सत्यमेव जयते
'केवळ सत्याचाच विजय होतों खरं आहे काय?
सत्यवर्तन कशाला म्हणावे यासंबंधीची महान तत्त्वे महात्मा फुल्यांनी 'सार्वजनिक सत्यधर्म मध्ये गुंफली आहेत, ती खरोखरच आदरणीय व आचरणीय आहेत यांत शंका नाही. पण फक्त सत्याचाच विजय होतो असे त्यात कुठेही नमूद नाही.
पौराणिक काळात बळी नावाचा अत्यंत सद्गुणी राजा होऊन गेला. तो इतका पुण्यप्रतापी होता की त्यामुळे इंद्रसिंहासन डळमळीत झाले. आपले इंद्रपद जाणार अशी इंद्राला भीती वाटू लागली. त्याचा सद्गुणांनी व पुण्यकार्याने पराभव करणे इंद्वाला अशक्य होऊन बसले. विष्णू इंद्राच्या मदतीला गेला. बळीराजाकडे जाऊन विष्णूने बटूचे रूप घेऊन बळी राजाला तीन पावलांच्या भूमीचे दान मागितले. बळीराजाने उदारपणे दान दिले. वामनाने एका पावलाने स्वर्ग व्यापला. दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल उपकारकर्त्या बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात घातले. सात्त्विक बळीराजाला कपटाने पाताळात घालणारा वामन देवाचा पाचवा अवतार ठरला, पूजनीय बनला तरीही म्हणायचे सत्यमेव जयते?
कौरव मारले गेले, पण पांडवांचेही सारे पुत्र मारले गेले. कृष्णामुळे परिक्षिती कसाबसा वाचला. त्यालाही पुढे तक्षकाने ठार केले. मरणाहूनही भीषण वेदना उराशी बाळगून पांडव जिवंत राहतात, ह्यालाच म्हणायचे का सत्यमेव जयते?
आजचे चित्र तरी काय सांगते? एक पुढारी मंत्रिपदासाठी आपला पक्ष सोडून विरोधकांना जाऊन मिळतो. तेथून पुन्हा आपल्या पक्षात येतो आणि परत मुख्यमंत्री बनतो. त्याने दोन्ही पक्षांचा विश्वासघात केलेला असतो. याउलट जिवाभावाने आपल्या पक्षाची सेवा मनोभावे करणारे तसेच कुजत पडतात. आणि गंमत अशी की त्यांच्याच विरुद्ध पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला जातो. दुसरे पक्षही असे की पक्षांतर करणाऱ्यालाच निवडणुकीचे तिकिट देतात आणि निवडून आणतात. प्रामाणिक कार्यकर्त्याला विचारलेही जात नाही. हेच का सत्यमेव जयते? की 'सत्तामेव जयते?
राजकारण वारांगनेसारखे असते. म्हणून त्याला सत्यमेव जयते चे ब्रीद लागू पडत नाही असे कुणी म्हणेल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर तर ठीक आहे, आपण समाजकारणाच्या संदर्भात याचा विचार करू. दररोज नवविवाहिता हुंडाबळी होत आहेत. सासरच्या जाचाला कंटाळून कधी कधी त्या आत्महत्या करतात तर कधी कधी सासरची माणसेच त्यांना पेटवून देतात. शंभरपैकी पाचदहा केसेस कोर्टात येतात. उरलेल्या नव्वद हुंडाबळींचं काय झालं? उमलत्या संसाराची सुखद स्वप्न पाहणारी नवविवाहिता स्वर्गीय स्वप्नांसोबत स्वतःही स्वर्गवासी होते, कोळसा बनून जाते. तिच्या बाबतीत कुठे आहे सत्यमेव जयते ?
बलात्काराची प्रकरणे तर याहून भीषण असतात. स्त्रीवर बलात्कार होतो. ती आत्महत्या करते किंवा बलात्कारानंतर गुंड लोक तिला जिवे मारुन टाकतात. जगलीवाचलीच तर सारे आयुष्य तिला अपमानित मनाने व अपराधीपणाने घालवावे लागते. कोर्टात केस केली तर तिच्याच अब्रूचे धिंडवडे निघतात. पती आणि पिताही तिला झिडकारतात. म्हणून अशा केसेस कोर्टाकडे फारशा येतच नाहीत. आल्या तरी पैशाच्या जोरावर पुरावे नष्ट करून बलात्कारी निर्दोष सुटतात. दारूच्या पार्ट्स उडवतात. पुन्हा बलात्काराला मोकळे होतात.
वास्तव जीवनाचे प्रतिबिंब सिनेमातही उमटते. कुठलाही सिनेमा घ्या, सत्यमेव जयते पेक्षा सत्तामेव जयतेच अधिक आढळून येईल. याचे कारण वास्तवातही तसेच घडत असते. मला 'आक्रोश' सिनेमा आठवतो. एका विवाहितेवर बलात्कार होतो आणि त्यानंतर तिला मारून टाकण्यात येते. बलात्कारी धनाधीश व सत्ताधीश आहेत. बलात्कार कुणी केला हे गावाला ठाऊक आहे पण कुणीही याबद्दल बोलत नाही. उलट पतीनेच पत्नीचा खून केल्याचा आळ पतीवर घेतला जातो. पती देखील काहीही बोलत नाही, जणू तो मुका झाला आहे. आपण काही बोललो तर हे धनाधीश लोक हालहाल करून आपलाही जीव घेतील याची सर्वांनाच भीती आहे. ही त्यांची भीती खरी आहे कारण एक वार्ताहर जेव्हा त्यांची नावे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कायमचेच नाहीसे केले जाते. बलात्कारितेचा पती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना अग्नी द्यायला येतो. त्याला दिसते की आता आपली लहानगी बहीणही तारुण्यात आली आहे. हे क्रूर लांडगे तिचाही आपल्या पत्नीसारखाच घास घेतील याची त्याला जाणीव होताच तिला तो कुऱ्हाडीने मारून टाकतो तिचा कसलाही अपराध नसताना. इथे हा सिनेमा संपतो. यात कुठं सापडतं 'सत्यमेव जयते?' हा एकच नव्हे तर बहुतेक सारे चित्रपट हेच सांगून जातात. प्रतिघात असो, अकेला असो किंवा अत्यंत लोकप्रिय झालेला 'शोले' असो, जेव्हा अनेक चांगल्याचे जीव जातात तेव्हा कुठे एखादा वाईट निकालात निघतो.
खरे की 'सत्यमेव जयते' हे पूर्णपणेच असत्य आहे असेही नाही. येशू ख्रिस्ताला लोकांनी सूळावर चढवले पण मृत्यूनंतर त्याच्याच विचारांचा विजय झाला. " सॉक्रेटिसला सत्यकथनाबद्दल विष देण्यात आले. सत्य दडपले गेले असे वाटले, पण अंती त्याच्याही विचारांचा विजयच झाला. सत्य सूर्यासारखे असते आणि नका बाळांनो डगमगू चंद्र-सूर्यावरील जाई ढगू हेही खरे वाटू लागते. मात्र अनुभावान्ती 'सत्यमेव जयतें' हे अर्धसत्य असल्याचे जाणवते, समाजातले ते वास्तव नव्हे, पण आदर्श आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा