epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

निसर्गाकडे चला

 निसर्गाकडे चला / निसर्ग मानवाचा सोबती / निसर्ग : एक महान गुरु 



"दिव्यरसी विरणे जीव जीवित हे त्याचे नाव "

              ह्या अनुभूतीचा साक्षात्कार केवळ निसर्गातच होऊ शकतो. म्हणून जीवनाचा उत्कट, आस्वाद घ्यायचा असेल तर निसर्गाकडे चला. निसर्ग हा मानवाचा सोबती तर आहेच पण तो एक महान गुरुही आहे.

              व्यं. रा. वनमाली म्हणतात की वृक्ष आपले जिवलग मित्र आहेत. आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश आणतात तसेच वृक्षसुद्धा सुख देतात. आनंदाच्या क्षणाची आठवण ठेवायची असली तर वृक्षासारखा दुसरा मित्र नाही.

              पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली 'निसर्ग आपला मित्र या लेखात लिहितात की निसर्गाच्या सहवासात राहण्यासारखा दुसरा आनंद नाही. या छंदामुळे मी मनाने प्रसन्न आणि शरीराने निरोगी राहू शकलो. निसर्ग आपला शेवटपर्यंत सोबत करणारा सच्चा दोस्त आहे.

               बोधिवृक्षाखाली बसणारा बुद्ध, वनस्पतींना हृदय आहे हे सांगणारा जगदीश बोस, देवदारच्या वनात बसून काव्य करणारा शेले, टेकडीवर अभंग करणारे तुकाराम आणि डोंगरावर परमेश्वरी संदेश ऐकणारे पैगंबर, मेघदूत लिहिणारे कालिदास, वृक्षांना उच्चतम आकांक्षांचे प्रतीक मानणारा अर्नोल्ड, सागरा प्राण तळमळला म्हणणारे सावरकर या सर्व थोरांनी निसर्गातून प्रेरणा घेतली, म्हणजे निसर्ग हाच त्यांचा गुरू.

                अरुणोदयाचे मोहमयी सौंदर्य देखील खऱ्या अर्थाने निसर्गातच घडते. अरुणोदयात डोंगरावरचा मेघ तेजाने न्हाऊन निघतो आणि पाहता-पाहता आपलेही अंतःकरण त्या तेजाने उजळून जाते. 

               निसर्गाकडे चला, सर्वत्र नावीन्याचा लखलखाट दिसेल. जग उत्पन्न होऊन इतकी वर्षे झाली, पण रोज सकाळी ते नवीनच जन्माला येते आहे असे वाटते. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे सोने पहिल्यासारखेच पिवळेधमक आहे. आभाळाचा निळा रंग अजून विटला नाही. कळ्याफुलांचा सुगंध अजून उडाला नाही. तृणांची हिरवीगार मखमल अद्याप टवटवीत आहे. निसर्ग म्हणजे जे रम्य आणि भव्य त्याचे प्रत्ययकारी दर्शनच.

                समुद्र केवढा सखोल, विशाल आणि अथांग! भरतीच्या आणि ओहोटीच्या तालावर आपल्या मनोवृत्ती अखंड नाचत असतात. किनाऱ्यावरच्या उंचउंच माडांच्या आणि नारळीच्या झाडाप्रमाणे आपणही सुसाट वाऱ्यात धुंद होऊन अष्टौप्रहर डोलत असतो. पहाटेच्या वेळा अंगावर लाटांचे तुषार झेलीत, ओल्या आणि भुसभुशीत वाळूवर अनवाणी चालण्यात केवढे काव्य आहे! 

                राजा माणसांचे स्वार्थी जग आपण पार विसरून जातो. उंच-उंच डोंगरांवर निळेभोर आधाळ वसलेले असते. झाडाझुडुपांच्या आणि खळखळणाऱ्या इवलाश्या झऱ्यांच्या संगतीत दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. झाडांना हलता येत नाही, बोलता येत नाही, ती एकाच .जागेवर उभी असतात. पण त्यांच्या जगात काही ना काही उलाढाली चाललेल्याच असतात. जुन्या झाडांची पाने गळत असतात. नवीन-नवीन पालवी फुटत असते. काहींना फुले येतात तर काहींना मोहर येतो. झुडुपांवर तुरे डोलत असतात. वेलींवर कळ्या हसत असतात. हिरव्या सृष्टीतल्या या रहिवाशांना स्वस्थपणा कसा तो माहीत नसतो. उन्हाळ्यात वाऱ्यांच्या झुळुकांशी ते थट्टामस्करी करत असतात. पावसाळ्यात मुसळधार पावसाशी त्यांची दंगामस्ती चाललेली असते. हिवाळ्यात धुक्याची दुलई अंगावर ओहून आत ते काहीतरी गडबड करीतच असतात.

                 जीवन आनंदमय करणारी संजीवनी म्हणजे निसर्ग होय. मृत्यूची चाहूल लागली की माणसे उदास व हताश होतात. पण झाडे मात्र पानगळतीची चाहूल लागताच सळसळतात, रंगाची उधळण करतात, रंगोत्सव साजरा करतात. ती मृत्युभयाने भयभीत होत नाहीत किंवा खिन्नही होत नाहीत. एक पान गळले तरी त्याच्या जागी नवे पान येणारच आहे असा अमरत्वाचा संदेश निसर्गगुरु देत असतो. हे अमृताचे द्रोण निसर्गातच प्यायला मिळतात. बा. भ. बोरकर

 'गळण्याआधी या कवितेत लिहितात, गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळती पाने आग लागल्यागत राळांचा फाग खेळती राने म्हणती आता अपर्ण होऊ झेलु हिमवर्षा हे सामोरे सहर्ष आम्ही नव्या जिण्याच्या स्पर्शा

           माणसाच्या मनावर असलेल्या प्रतिष्ठेच्या व व्यावहारिक गोष्टींच्या दडपणामुळे निसर्गाच्या आनंदाला तो कसा मुकत असतो ह्याचे हृद्य चित्रण म. ना. अदवंत यांनी 'निसर्ग आणि आम्ही या ललित निबंधातून केले आहे. आपण आपले जीवन अनेक वेळा पैशांच्या दिशेत बसवण्याचा प्रयत्न करतो. प्रतिष्ठेची खोटी वलये आपल्याभोवती निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चाकोरीला जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद प्रयत्न करतो. बाहेर टिपूर चांदणे पडले असतानाही काव्यातील किंवा कादंबरीतील चांदण्यांची वर्णने विजेच्या दिव्याच्या प्रकाशात मिटक्या मारीत वाचणारे आम्ही रसिक आहोत. निसर्गाच्या भव्य सौंदर्याशी समरस होण्याची पात्रता आमच्या ठिकाणी नाही आणि तशी इच्छाही नसते. आमची सर्व रसिकता कृत्रिम व नकली सौंदर्याचे कौतुक करण्यात गुंग होऊन गेलेली असते. निसर्ग म्हणजे जीवाला अनिर्वचनीय आनंद देणारा दिव्यरस आह.

               निसर्ग सारे क्षुद्र पाश तोडतो आणि आपल्याला अननभूत आनंदाचा अमोल ठेवा देऊन जातो. निसर्गाच्या भव्यत्वाचा साक्षात्कार आणि त्याचा सतत आस्वाद म्हणजेच तर जीवन आणि मग आठवून जातेपं. नेहरूसारख्या रसिकांच्या मनावर विलक्षण मोहिनी टाकणारी रॉबर्ट फ्रास्टची जागतिक कीर्तीची कविता.

   झाडी सुंदर दाट अन् काळीभोर आहे पण अजून खूप सारी कामं उरकायची आहेत अन् कितीतरी अंतर तोडायचं आहे मी झोपण्याआधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा