epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

पहाटेची भ्रमंती.

            पहाटेची भ्रमंती

                  घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी उद्याचळी मित्र आला या भूपाळीची स्मृती मनात घोळवणारी पहाट म्हणजे सर्व सौंदर्याची सम्राज्ञी होय.

                 पहाटे भ्रमंती करावी, मन प्रसन्न आणि विचार उत्तुंग असतात. मी पहाटे भ्रमंतीला जातो आणि निरागस आसमंत मला वेड लावतो. वाटतं, अशीच पहाट घरोघरी हसावी. घोटभर पाणी घासभर चारा आणि मायेचा उवारा सर्वांना मिळावा. आभाळ शिवलेले असावे आणि शक्तिशाली हात पाठीवरून फिरावेत. ऊन-पावसातही शरीर गळू नये आणि कुणी लक्तरात राहू नये. पहाटेच्या फुलाप्रमाणे सदाकाळी ओठावर हसू फुलावे. एक तळावर आणि दुसरा माळावर असा विषमतेचा वेगळा संसार नसावा. साऱ्यांच्या पावलाची वाट एकच असावी.

                   कवी मर्ढेकरांना माघ महिन्यातील मुंबईची पहाट वेगळीच जाणवते. पहाटेला भ्रमंती करताना तौही मनामध्ये रेंगाळते. माघ महिन्यात पहाटेच्या वेळी मुंबई बंदराला न्हालेल्या गर्भवतीचे सोज्ज्वळ सौंदर्य आलेले असते. पोटात गर्भ असल्याप्रमाणे आगबोटी बंदरात उभ्या असतात. सचेतनांना नवा हुरूप चढतो, अचेतनांना कोवळा सुगंध येतो. 

             पहाटेपूर्वीच्या काळोखानंतर पहाटेच्या प्रकाशामुळे घरांची डोकी उशीवरून अलगद उचलल्यासारखी वाटतात. पहाटेला हिरवी झाडे न्याहारीसाठी नितळ काळा वायू घेत असतात. समुद्रपक्षी मासे टिपतात तेव्हा जणू सूर्यच मासे वेचत आहे असे वाटते. मुंबई बंदराला जणू निशिगंधाचा सुगंध येत असतो. पहाटेपूर्वीच्या काळोखात सर्व सौंदर्य अदृश्य असते. पहाटेनंतरच्या प्रकाशात सौंदर्य इतके दृश्य होते की त्यातील कोमलता, भावूकता, नजाकताच नाहीशी होते. म्हणून पहाटेची भ्रमंती ही नाजूक, तलम आणि तरल संवेदनांचा आस्वाद देणारी यक्षिणीची कांडी आहे. 

                    पहाटे भ्रमंती करावी आणि सृष्टीसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा. दवबिंदू पिऊन टवटवीत झालेली निरागस फुले आपल्याकडे पाहून अशी गोड हसतात की त्यांना पटकन उचलून खांद्यावर घ्यावेसे वाटते. तोच पहाटेचा वारा झाडांच्या कानात कुजबूज करतो आणि ते झाड सळसळ आवाजात फुलांच्या खोड्या सांगतात. वेल नुसतीच मान डोलावत असते. सुंदर रंग परिधान केलेली फुल अंतरंगातही परिमलपूर्ण असतात. अशा एखाद्या फुलाशी फुलाइतके रंगीत फुलपाखरू खेळत बागडत असते. त्यावेळी गवतालाही हिरवेपण येते आणि झऱ्यालाही नाद येतो. पहाटेचा गार वारा लडिवाळ बाळाप्रमाणे अंगाशी झोंबी करतो. त्याने आपल्याशी असेच खेळत राहावे म्हणून तर आपण पहाटेची भ्रमंती करत असतो.

                 दुरून डोंगर साजरे व निळे दिसतात. दूरच्या झाडांच्या आकृती तेवढ्या जाणवतात पण स्पष्ट असे काहीच दिसत नाही. अंधुकतेमुळे उत्कंठा वाढते. आकृती दिसावी पण चेहरा दिसू नये, पक्वानांचा सुगंध यावा पण नेमका पक्वान्न दिसू नये, अशा वेळी जी गोड हुरहूर मनाला लागते तिची भावोत्कट अवस्था पहाटेच्या भ्रमंतीत असते. 

                 पहाट आपले देखणे रूपही वेळोवेळी बदलत असते. उन्हाळ्याची पहाट विरक्त वाटते. या पहाटेचा वारा खूप हवाहवासा वाटतो. आकाश स्वच्छ निळे व निरभ्र असते. शुक्राचा तारा मोठ्या थाटात सिंहासनावर विराजमान झालेला असतो. एकेक तारका नृत्य संपल्यावर पडद्या आड जाणाऱ्या नर्तिकेसारखी वाटते. सूर्योदयापासून पृथ्वीवर प्रचंड जाळ पेटणार असतो. या कल्पनेने आपल्या मनात भवितव्याचे आणि भूतकाळाचेही विचार येतात म्हणून विकार गळून पडतात. म्हणून उन्हाळ्याची पहाट विरक्त वाटते. 

                 पावसाळ्याची पहाट गूढरम्य वाटते. या पहाटेला फिरायला जावे तो पहाटेची प्रभा मेघांनीच पिऊन टाकलेली आढळते. धूसरता सर्वत्र पसरलेली असते. यावेळी पृथ्वीबरोबर मनाचाही दाह शांत झोलेला असतो. मेघाकडे पाहून कधी दयाघनाची स्मृती जागी होते, तर कधी कालिदासाचा मेघदूत गूढगुंजन करतो. 

                हिवाळ्याची पहाट सुवर्णकांतीने विनटलेली विलक्षण मोहमयी जादुगारीण वाटते. या पहाटेत उन्हाळ्याचा दाह नसतो, पावसाळ्याची रहस्यमयता नसते तर असते वास्तवातील राजस समृद्धी. या पहाटेनंतर उन्ह हिरवे होऊन येणार असते. जीवनात तृप्तीचा गंध दरवळणारी हिवाळी पहाट आनंदाचा गौरीशंकर असते. 

              पण पहाट कुठल्याही ऋतूतील असो, पहाट ती पहाटच. पहाटेच्या भ्रमंतीतील आनंद शब्दांपलीकडचा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा