epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

उन्हाळ्यातील दुपार

 उन्हाळ्यातील दुपार

                    "रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल ह्या आशेवर असह्य संकटाचे आघात सोसणाऱ्या धीरोदात्त माणसांचे प्रतीक म्हणजे उन्हाळ्यातील दुपार होय. 

                   एखाद्या हुकुमशहाप्रमाणे उन्हाळ्यातील दुपारचे ऊन आपल्या टाचेखाली साऱ्यांना चिरडत असते आणि धरित्री त्याचे घाव आपल्या छातीवर झेलत असते. धरित्रीच्या पिकाशी नात सांगणारी माणसं यावेळी तिची विचारपूसही करायला तयार नसतात. ती आपल्या घराच्या दारंखिडक्या बंद करून कूलरच्या थंडाव्यात टी. व्ही. पाहत बसलेले असतात. कधी-कधी आइसक्रीमचा आस्वाद घेतात आणि सरबतासारखे थंड पेय तर असतेच असते.

                   उन्हाळ्यात रॉकेल पेटून एकदम भडकणाऱ्या स्टोव्हप्रमाणे सूर्य उगवतानाच पेटून उठतो. आणि दुपारी तर प्रत्येक जण त्या जुलुमी हुकुमशहापुढे अगतिक झालेला असतो. रस्त्यावरचे नळ कोरडे शुष्क होऊन नुसते तापत राहतात. तारेच्या खांबाची सावलीही केविलवाणी होऊन जाते. दूर गाडीचे एंजीन फाटक्या गळ्याने टाहो फोडत असते. उन्हाने माखलेली क्षितिजे पांढरी फटफटीत दिसतात. माळावर गवताचे चुकार पातेही शिल्लक दिसत नाही. पोळून निघालेली टेकडी एखाद्या पापडासारखी तांबूस करडी दिसते. दृष्टी पडेल तिथे सारे ओसाड व उजाड दिसते, कुठेही काही हिरवे नसते, ओले नसते- सारे तापून निघालेले, सारे जळून गेलेले. सूर्यकिरणांचा सहस्त्र वाद्यांचा चाबूक त्यांना फटकाऱ्यामागून फटकारे मारत असतो. घरे, वाटा, कोळपलेली झाडे सारीच्या सारी मुकाट्याने मार खात उभी राहतात. ते प्रहार तटस्थ स्तब्धतेनं दिले जातात आणि निःशब्द सहनशीलतेनं सोसले जातात. 

                  आणि हे आघात सहन करणारी धरित्री? एकदा ऐन उन्हाळ्यात दुपारी मी दार उघडून बाहेर आलो. दृष्टीच्या सीमेपर्यंत काळी शुष्क जमीन पसरली होती. शब्दांच्या पलीकडे जिचे दारिद्रय गेले आहे अशा स्त्रीच्या अंगावरील फाटक्या चिंध्यांप्रमाणे वाळून कोळ झालेल्या गवताचे अवशेष वाऱ्याने उगीचच भुरभुरत होते. दूरवर नजर फेकली तर मधूनच मृगजळाचे तरंग दिसतहोते. ती काळभोर जमीन त्यामुळे तळल्यासारखी खोलवर हलल्यासारखी वाटत होती. स्तब्धता पसरली होती. धरित्रीच्या जिवाची लाही लाही होत होती. तिचा आला होता. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जणू विमूढपणे निश्चल तभी होती. सूर्याचा दूत अजून एक स्वामित्व प्रस्थापित विजयोन्मादाने तिच्या हृदयावर नाचत होते. वर निळे अथांग आकाश सरले होते. त्याच्या निळ्या ओलाव्यासाठी तिचा जीव पिपासला होता. आत्यंतिक दुःखाशी धडपडत झगडणारा धैर्यशाली जीव पिपासला होता. आत्यंतिक दुःखाशी धडपडत झगडणारा धैर्यशाली जीव म्हणजे धरित्री, असे मला वाटून गेले. थोडी दूरवर नजर टाकली तो मला एक अद्भुत चमत्कार आढळला. सूर्याच्या दाहक तडाख्यात जिथे सारेच मरगळून पडले होते तिथे तो दूरवरचा एक पिंपळ मात्र लक्षावधं। पानांनी सळसळत होता. ती सारीच्या सारी पाने हिरवीकंच होती. त्यावर विलक्षण लकाकी होती. तान्ह्या मुलाच्या तळव्यासारखी ती पाने नाजूक कोवळी असूनही निखाऱ्यासारखे कडक ऊन सहज पचवून शकत होती. तो पिंपळ रसानं रसरसलेला होता, हिरवेपणानं मुसमुसत होता. याचे कारण ज्या भूमीशी तो निगडित झाला होता त्या भूमीत त्याची बीजे खोलखोल रुजली होती. त्या भूमीचे सारे सत्त्व त्याचे होते आणि ते सत्त्व चिरतारुण्याचे होते, चिरसौंदर्यांचे होते. उन्हात सारे होरपळत असताना एकटाच पिंपळ निर्धारानं हसत उभा होता आणि त्याच्या चिरसौंदर्याचे मर्म मला गवसले होते. ओनिवास कुळकर्णी प्रमाणे आपल्यालाही 'मनातल्या उन्हात उन्हाची विविध रूपे साकार होतात.

                 घराची दारे घट्ट लावलेली, एखाद्या फटीतून येणारा प्रकाशाचा कवडसा, घरात वाळ्याचा सुगंध, विश्रांती घेत असलेली माणसे, बाहेर विजयोन्मादानं तळपणारा डांबरी रस्ता, भेगा पडून आर्त झालेली भूमी, माना मोडून पडलेले वृक्ष, भर उन्हात लग्नातील जेवणावळ ही सारी दृश्ये मनासमोर तळपतात. माध्यान्हीच्या वेळेत समतोलपणाचे स्वारस्य आणि गंभीरतेचा आनंद साठवलेला आहे. तीत उत्शृंखलपणा नाही, भडकपणा नाही. अभिजातपणाला साजेसे सौंदर्य आहे, प्रगल्भ हृदयाप्रमाणे तिची दुःखे निःशब्द आहेत, आणि तिचा आनंदही शांत आहे." म्हणूनच तिच्यातून जीवनरस घेणारा पिंपळवृक्ष चिरतरुण आहे, चिरसौंदर्याचे प्रतीक आहे. तो संदेश देत आहे, "ज्याची पाळेमुळे आपल्या भूमीत खोल खोल रुजतील तोच चिरतरुण होईल, त्याला कुठल्याही तप्त उन्हाचे भय नाही.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा