पहिला पाऊस
येरे येरे पावसा तुला देतो पैसा । पैसा झाला खोटा । पाऊस आला मोठा । ।
हे पहिल्या पावसाचे बडबडगीत आहे. पहिल्या पावसापूर्वी पृथ्वी आणि मानव सूर्यदाहाने भाजून निघत असतात. पावसाची चातकीय प्रतीक्षा करतात. कालिदासाच्या 'आषाढस्य प्रथम दिवसे' च्या कितीतरी आधीच आभाळ मेघांनी गच्च भरून येते. त्या मेघांचे रंगसौंदर्य मनाला मोहून टाकते. त्यातले कुणी काजळाच्या शिखरासारखे काळे असतात, कुणी इंद्रमण्यांप्रमाणे निळसर असतात, कुणाचे रंग गोकर्णीच्या फुलासारखे निळेजांभळे असतात आणि कुणी प्रकाशातील धुम्रझोताप्रमाणे दिसतात. तेवढ्यात वारा सुटतो आणि मेघातील शुभ्र मोत्यांचा पृथ्वीवर वर्षाव होतो.
हा पहिला पाऊस मनाला वेडे करतो. पाऊस कोसळत आहे हेच एक अलौकिक असते. मृद्गंध मनालाही सुगंधित करतो. पहिला पाऊस म्हणजे प्रेमळपणाची मूर्तीच ! दृश्य मोठी माणसे खिडकीतून किंवा गॅलरीतून पाऊस अनुभवतात. लहान मुले मात्र धावत धावत अंगणात जातात. पाऊस अंगावर घेतात आणि चिंब होतात. शर्ट घालून भिजण्यापेक्षा शर्ट काढून भिजण्यातच खूप मजा वाटते.
पहिला पाऊस शहरी माणसांना दिलासा तर शेतकऱ्याला देव वाटतो. आता शहरीयांची काहिली कमी होणार असते. आणि कृषिपुत्र आपली हिरवी स्वप्ने रंगवू लागले असतात. पाखरे गीत गाऊ लागतात. तेंव्हा' अजूनही संदेश देतच असतो.
कधी पहिलाच पाऊस इतका बरसतो की जमिनीवरून पाणी वाहू लागते. त्यातून कागदी होड्या सोडण्यात क्रिकेटपेक्षाही अधिक सुख वाटते." पहिल्याच पावसाने झाडांची धूळ झटकली जाऊन पाने हिरवी रसरशीत दिसू लागली असतात. माणसाचे मरगळलेले मनही आता टवटवीत झाले असते.
पहिल्या पावसाने कवींच्या प्रतिभेला कोंब फुटतो, रुजलेले बीज तरारून वर येऊ पाहते. पहिल्या पावसाने केलेले संस्कार अजून माझ्या मनावर कोरलेले आहेत. पहिल्या पावसाचे रमणीय रूप मी एकदा खंडाळ्याच्या घाटात पाहिले. डोंगरपायथ्याशी कोसळणारा पाऊस, घाटात कोसळणारा पाऊस आणि डोंगराच्या घाटमाथ्यावर स्थिरावलेला पाऊस अशी पावसाची तीन रूपे माझ्या हृदयात ठसली.
डोंगरपायथ्याशी कोसळणारा तो पहिला पाऊस हिरव्याकंच पानांतून निथळत होता. तो सतारीवर विद्युतलयीत, मल्हाराची धून गात, इथे तिथे उधळल्यासारखा वाटत होता. घाटात कोसळणारा पाऊस अस्पष्ट व अंधुक दिसत होता. तो आपल्याच तंद्रीत दूरवरची स्वप्नं पाहण्यात गुंग झाल्यासारखा वाटत होता, जणू आषाढयात्रेच्या वाटेवर विसावला होता. डोंगराच्या घाटमाथ्यावर विसावलेला पाऊस निःशब्द होता. तो रोमारोमात पालवणारा, अमर्याद आकाशाला मिठी मारून कोसळणारा आणि सृष्टीप्रमाणे मनातही संजीवन निर्माण करणारा वाटला.
पहिल्या पावसाचे थेंब किती पिऊ नू किती नाही असं चातक पक्ष्याला वाटतं. पहिल्या पावसानं काळ्या ढेकळाचा मृदुगंध दरवळतो. तो फुलांच्या कळ्याकळ्यात सामावून जातो. काळे डांबरी रस्ते पहिल्याच पावसाने निर्मळ आणि शांत होतात. मृदुगंधाचा आस्वाद घ्यायला दग इकडून तिकडे पळत सुटतात आणि पाखरंही भटकत असतात. ते ओले पक्षी ओल्या पानातल्या रेषा वाचतात. पहिल्याच पावसाने रानेवने आपल्या अंगावरची पोपटी नक्षी मोठ्या दिमाखाने दाखवतात. पहिल्याच पावसाने मनाच्या तापलेल्या तारा हळूहळू शांत होऊ लागतात.
पहिला पाऊस मानवी मनात आणि सृष्टीत केवढा विलक्षण चमत्कार करून जातो. पहिल्या पावसाचे तुषार आईच्या दुधाप्रमाणे येतात आणि सारी सृष्टी भुकेजल्या तान्ह्याप्रमाणे ते पीत असते. तुकोबाच्या अभंगाला चिपळ्याची साथ असावी तसे या पहिल्या पावसाच्या गायनाला झुडुपातला रानवारा साथ देत असतो. खोंड हा रानवारा पितो आणि सैरावरा धावतो पण मातीचा सुगंध येताच आपोआप स्तब्ध होतो. लहानग्या बाळाप्रमाणे अवखळ असलेले पक्षी पहिल्या पावसाचे टपोरे थेंब आपल्या पंखावर झेलत असतात. पहिल्या पावसानेच गायीलाही अवेळी पान्हा फुटतो आणि ती आपल्या वासरांना बोलावते. गावदेवीचा कळस भिजतो आणि ती गंमत पाहायला घराच्या छपरावरून अंगणात पागोळ्या येतात. पहिल्या पावसाने धरणी न्हाते आणि अन्नब्रह्माच्या पूजेला बसते. असा हा पहिला पाऊस म्हणजे सृष्टीच्या व मानवी मनाच्या सृजनाचा आरंभ असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा