आम्हीच अमुचे भाग्यविधाता.
आम्ही 'नव्या मनूतील नव्या दमाचे शूर शिपाईं आहोत. आमचे भाग्य ब्रह्मदेव लिहित नसतो. आम्हीच अमुचे भाग्यविधाता आहोत.
श्रमाने मातीचेही सोने बनते, श्रमावाचून सोन्याचीही माती होते. म्हणून 'केल्याने होत आहे. रे, आधी केलेच पाहिजे' असे समर्थ म्हणतात. तुकारामांनीही म्हटले आहे, 'असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे', 'केल्याने होत आहे रे', 'उद्योगाचे घरी ऋद्धि सिद्धि पाणी भरी' आणि 'प्रयत्नांती परमेश्वर' या तीनही वचनांचा अर्थ एकच आहे, कारण आम्हीच आमचे भाग्यविधाता आहोत. वैयक्तिक जीवनात तर असे अनेक अनुभव येतात. आकाश आणि अनुज हे मित्र होते. आकाश रोज मंदिरात जायचा. अनुज फारसा जात नसे. काय झाले कुणास ठाऊक पण आजकाल आकाशला वाटायचे की पास नापास करणे सगळे देवाच्या हाती असते. परीक्षेच्या दिवशी त्याने देवाचा अंगारा लावला आणि मगच परीक्षेलागेला. उत्तर पत्रिकेवर प्रथम देवाचे नाव लिहिले. अनुजने मात्र यापैकी काहीही केले नाही. त्याने फक्त अभ्यास केला, परीक्षेत आकाश तृतीय श्रेणीत तर अनुज प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. दगडाच्या देवाने नव्हे तर स्वतःच्या अभ्यासाने अनुजने आपले भाग्य लिहिले होते.
साध्या व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव येतो. काही केलेच नाही तर फळ मिळणार कसे? एक शिक्षक होता. शिक्षक म्हटला, की तो गरीबच असणार. श्रीमंतांचे वैभव पाहून त्याला वारे की असे वैभव आपल्यालाही मिळाले तर काय बहार होईल त्याने वैभव मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शिक्षक होता म्हणून पुस्तकांचाच व्यवसाय त्याने पत्करला. स्वतः लिहू लागला लिहिलेली पुस्तके विकू लागली. शाळा शाळा हिंडू लागला. आज तो लक्षाधीश आहे. वैभव त्याच्या पायाशी लोळते आहे..
महापुरुषांच्या जीवनात हेच घडले आहे. नेपोलियन म्हणे, 'माझ्या शब्दकोशात अशक्य शब्दच नाही. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी नऊ हजारवेळा प्रयोग केले आणि आपल्या परिश्रमाने आणि चिकाटीने हा प्रयोग सफल करून दाखवला. मादाम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावताना असेच अथक प्रयत्न केले. त्यात मृत्यू येण्याची शक्यता असूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. शेवटी प्रयत्नांनी परमेश्वर मिळालाच मिळाला. न्यूटनचेही उदाहरण हेच सांगते. सतत तीस वर्षे अहोरात्र प्रयत्न करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याने जगापुढे मांडला.
वैज्ञानिकांप्रमाणेच इतरांची उदाहरणे घेता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत खडतर परिश्रमातून महाराष्ट्रात स्वराज्याची संस्थापना केली. क्रांतिकारकांपासून तो टिळक गांधीपर्यंत अनेकांनी अविरत कष्ट सोसले तुरुंगवास सहन केला तेव्हा स्वराज्याची प्राप्ती झाली. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी लोकांचा छळ सहन करूनही समाजसेवेचे व्रत कायम ठेवले म्हणून आज स्त्रियांच्या शिक्षणाचा एवढा प्रसार दिसतो आहे. डॉ. आंबेडकरांगे दलितांना वर उठवण्याच्या कार्यात केवढेतरी अपार कष्ट सहन केले आहेत.
जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो, त्यात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न केलेच पाहिजेत. नशिबात असेल तसे घडेल हे म्हणणे म्हणजे दैववाद होय. आपण म्हणू तसे घडवून दाखवू प्रयत्नवाद आपण स्वीकारला पाहिजे. दैववादाने माणूस कर्तव्यशून्य बनतो, तर प्रयत्नवादाने कर्तृत्वशाली बनतो.
दाणे पेरलेच नाहीत तर फळ मिळणार कसे? एखाद्या वेळी मात्र माणसाच्या प्रयत्नाला यश मिळत नाही हे खरे आहे. पण त्यामुळे प्रयत्न सोडून देणे चूक ठरते. टिळक-भगतसिंगांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यादेखत स्वराज्य मिळाले नाही, म्हणून त्यांचे प्रयत्न वाया गेले असे म्हणता येत नाही. गांधींनी मिळवलेल्या स्वराज्याचा पाया म्हणजे टिळक भगतसिंगांचे प्रयत्न होत.
जपान जर्मनी ही राष्ट्रे म्हणजे आपले भाग्य घडविणाऱ्या देशांचे ताजे व आदर्श उदाहरण होय. अणुबाँबमुळे दुसऱ्या महायुद्धात जपान बेचिराख झाला होता. पण या गोष्टीला पत्रास वर्षेही लोटली नाहीत तोच जपान फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उठून उभा झाला आहे आणि औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. याच महायुद्धात उद्ध्वस्त झालेल् आणि शकले पडलेला जर्मनी पुन्हा एकवटला व जगाला भारी झाला. कारण पराभवाने ते खचले नाहीत, आम्हीच अमुचे भाग्यविधाता ही श्रद्धा उरी बाळगून ताठ मानेने जगापुढे आले. कोणताही दगड पहिल्या घणाने फुटत नाही, पण तो कच्चा मात्र होतो व त्यामुळेच नंतरच्या घणांनी फुटतो म्हणून पहिला पण वाया गेला असे म्हणता येत नाही. पण यासाठी प्रयत्न चिकाटीने केले पाहिजेत. फळाची आशा न ठेवता केले पाहिजेत. यश निश्चित येईल. कदाचित उशिरा येईलपण निश्चित येईल. 'केल्याने होत आहे रे' कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि ऋद्धिसिद्धी उद्योगाच्याच घरी पाणी भरतात. ज्याला आपले भाग्य घडवायचे असेल त्याने विराट श्रमसूर्याच्या कक्षी “जाळित यावे, घडवित यावे संहारावे, उभवित यावे स्वतःस उजळित मुक्त फिरावें कारण आम्हीच अमुचे भाग्यविधाता !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा