जगण्यातील / जीवनातील आनंद
'जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडें “आनंदाचे डोही आनंदी तरंग'
जगण्यातली मौज कोणत्याही ऋतूत आणि कुठल्याही वयात अनुभवता येते. उन्हाळा आला की थंडगार सरबताचे पेले डोळ्यापुढे दिसू लागतात. घरात वाळ्याच्या ताट्या किंवा कूलर यांची थंड हवा खेळत आहे. परीक्षांचा जाच संपला आहे. आंब्याच्या रसाची मेजवानी झडली आहे. मन आनंदाने भरून गेले आहे. जगण्यात खरोखरच मौज आहे.
पावसाळा म्हणजे तर प्रेमळपणाची मूर्तीच रिमझिम पाऊस पडतो आहे. अंगावर रोमांच उभे राहले आहेत. रपरप पडणारी पावसाची सर निघून गेली आहे. अशावेळी मनसोक्त भटकायला आपण एखाद्या टेकडीकडे निघालो आहोत. टेकडी चढून माथ्यावर पहुडलो आहोत. मनातले सारे विचार विकार गळून पडतात. केवळ आनंदाची प्रचिती येते.
हिवाळा म्हटला की हुरड्याची आठवण येते. थंड वाऱ्याचा शरीराला सुखद स्पर्श होत असतो. हुरडा खायला आपण शेतावर गेलो असतो. शेकोटी पेटवून हुरडा भाजला जात असतो. शेतात जिकडे तिकडे पिवळे सोने उगवले असते. त्यापुढे सोन्याचे अलंकार तुच्छ वाटतात. मिडास राजाने हे सोने पाहले असते तर 'मी हात लावीन त्याचे सोने व्हावे असा वर मागितलाच नसता.
पहाट फुटते. कोंबडा आरवतो. सृष्टी जागी होते. आतापर्यंत शांत असलेल्या जगात चैतन्य खेळू लागते. पहाटेचा मंद वारा विलक्षण सुखाचा अनुभव देतो. खरोखरच जगण्यात मौज आहे. खूप मजा आहे.
दुपारी पुरुष आपापल्या कामावर जातात. कुणी शेतावर, कुणी कारखान्यात तर कुणी कचेरीत. पुरुषार्थ करून सृष्टीला संपत्ती वैभवाने समृद्ध करण्याचा हा काळ असतो. मध्ये विश्रांतीची वेळ असते. शेतात शेतकऱ्याची बायको त्याच्यासाठी शिदोरी आणते. शहरात कँटिनमध्ये गप्पा मारत कामगार आणि कारकून चहा पितात. तो चहा अमृतमोलाचा वाटतो.
सायंकाळी कामाचे श्रम संपलेले असतात. आपल्या घरी बायकामुलात मिसळून जीवनाचा आनंद उपभोगण्याचा हा काळ असतो. नुसता टी. व्ही. पाहत बसले तरी मजा येते.
मध्यरात्र म्हणजे तर सौंदर्याची सम्राज्ञीच. चंद्राचा दुधाळ प्रकाश सर्व विश्वात पसरलेला असतो. जिकडे तिकडे नीरव शांतता असते. श्रमाचे नाव नसते. केवळ आनंद मध्यरात्रीच अनुभवता येतो.
'बालपणात जीवन जगण्यात काही वेगळीच गोडी असते. साऱ्या जगाच्या वात्सल्याचा आपल्यावर वर्षाव होत असतो. निरागस आनंद केवळ बालवयातच अनुभवता येतो. इंद्रधनुचे मनोहारी रंग आपले भान हरवतात. चंदामामाला पाहून आपल्या साऱ्या वेदना विसरून जाऊन आपण हसू लागतो. गारगोटीतही आपल्याला सौंदर्य दिसते. रंगीबेरंगी फुगे आपल्याला मोहक वाटतात. सौंदर्य, सुख वेगळे आणि पैसा वेगळा. पैशापाठीमागे धावण्याचे वय अजून यायचे असल्याने खरे सौंदर्य आणि खरे सुख आपण बालवयातच अनुभवतो.
तारुण्य हे शौर्याचे आणि प्रीतीचे प्रतीक आहे. या वयात आपण महत्त्वाकांक्षेने प्रेरित होतो. माणूस उंच होतो तो याच वयात ! भगतसिंग अमर झाला तो याच वयात! तारुण्यात सर्व प्रकारच्या प्रेमाची आग धगधगत असते. त्य आगीतून चालण्याचे जीवन जगण्यातही मौज आहे.
म्हातारपणी जीवन जगण्यात वेगळीच मौज आहे. सारे लोक आपला सन्मान करतात, वाकून नमस्कार करतात, या वयात सारे विश्वच आपले कुटुंब बनते. सागराची विशालता आणि आकाशाची व्यापकता आपल्या मनाला येते. जगण्याचा आस्वाद केव्हाही व कुठेही घेता येतो.
पण कधी-कधी जीवनात संकटांचे डोंगर कोसळतात, दुःखांचे आघात होतात, उद्विग्नता आणि निराशा यांच्या काळोखात मन काळवडून जाते. जे हवे ते मिळत नाही, जे घडावे असे वाटते ते घडत नाही. अशावेळी जीवन जगणे नकोसे वाटते. जीवनात आनंदच उरलेला नसतो. जगण्यातील आनंद कसा मिळावा? मिळतो, याही स्थितीत जगण्याचा व जीवनाचा आनंद मिळतो. मी माझ्यासाठी नव्हे, इतरांच्यासाठी जगत आहे एवढा विचार मनात आणला की मनावरची मरगळ निघून जाते. मी देशासाठी जगतो आहे. माझ्या समाजासाठी जगतो आहे,आणि त्यांना माझी गरज आहे, मला त्यांच्यासाठी जगायचे आहे या निर्धारातही आनंद आहे. मग दुःखाचेही कौतुक वाटू लागते. एक अतूट आशावाद मनात निर्माण होतो. मग भगतसिंग, राजगुरुही हसतहसत फासावर जातात आणि जगण्यातील आनंद उपभोगतात. ह्या अत्युच्च आनंदाची खुमारी अनुभवायची तर एकच प्रमेय दृष्टीपुढे असले पाहिजे.
जिद्द आणखी हिंमत यांचा सुरेख संगम घडे सुरु अमुचा प्रवास अविरत ध्येयमंदिराकडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा