पावसाळी सहल
पाऊस आला वारा आला थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचपान लागले नाचू.
ह्या शांता शेळके यांच्या काव्यपंक्ती मनात घोळवत घोळवत मी चालू लागलो. भी सहज म्हणून सहलीला निघालो होतो. पावसाळा होता पण मी छत्री, रेनकोट वगैरे काहीही घेतलं नव्हते. कारण पावसानं माझी फसगत केली होती. गेले तीन दिवसापासून रेनकोट घेऊन मी बाहेर पडत असे. दुपारचे ढग येत खूप अंधार होई. पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे आणि पावसाचे सारे अवसान कुठल्या कुठे निघून जाई. एकाही थेंबाने न भिजलेला रेनकोट घेऊन रोज परत यावे लागे. आजही मी सहलीला निघालो तेव्हा आभाळात ढग होतेच. पण रोजच्याप्रमाणेच आजही पाऊस येणार नाही याची मला जणू खात्री होती.
मी एकटाच सहलीला निघालो होतो. सहलीला जाणे याबद्दल माझ्या काही विशिष्ट कल्पना आहेत. एकतर मी केव्हाही फिरायला जात असतो. फेरफटका मारण्याच्या मजेला वेळेचं बंधन मला मान्य नाही. फिरण्यात संध्याकाळी जशी गंमत असते तशी सकाळीही असते असं माझं मत आहे. तसंच मी व्यायामासाठी सहलीला कधीच जात नाही. धावपळीच्या चालण्यानं व्यायाम होईल पण त्यात फिरण्याची मौज मिळायची नाही. व्यायाम हवा असेल तर फिरण्याची बुद्धी टाकली पाहिजे आणि सहलीला जायचे असेल तर व्यायामाची कल्पना मनात ठेवता कामा नये. माझं आणखीही एक मत असं आहे की चार मित्रांसोबत गप्पा मारत फिरायला जाणं ही देखील खरी सहल नव्हे. अशा फिरण्यात घड गप्पाही होत नाहीत न धड सहलही होत नाही. म्हणून सहलीला मी आपला एकटाच जात असतो. तसंच सहलीला विशिष्ट ठिकाणी जाऊन परतायचं ही कल्पनाही मला चुकीची वाटते. कारण यामुळं त्या ठिकाणी जाऊन पोचणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटतं. म्हणून आजूबाजूचं सौंदर्य नजरेआड करून आपण तिथं पोचतो. खरं तर सौंदर्याचा आस्वाद घेत घेत रमतगमत जाणं म्हणजे खरी सहल. पावसाळ्यात अशा खऱ्या सहलीचा आनंद उपभोगायला मी एकटाच निघालो होतो.
गावाबाहेर आलो. आभाळात ढंग होतेच. पण आता जोराचा वाराही सुटला होता. वाप्यानं पाहता पाहता वादळाचं रूप घेतलं. आडवंतिडवं पळत सुटलेलं वारं माती उडवू लागलं धुकं पडावं तसं सारं अंधारून आलं होतं. वाऱ्यानं उडवलेली धूळ गगनाला जाऊन भिडत होती. ढग गर्जना करू लागले. बघता बघता विजाही चमकू लागल्या. वाऱ्याचा जोर एवढा वाढला की समोर उभं असलेलं एक चिंचेचं जुनं झाड एकसारखं करकरू लागलं. एवढ्यात बीज नागासारखी सळसळली. काळ्या पाटीवर पेन्सिलनं रेघ ओढावी तशी वारा पुन्हा जोरात वाहू लागला. पाऊस वाजत आला आणि मातीचा खरपूस वास दरवळून गेला. पाऊस आडवातिडवा झोडू लागला. पायाखाली पाणी आलं. ते नुसतं साचलं नव्हतं. त्याचे ओहोळ बनले होते. मी त्यातून चालत होतो. त्या वादळी परिस्थितीतही मला अननुभूत असा आनंद वाटायला लागला. .
आतापर्यंत मी कितीतरी पावसाळे पाहले होते, मुसळधार पावसाचे दृश्य तर शेकडो वेळा पाहले होते, पण अशा पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद मी पहिल्यानेच अनुभवत होतो. निसर्गाच्या भव्य व प्रचंड आंदोलनात समरस होण्याचा, एकरूप होण्याचा आनंद केवढा मोठाआहे याची त्या दिवशी मला कल्पना आली. पावसाचा माझ्या चेहऱ्यावर होणारा सपासप मारा मला अतिशय सुखद वाटू लागला. पाण्याच्या अवखळ ओहळातून पाणी तुडवत चालताना मी विलक्षण आनंदाचा अनुभव घेऊ लागलो. आकाशातून सहस्त्र धारांनी वर्षाव होत होता. सारी सृष्टी पाण्याने न्हाऊन निघाली होती. सृष्टीबरोबर मलाही अभ्यंगस्नान घडत होते. आणि त्या चिंब भिजून जाण्यात अननुभूत आनंद वाटत होता.
त्यावेळचा प्रत्येक क्षण जीवनाचा अर्थ उलगडून दाखवत होता. चिंचेचे झाड आपले हात उभारून एखाद्या वीराप्रमाणे डोक्यावर वृष्टी झेलत होते. क्षितिजाकडे पाहावे तर दृष्टी धुक्यात बुडून जात होती. झाडे हिरवी, डोंगर श्यामल आणि हवा धूसर तलम होती. गढूळ पाण्यातूनही छोटे खडे उसळत खिदळत पोहत होते. एक पक्षी तर पंख भिजून गेले तरीही अंगे चोरून तिथेच बसून राहला होता. वाहत्या पाण्यावर पडणारे पावसाचे थेंब पाण्यावर वलयांची नक्षी कोरत होते.
सहल संपल्यावर मी घरी आलो तेव्हा वरून पाण्याने पूर्ण भिजलो होतो आणि आतून विलक्षण प्रसन्नतेने चिंब झालो होतो. मला जणू जीवनाचे मर्मच कळले होते. वाटले, जीविताच्या रस्त्यावरूनही धावतपळत जाण्याऐवजी रमतगमत स्वच्छंदानं सर्व सुंदर वस्तूंचा आस्वाद घेत घेत सहल करावी. मग सुखाचा शोध निराळा करायला नको. त्या पर्जन्यधारांकडे पाहून अचानक महानोरांच्या ओळी ओठावर आल्या. ‘ह्या नभाने या भुंईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा