epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

बस स्थानकावर एक तास.

 बस स्थानकावर एक तास.  

 'अनेक भाषा अनेक भाई, अनेक वेशांची नवलाई, परिसंवांची एकच आई एक फुलाच्या विविध पाकळ्या, भेदाचा नच लेश' कुसुमाग्रज याचा जिवंत प्रत्यय जर कुठे येत असेल तर तो बसस्थानकावर. 

             मी बसस्थानकावर बसची वाट पाहत बसलो होतो. प्रवासी येत होते, जात होते. कुठून इतके लोक येतात आणि कुठे जातात हा प्रश्न माझ्या मी घोळवत होतो. कुठली तरी बस स्थानकावर लागताच एकच धांदल सुरू झाली. कंडक्टर तिकिटे देण्यासाठी उभा राहला. वास्तविक लोकांनी रांगेने तिकिट घ्यायला हवे होते. पण तसे न घडता सर्वांनी कंडक्टरला गराडा घातला. एकच गलका सुरू झाला. तशा परिस्थितीतही तो कंडक्टर स्थितप्रज्ञासारखा काम करताना पाहून मला खरोखरीच कौतुक वाटले. नंतर बसमध्ये शिरण्यासाठी दाराशी एकच झुंबड उडाली. त्यामुळे कुणाचे सामान पडत होते तर कुणी स्वतःचा तोल सांभाळता न आल्यामुळे जमिनीवर पडत होते. खांद्यावर मूल असलेल्या बाईचे तर हाल मला पाहवत नव्हते. शेवटी मी जागचा उठलो. त्या मुलाला घेतले. तेव्हा कुठे ती बाई आत शिरू शकली. बसच्या आत जागेसाठी भांडणे सुरूच होती. काही लोकांनी तिकिट न काढता आपले सामान बसच्या आत ठेवले होते. तिकिट काढल्यावर त्यांना जागा मिळाली. पण ज्यांनी आधी तिकिट काढून नंतर बसमध्ये बसण्याचा माणुसकीचा नियम पाळला त्यांना मात्र जागा मिळाली नाही. त्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागला. कडेवर मूल असलेल्या बाईलादेखील बसण्याकरिता जागा देण्याचे सौजन्य कुणी तरुणाने दाखवले नाही. कंडक्टरची तिकिटविक्री संपताच त्याने बेल दिली आणि आतील प्रवाशांना पोटात घेऊन ती बस चालती झाली. थोडा वेळ स्थानकावर शांतता पसरली. 

                  बसला वेळ असल्यामुळे चहा घेण्यासाठी मी उपहारगृहात गेलो. तेथेही कोलाहल सुरू होता. कोंदट जागेत धूर पसरला होता. कळकट कपड्यातले नोकर चहा, पाणी देत होते. तोंडाने ओरडत होते. माशा घोंघावत होत्या. कसाबसा तो चहा मी घशाखाली ढकलला आणि बाहेर पडलो. 

                मी बुकस्टॉलवर पुस्तके चाळत उभा राहलो. तेवद्यात एका गृहस्थाने समोरच असलेल्या फळांच्या दुकानातून केळी घेतली, खाल्ली आणि केळीचे साल तिथेच टाकून पुढे निघून गेला. त्यावर पाय पडून एक प्रवासी खाली पडता पडता वाचला. कचरा टाकण्यासाठी पेटी असतानाही लोक त्याचा वापर करत नाहीत. हे पाहून खेद वाटला. कधी सुधारणा होणार आपल्यात? 

               मी परत बाकावर येऊन बसलो. तोच एका बसजवळ खूप गर्दी दिसली. गोंधळ ऐकू आला. लोक जोरजोरात ओरडत होते. कुणाला तरी मारत होते. तसाच उठून मी तिकडे धावलो. गर्दीत शिरलो. ज्या मुलाला लोक मारत होते त्या मुलाला मी पहिल्या बसमध्ये चढताना पाहले होते. मग हा परत इथे कसा आला याचे मला नवल वाटले. तो खिसेकापू होता. बसमध्ये गर्दी झाली की तोही बसमध्ये शिरायचा आणि लोकांच्या खिशातले पैसे चोरायचा. म्हणून तो प्रत्येकबसमध्ये चढताना दिसे. यावेळी पैसे चोरत असतानाच लोकांनी त्याला पाहले होते. म्हणून ते त्याला बदडून काढत होते. 

              मुत्रीघराचा वास तर असा होता. तेथील स्वच्छतेसाठी नेमून दिलेला कामगार कधीच जागेवर नसतो. असे कळले. कर्तव्याबाबत आम्ही किती बेफिकीर असतो नाही? यामुळेच जगातले लोक भारताबद्दल म्हणतात, 'भारत म्हणजे पवित्र वचने म्हणणाऱ्या लोकांचा ओंगळवाणा देश यावरुन मला एक गमतीचा संवाद आठवला. एक विचारतो, 'गाव कोणीकडे आहे हे रात्रीच्या वेळी कसं ओळखावं?' दुसरा उत्तर देतो, 'दिव्याचं टिमटिमार्ण दिसलं की समजावं गाव तिकडे आहे.' मग पहिला विचारतो, 'गाव जवळ आलं हे कसं ओळखावं?' दुसरा उत्तर देतो, 'कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला की समजावं, गाव जवळ आलं. पहिला पुन्हा प्रश्न विचारतो, 'आपण नेमकं गावात आलो हे कसं ओळखावं?' दुसरा शांतपणे उत्तर देतो, 'नाकाला फडकं लावावं लागलं की समजावं गावात पोचलो.' शाळेत आम्ही रोज प्रतिज्ञा म्हणत असतो, "भारत माझा देश आहे.' पण ह्याचा आपण थोडातरी विचार करतो काय की जर भारत माझा असेल तर इतका घाणेरडा का? 

                मनातल्या विचारांप्रमाणेच बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. कोलाहलात आणि गोंगाटातही मन हलवून सोडणारी काही माणुसकीची दृश्ये नजरेला पडत होती. कुणी हिंदू मुस्लिम स्त्रीला आधार देत होता. कुणी मुसलमान हिंदू भिकाऱ्याला मदत करत होता अशा या सगळ्या दृश्यांना टिपताटिपता एक तास सहज निघून गेला. माझी बस आलेली होती. विशेष गर्दी नसल्यामुळे चटकन तिकिट घेऊन मी बसमध्ये शिरलो. खिडकीजवळ बसून बसस्थानकाकडे पाहू लागलो. 

           बसने स्थानक सोडले तसतसे ते माझ्या नजरेपासून दूरदूर होत गेले, आणि मनात उगीचच साध्या संदर्भात तुकोबा डोकावून गेला, 'आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा रामराम घ्यावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा