला आकार दिला


स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान निवडताना काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि लोकशाही मूल्यांचा निव्वळ अभाव दिसून आला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 15 पैकी 12 काँग्रेस समित्यांनी पटेल यांना नेता म्हणून पसंती दिली. तरीही, नेहरूंची निवड या महत्त्वाच्या क्षणी पंतप्रधान झाली.


सरदार पटेल यांनी 7 नोव्हेंबर 1950 रोजी नेहरूंना लिहिलेले पत्र, नेहरूंच्या तिबेट, चीन आणि काश्मीरच्या हाताळणीवर त्यांनी केलेली जोरदार टीका स्पष्टपणे अधोरेखित करते. नेहरूंच्या अभिमुखतेचा परिणाम नंतरच्या काळात भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये झाला. सरदार पटेल यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात 41 वर्षांचा विलंब ही आणखी एक बाब आहे जी पटेल यांना राष्ट्रनिर्माता म्हणून पात्रतेचे श्रेय देण्यास काँग्रेसची अनास्था अधोरेखित करते. नेहरूवादी आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांचे आभार मानण्यास त्यांना नकार देण्यात आला.


एकीकरणाचे मोठे कार्य हाती घेण्यासोबतच, भारताच्या पोलादी चौकटीला - ऑल इंडिया सर्व्हिसेस मजबूत करण्यात भारताच्या लोहपुरुषाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. नोव्हेंबर 1947 मध्ये, त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी करून भारतीयांचा सामायिक वारसा आणि लोकभावना यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये भारताच्या पुनरुत्थानाची कथा, विनाशावर बांधकामाचा विजय दर्शविला जाईल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सध्याच्या सरकारने पटेल यांच्या आदर्श आणि उदाहरणाला अनुसरून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मिशन कर्मयोगी द्वारे भविष्यासाठी तयार नागरी सेवकांना तयार करण्यासाठी भारताची स्टील फ्रेम अधिक मजबूत केली जात आहे. तंत्रज्ञानाने जोडलेल्या जगाच्या आव्हानांवर मात करणे, नागरिकांचे राहणीमान सुलभ करणे, सर्वोत्तम प्रशासन प्रदान करणे आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट नागरी सेवा बनवणे हे या क्षमता-निर्माण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.


पटेल यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त, स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातील सर्वात उंच पुतळा, राष्ट्राला समर्पित करण्यात आला. 2014 पासून, त्यांची जयंती, 31 ऑक्टोबर हा "राष्ट्रीय एकता दिवस" ​​म्हणून साजरा केला जातो. एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रम विविध प्रदेशांमधील शाश्वत आणि संरचित सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करतो.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्याला वारसा लाभलेला समाज आपल्या पूर्वजांचे सर्वस्व आहे. व्यक्तींना वाढण्यास, त्यांची क्षमता गाठण्यासाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी नवीन उंची गाठण्यासाठी सक्षम बनवणारी चौकट संस्थात्मक करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले. सरदार पटेल यांची पुण्यतिथी हा शक्य झालेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या सर्वोच्च बलिदानाला आदरांजली अर्पण करण्याचा आणि नवीन उभारणीचे ध्येय साध्य करण्याची प्रतिज्ञा करण्याचा एक योग्य क्षण आहे.