epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

केल्याने देशाटन / प्रवास पाहावा करुन

                केल्याने देशाटन / प्रवास पाहावा करुन         

                               






       

            स्वामी विवेकानंदानी तरुणांना एक मोलाचा संदेश दिला आहे, प्रवास करा, देशाटन करा जगभर फिरा. आपल्या देशाच्या अभ्युदयाचे गुपित देशाटनात दडले आहे. याचे कारण जोवर आपण इतरांची प्रगती पहात नाही तोवर आपल्या अधोगतीचा विचारही आपल्या मनात येणार नाही त्यांच्यासारखे उन्नत होण्याची जिद्द आपल्यात निर्माण होणार नाही, आत्म्याची विशालता आणि राष्ट्राचे वैभवही आपल्याला मिळवता येणार नाही.

                        देशाटन करायचे म्हणजे रेल्वेचा प्रवास आलाच. रेल्वेतला प्रवास माणसाला कितीतरी शहाणपणा देऊन जातो. डब्यात गर्दी असते. आपण आत घुसू पाहतो. डब्यातले लोक आपल्याला आत येऊ देत नाहीत. धक्काबुक्की सुरू होते. जोरात धक्का मारुन आण एखाद्याच्या पायावर आपला पाय देऊन आपण आत शिरतो. गाडी शिटी देते. सिग्नल मान झुकवतो. गाडी चालू लागते, वेग घेते. प्लॅटफॉर्मवर आपल्या माणसांच्या डोळ्यात पाणी आले असते. रुमाल फडफडवून ते निरोप देतात. आत यायला प्रतिकार करणारी माणसे आता आपल्याला त्यांच्यातले समजतात. गप्पागोष्टी करतात. विचारपूस होते. संघर्षाची जागा सहकार्याने घेतली असते. आपण त्यांच्या कुटुंबातलेच एक होऊन जातो. पुढच्या स्टेशनवर आपणही बाहेरच्यांना आत यायला मज्जाव करतो. 'बाहेरच्या' चा आतला झाला म्हणजे माणसात असा अंतर्बाह्य बदल घडून येतो. यावरून एक तत्त्व लक्षात येते की माणसाच्या खऱ्या जाती दोनच, एक आतल्यांची व दुसरी बाहेरच्यांची. मजूर हक्कासाठी कटकटी करतो पण तो मालक बनताच शिस्त व कर्तव्याची भाषा बोलू लागतो. सत्तेविरुद्ध लढणारा पक्ष सत्तारूढ झाला की पूर्वी संप घडवून आणणारा हा पक्ष संप नको म्हणू लागतो, संघर्ष करणारे शांतीवादी बनतात. गो. वि. करंदीकर आपल्या 'आतले आणि बाहेरचें' या लेखात म्हणतात की 'हा आगगाडीतील अनुभव किंवा एखादी मोठी सामाजिक क्रांती या दोन्ही घटना मूलतः एकाच स्वरूपाच्या. दोन्ही कृतींमागील प्रेरणा एकच जागा पहिजे!' मग ती जागा टॉलस्टॉयच्या गोष्टीमधील फक्त सहा फूट असो अगर चर्चिलच्या साम्राज्यस्वप्नातील सहा हजार मैल असो!" 

                             माणूस असे वैश्विक चिंतन करू लागतो. गाडीबाहेर झाडे पळताना दिसतात. दुरून डोंगर साजरे दिसतात. चौकोनी हिरवी शेते आपले लक्ष वेधून घेतात. सुखावह गार वाऱ्याची झुळूक मनाला रोमांचित करते. बा. भ. बोरकरांप्रमाणे आपणही प्रवासात काव्य प्रसवू लागतो. आणि केशवसुतांप्रमाणेच 'क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास' आपणही अनुभवत असतो.

                       अनुपमेय आनंद हा देशाटनाचा दुसरा अपरिहार्य परिणाम होय. सृष्टिदेवीच्या विलक्षण सौदयन आपण थक्क होऊन गेलेलो असतो आणि आपले सारे स्वार्थी विचार, तुच्छ विकार पार गळून पडतात. कन्याकुमारीला जा तेथे समुद्रातच सूर्योदय आणि समुद्रातच सूर्यास्त होतो. सूर्योदय व सूर्यास्त हे दोन्ही काळबिंदू इथे अत्यंत प्रेक्षणीय असतात. जगातील हे एकमेव स्थळ आहे जेथे तीन समुद्रांचे मीलन घडले आहे. येथे पूर्व समुद्रातून चंद्राचा उदय आणि पश्चिम समुद्रात सूर्याचा अस्त एकाच वेळी पाहायला मिळतो. श्रेष्ठ व महान पुरुष आपत्काळी सुद्धा विलक्षण धैयनि वागतो, त्यावेळी त्याच्या मुखावर एक अपूर्व शोभा झळकत असते, तशीच ही सोपा वाटते. अब पहाडावर जा, तेथील सूर्यास्त वेगळाच दिसतो. तेथे नारिंगी, तांबडे, सोनेरी रंग आकाशात मुळीच दिसत नाहीत. सूर्य स्वच्छ पांढन्या रूपेरी रंगाचा दिसतो. हा चंद्र कशावरून नव्हे असा कुणी प्रश्न विचारल्यास त्याला उत्तर देता येत नाही. खंडाळ्याचा घाट पाहा, सह्याद्रीचे डोंगर पहा, परमेश्वर तेथून संदिग्ध भासू लागतो. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. दार्जिलिंगची पहाडराणी पहावी विदेशात जाऊन काप्री बेटावरील देहभान हरवणारी समुद्राची निळाई अनुभवावी.

                        देशाटनाने कलात्मक सौंदर्य पिऊन माणूस तृप्त होतो. वेरुळच्या कैलास लेण्यात शिल्प कौशल्याचा परमोत्कर्ष झाला आहे, तो पाहावा. ताजमहाल पाहून डोळे निववावेत. दौलताबाद किल्याजवळील चांद बोधल्यांची समाधी म्हणजे गुरु मुसलमान व शिष्य हिंदू असे धर्म ऐक्याचे प्रतीक आहे. अशी दृश्ये पाहली की आपले हृदय मातेचे बनून जाते. सारीच तिची लेकरे. हिंदू, मुसलमान, बौद्ध, शीख, ख्रिस्त, पारशी, मद्रासी, बंगाली असे सारे भेद गळून पडतात. 

                       माणूस तेवढा एकच आहे ही अभेद दृष्टी यायला देशाटनासारखा दुसरा उत्तम उपाय नाही. विविध लोकांचा परिचय होतो. त्यातून ज्ञानाची व समजूतदारपणाची देवाणघेवाण होते. एकात्मता हेच अंतिम सत्य याचा साक्षात्कार होतो. देशाचीही बंधने दूर होतात आणि काळाच्याही मर्यादा तुटून जातात. मन विशाल आणि हृदय प्रगल्भ बनते. जपानमधील स्वच्छता आपल्या देशात आणावीशी वाटते. सगळ्या जगाशी आपला ऋणानुबंध जुळतो. जगातील सर्व देशात टिप स्वीकारली जाते पण जपान हा एकमेव देश आहे की जेथे टिप नाकारली जाते. बक्षिसी नाकारुन जपानी माणूस जगातल्या इतर सर्व माणसांहून आपण उंच असल्याचे दाखवून देतो. तेथील गरीब माणूसही सरकारी अनुदान हे भीक समजून नाकारतो आणि भारतात श्रीमंत धेंडेही सरकारी अनुदान मिळवण्यासाठी नाक घासतात. यातून काहीच शिकण्यासारखे नाही काय? कुठे गेला आपला स्वाभिमान? अमेरिकेत जावे तेथील समाजाची धारणा समतेच्या तत्त्वावर झालेली दिसते. तेथे युनिव्हर्सिटीचा माळी युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेंटशी बरोबरीच्या नात्याने वागतो. ही समता आपल्याकडे आणता येणार नाही काय? जपान भर कुठल्याही दुकानात भाव वेगळे सापडत नाहीत. कुणी दुकानदार फसवणार नाही. जास्त पैसे दिले तर परत करतील. काळाबाजार अजिबातच नाही. आपल्या देशात हे शक्य होणार नाही काय?

                        देशाटनाने माणूस असा अंतर्मुख होतो. मनुष्याच्या जगातील विषमता, अधमता आणि कुरुपता नष्ट होऊन माणसे फुलपाखरासारखी सुखी, सुंदर आणि स्वतंत्र व्हावीत अशी तळमळ लागते. आणि नामदेवांच्या शब्दात थोडा बदल करुन म्हणावेसे वाटते. परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण। तैसे घडे मन देशाटने।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा