epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

मी पाहिलेले शिल्प / प्राचीन मंदिर

 मी पाहिलेले शिल्प / प्राचीन मंदिर 



                'साध्याही विषयात आशय किती मोठा कधी आढळे केशवसुत. एखाद्या शिल्पातला आशयही असाच आपल्या हृष्टीतून आणि मनातून निसटून जाणारा पण अतिशय सधन असते प्रत्ययकारी असतो आणि जीवनदर्शीही असतो

             सहज जाता जाता मला एक प्राचीन मंदिर दिसले आणि मग ते मी पाहिले. दिसणे आणि पाहणे यात फरक आहे. चहाच्या भांड्यावर झाकलेली तबकडी वाफेने उडते हे अनेकांना दिसले होते पण न्यूटनने ते पाहले. कलाकृती आपल्याला सौंदयांचा अनुभव देतात पण तो घ्यायला आपले व्यक्तिमत्त्वही सिद्ध असावे लागते. म्हणूनच सौंदर्याचा अनुभव हा जितका कलाकृतीया तितकाच आपल्या मनोभूमिकेवर अवलंबून असतो. यामुळे कलाकृती पाहताना पाळावयाची सारी पथ्ये पाळूनच मी या प्राचीन मंदिर शिल्पाचा आस्वाद घेतला, घेऊ शकलो. 

            माधव आचवल यांनी 'रूप पाहता लोचनी' या लेखात अतिशय मार्मिक अभिप्राय व्यक्त केला आहे की कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा तर ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दिशांनी, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दृष्टींनी पाहावी लागते. कलाकृतीचा अनुभव स्पर्श, रूप, ना गंध इत्यादी संवेदनांनी घ्यायचा असतो. तो माणसांच्या गर्दीत व कोलाहलात मिळत नाही, तो कॅमेऱ्यात टिपता येत नाही, सहलीत अनुभवता येत नाही. कलाकृतीचा आस्वाद घेताना आपल्या मनाची अवस्था 'आपुला ठावो न सोडिता आलिंगिजे चंद्र प्रकटता अशी ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या कुमुदिनीसारखी संवेदनशील असावी.

            रुक्मिणी मंदिर पॅलेस, नागपुरातील महालविभागात राजे भोसले यांच्या राजवाडा परिसरातले एक अप्रतीम शिल्प. 

          दगडी महादुवार. महाद्वाराच्या भितीतच पहारेकऱ्यांना ऐसपैस राहता येईल अशी जागा. सभामंडपात अठ्ठेचाळीस लाकडी खांब. त्यावर विणकाम करावे तशी जाळीदार बारीक नक्षी, फुले, डिझाइन्स आणि द्राक्षांचे घोस हे त्या नक्षीकामातील मन वेधून घेणारी वैशिष्ट्ये. गाभारा संगमरवरी दगडाचा. 

          हे मंदिर दगडाचे. दगडावरील शिल्प दक्षिणेतील मीनाक्षी व कामाक्षी या मंदिरांची आठवण करून देणारे. दगडावर कितीतरी फुले, प्राणी व माणसे कोरलेली, अनेकप्रकारच्या कोरलेल्या फुलांत कमळाचे प्रमाण अधिक, हत्तींची विविध रूपे दोन हत्ती रांगेत चालणारे, दोन हत्ती परस्परांशी झुंजत असलेले, एका हत्तीचा पाय मगर ओढत असलेली. 

            खाली दगडी चौकोनात मत्स्यावतार, वर चौकोनात कुर्मावतार, त्याच्यावर वराहावतार, त्यानंतर क्रमाने नृसिंहावतार यायला हवा. पण आधी वामनावतार नंतर नृसिंहावतार, पुढे राम व नंतर कृष्णावतार. बुद्धावतार दिसला नाही. आता परत खालून वर पाहत जायचे. दगडी चौकोनात कृष्णलीला अमर करून ठेवलेली. कृष्ण मुरली वाजवतो, गाई व गोपी तल्लीन होऊन ऐकतात. कृष्ण कालियामर्दन करतो. कृष्ण शेषयायीवर बसलेला. कृष्णाने गोपींची वस्त्रे झाडावर टांगलेली आणि स्वतः झाडावर जाऊन बसलेला. विवस्त्र गोपी करुण नजरेने कृष्णाकडे पाहत असलेल्या. कितीही एकांत असला तरी कुलीन मुलींनी विवस्त्र स्नान करू नये ही शिकवण कृष्णाला गोपींना द्यायची होती का? 

               गंधर्वलोकातच आपण फिरत आहोत असे वाटावे असे संगीतमय वातावरण. कुणी तबला वाजवतात, कुणी वीणा झंकारतात, कुणी भेरीचा ध्वनी काढतात. घोड्याचे तोंड असलेले किन्नरही या संगीत समारंभात सामील झालेले असतात. 

               पण या सर्वांहून आपले चित्त वेधून घेते ती स्त्रियांची डौलदार शैली. एक स्त्री विश्वविचारात रंगून गेल्याप्रमाणे अधोवदनानं बसली आहे. त्यामुळं तिच्या पापण्या डोळ्यांवर आल्या आहेत. नाक सरळ आणि लांब चाफेकळीसारखं आहे. भुवया धनुष्याकृती व लांब आहेत. पण ती योगिनी वाटत नाही. एक स्त्री साधीच उभी आहे. तिचा उजवा पाय डाव्या पायाच्याही डाव्या बाजूला करून तो बोटांवर टेकलेला आहे. मान किंचित तिरपी आहे. केसांचा आंबाडा आहे. कानात कानाच्या वरपासून जवळजवळ मानेपर्यंत रुळणारी कर्णफुलं आहे. नर्तकीपेक्षाही आकर्षक पोझमध्ये ती उभी आहे. नृत्यांगना तर अनेक आहेत. अजिंठ्याची चित्रकला इथे दगडी • शिल्पात साकार झाली आहे.

               हे शिल्प पाहून आपण नकळत नतमस्तक होतो, कारण 'दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा