चांदण्या रात्रीची सहल / चांदण्यातील भ्रमंती.
माजि अमृतकण कोवळे जैसे शारथिये चंद्रकले तै वेचिती मने मवाळे चकोर नलगे
अशा तरल आणि हळूवार भाववृत्तींचा अनुभव चांदण्यारात्रीच प्रत्ययाला येतो.
"एका मांजराच्या गालामिशावर चांदणे पडले असता ते दूध समजून ते पुन्हा पुन्हा चाटण्याचा मांजराने सपाटा चालवला होता." एका संस्कृत काव्यातले चिमुकले वाक्य, छोटीसीच कल्पना, पण चांदण्याची दुधाळता, रमणीयत्व आणि माधुर्य यातून कसे ओसंडून वाहत आहे.
आधी मध्यरात्र म्हणजे कुसुमावती देशपांडे यांच्या शब्दात सौंदर्याची सम्राज्ञी, त्यात चांदण्या रात्रीची मौज तर विलक्षण अमर्याद विशेषतः पौर्णिमेची दुधाळ रात्र मनस्वी मोहमयी असते.
म्हणून ती नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेषी प्रेरक ठरते. गेंदेवार गुलाबाप्रमाणे आल्हाददायक असलेल्या पूर्ण चंद्राला पाहून सागराला भरती येते. कवींच्या कल्पनांचेही तरंग आभाळापर्यंत उसळतात. सामान्य माणसाचे मन तृप्त आनंदाने दुथडी भरून वाहते.
चांदण्यात भ्रमंती करावी ती नदीकिनारी, भेडाघाटला नर्मदेचे दृश्य तर या चांदण्यात इतके मनोवेधक असते की कुणाही रसिकाला वेड लागावे, आणि अरसिकानेही रसिक होऊन जावे. नर्मदेची दुग्धधारा शारदीय पौर्णिमेच्या आधीच रूपेरी झालर पांघरते. काळ्याकभिन्न पर्वताच्या कड्यावरून खाली वेगाने सांडणारा फेस अंगावर तुषार उडवतो आणि आपण रोमांचित होतो, मन मोहरून जाते. त्या चांदण्यारात्री नावेत बसावे, नाव पाण्यात ढकलून द्यावी जलप्रवाहाबरोबर आपणही भरकन जावे खाली पाण्यात पूर्ण चंद्राचे प्रतिबिंब डोलत असलेले आणि वर आभाळात सारे काही चंदेरी भवलतेने विनटलेले. आभाळाच्या निळ्या शालूवर ही चांदण्यांची भरतारी जर किती खुलून दिसते.
चांदण्यारात्रीच्या भ्रमंतीत सोबत मित्रपरिवार असावा, साऱ्यांचेच मन स्वच्छंद आणि भावना मोकळ्या असतात. अंतःकरणात उर्मी उसळतात, तरंग मनावर तरंगतात. रस्त्याची डांबरी नागीणही मंत्रमुग्ध करते, विलक्षण मोहिनी घालते. तिच्यासोबत आपण किती दूरवर निघून गेलो याचे भानही राहत नाही. चांदण्याच्या सुखद मुलायम रेशमी स्पर्शाने तर एक अनामिक हुरहूर जीवाला क्रांत आणि तृप्तही करते. चांदण्यात पायी चालताना पायाखाली मऊमऊ थंडगार धूळ तुडविल्याचा आनंद वाटतो चांदण्यात उडलेली धूळ ही डोळ्यांनी अनुभवण्याचा सौदर्यविलास आहे.
गरिबांच्या घरी गालिचे कुठले? पण चांदण्यारात्री झाडाखाली निसर्ग गरीब-श्रीमंत असा भेद न करता चांदण्याचे गालिचे सर्वासाठी पसरतो. झाडाची पाने हलू लागतात तेव्हा जमिनीवरचे हे गालिचे सळसळतात, अचेतनातही चैतन्याचा साक्षात्कार देतात. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करतात चांदणी रात्र आपल्या मनात भावभक्तींची फुलं फुलवून जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र अधिकच रमणीय वाटतो. तो समानधर्मी दुधाशी एकरूप होतो.ते चांदणे इतके मधुर असते की दुधात ते अमृत घालते असा लोकसमज रूढ झाला आहे. अशा चांदण्याने नटून सजून आलेली सृष्टी मेनका, रंभा, उर्वशी किंवा कुठल्याही अप्सरेपेक्षा सुंदर वाटावी. सरोवराचे शुभ्र कर्णफुल कानात घातलेली, हंसासमान धवल वर्णाची, धूसर पांढरे वस्त्र परिधान केलेली अशी ही निरागस सृष्टी बालिका हसतमुखाने आपल्या पुढ्यात उभी आहे असे चांदण्यारात्रीतील सृष्टीला पाहून मनाला भावत असते.
आपल्या अंतरातील भावनाही चांदण्यात आवेगी आणि कोमल झालेल्या असतात. हळुवारपणाचे उदाहरण देताना श्रीज्ञानेश्वरदेखील शारदीय पौर्णिमेच्या चांदण्याचाच आधार
अशाच एका दुधाळ रात्री आम्ही रामटेकला रामगडावर गेलो होतो. मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. लक्ष्मणाचे दर्शन घेतले. गडावर किंवा नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करताना चांदणी रात्र आपल्या मनात भक्तीची फुलं फुलवून जाते. डोंगरावरुन सभोवार नजर टाकली. किती सुंदर दृश्य होतं ते टेकडीवरून गार वारा वाहत होता. वाऱ्याची झुळूक मनाला उल्हसित करत होती.
नंतर गड उतरून आम्ही रामसागरावर गेलो. हा एक मोठा तलाव, एक नितांतरमणीय सरोवर आहे. त्यात चंद्राचे आणि चांदण्याचे प्रतिबिंब पडले होते. पाण्यावर लहरी उठत होत्या. चांदण्याच्या चंदेरी प्रकाशात त्या लहरी बांदीप्रमाणे चमकत होत्या. आम्हाला वाटले, पांढरे शुभ मासेच लाटांवर तरंगत आहेत, पोहत आहेत.
काठावर बसलेल्या नावाड्याला आम्ही विनंती केली. त्यानं थोडेसे पैसे घेऊन आम्हाला नावेत बसवले. रामसागरात फिरवून आणले. तो आनंद अनिर्वचनीय होता. कुणी पाण्यात हात बुडवत होते, कुणी पाय बुडवत होते, कुणी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते.
शीतल चांदणे मनाला वेड लावते हेच खरे।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा