महाराष्ट्रगीत
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।धृ।।
गगनभेदी गिरिविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ।
अटकेपरि जेथील तुरंगि जल पिणे।
तेथ अडे काय जलाशय नंदाविणे ।
पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ।।
प्रिय आमुचा....।।१।।
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळि नुरे।
नृमणीची कूस जिथे खनि खनि ठरे।
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ।।
प्रिय आमुचा ... ।।२।।
नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूंचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।।
प्रिय आमुचा...।।३।।
विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती।
शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती।
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ।।
प्रिय आमुचा...।।४।।
गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो।
स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरीं वसो ।
वचनिं लेखनिंहि मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्र-धर्म मर्म मनिं वसो ।
देह पडो तत्कारणिं ही असे स्पृहा ।।
प्रिय आमुचा....।।५।।
- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा