epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

मराठा तितुका मेळवावा

                          मराठा तितुका मेळवावा



             मराठा हा शब्द जातिवाचकही नाही आणि प्रदेशवाचकही नाही. मराठी बोलणारे ते ते सारे मराठा होत. बंगालमध्ये जा, गुजरातमध्ये जा, पंजाबमध्ये जा, ते लोक तुम्हाला ब्राह्मण, सोनार, माळी असे म्हणणार नाहीत. ते तुम्हाला केवळ मराठा म्हणून ओळखतील. शाहू महाराज मराठा तेवढेच टिळक मराठा, फुले मराठा तेवढेच आंबेडकर मराठा. गुलामनबी आझाद किंवा बॅ. अंतुले मुसलमान नव्हेत, ते मराठा आहेत. अशा सर्व मराठ्यांना एकसंघ करणे आवश्यक आहे. या अर्थाने रामदासांनी 'मराठा तितुका मेळवावा' असे म्हटले. कारण शिवकाळात पराक्रमी मराठे केवळ दुहीमुळे मुसलमानी सत्तेचे गुलाम बनले होते. शिवाजीने इतिहासात प्रथमच या मराठ्यांना संघटित केले व घडवले. 'श्रीशिवछत्रपतींचे कार्य या शेजवलकरांच्या लेखात सांगितल्याप्रमाणे ‘जर कोणाच्या चुकीमुळे, द्रोहामुळे, दुहीमुळे हे राज्य मोडले तर ते पुन्हा उभारू शकतील अशी माणसे त्यांनी तयार केली होती अस्मितेचा, स्वराज्याच्या अभिमानाचा, रुजवून काढलेला माणसांचा ताटवा म्हणजे मराठा तितुका मेळवावा होय. इतर लोकांत सहसा न बौदध्दयोगाला कृति शीलता, त्यागाचा सराव, निलभता, शीलवत्ता, साधेपणा व समत्व या गुणांचा वारसा शिवाजी महाराजांकडून ज्यांना मिळाला ते सारे मराठा होत. त्यांच्या संघटनेची आज गरज आहे. कारण मराठा तितुका मेळवावा.'

                 मराठा सारे एक आहेत म्हणून तेथे अस्पृश्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही. अस्पृश्य हे आमच्याच हाडामासाचे आहेत असे महात्मा फुले याच अथनि म्हणतात. महर्षी शिंदे यांनी ह्याच कार्यात आपले जीवन वेचले. आगरकर असोत की छत्रपती शाहू असोत, या सर्वांनी या एकसंघतेचा पुरस्कार केला. डॉ. आंबेडकरांनी 'अस्पृश्यता हा आमच्या नरदेहावरील कलंक आहे असे स्पष्टपणे सांगून तो आपल्या रक्ताने धुऊन काढण्याची प्रतिज्ञा केली होती. श्री संत ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘म्हणौनि कुळे जाती वर्ण। हे आघवे चि गा अकारण । तुकाराम महाराजही सांगतात, 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगल।' आणि तुकडोजी महाराजांनी हा वरच मागितला आहे हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी। खलनिंदकामनीही 'सत्य-न्याय वसू दे । दे वरचि असा दे।।

                     'मराठा तितुका मेळवावा' यासाठी काही आचारसंहिता पाळावी लागेल. धर्मवाचक किंवा जातिवाचक भेदाभेद तर विसरुनच जावे लागतील पण आर्थिक विषमताही दूर करावी लागेल. नांदोत सुखे गरिब अमिर एकमतानी' असे तुकडोजी महाराज म्हणतात. पण एवढ्याने काही श्रीमंतांचे डोळे उघडत नाहीत किंवा त्यांच्यावर परिणामही होत नाही. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी केला तसाही प्रयोग करावा लागणार आहे. जिवाजीराव शिंदे यांचे संस्थान खालसा होऊन भारतात विलीन झाले होते. त्यामुळे महाराज चिडलेल्या मनःस्थितीत होते. अशावेळी कर्मवीर भाऊराव त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे राजवाडे व जमीन रयतशिक्षण संस्थेकरिता मागितली. महाराजांना ही गोष्ट संमत झाली नाही. तेव्हा भाऊराव म्हणाले की "आपण जमीन दिलीत तर शाळेतील मुले ती ओसाड जमीन फुलाफळांनी बहरून टाकतील आणि राजवाड्यात भरलेल्या शाळेतून एखादा महादजी शिंदे निर्माण होऊन लोकशाहीच्या जमान्यात दिल्लीच्या तख्तावर बसेल. तरीही आपण राजवाडा व जमीन देणार नसाल तर हे लोक या राजवाड्याच्या तुळ्यांचा व बयांचा उपयोग बेवारशी प्रेत जाळण्यास व घरगुती जळण म्हणून करतील. मग त्यांचे काय चीज होईल?" अशा निर्भयतेने ही क्रांती घडून आणावी लागेल.

                  आजच्या मराठ्यात पहावी तेथे दुही आहे. एक मराठा दुसऱ्या मराठ्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवतो आहे. आपल्याच आईबहिणीची इज्जत इभ्रत लुटताना त्याला काही लाजशरमही उरलेली नाही हे जळगावचे वासनाकांड सांगत आहे. आदिकसारखा मंत्रीही विमानात बेशरमपणे वागून भावी पिढीपुढील आदर्श पुसून टाकत आहे. सत्तेची एवढी हा की आपल्याच माणसाची राजकीय हत्त्या करुन त्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे समारंभ साजरे होत आहेत. आमचेच पुढारी आमच्या हातावर तुरी देतात आणि जमलेच तर पाठीमागून सुराही भोसकतात. मराठा तितुका मेळवल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, आणि जिजाये तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत याचा प्रत्यय येणार नाही. 

                 आम्हाला ज्ञानेश्वर-तुकारामादी थोर संतांचा वारसा लाभला आहे. शिवाजीची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. महात्मा फुले ते डॉ. आंबेडकर यांची समाजक्रांतीची दीक्षा आम्हाला मिळालेली आहे. जीजामाता सावित्रीबाई या मातोश्रींच्या मांडीवर आम्ही खेळलो. आहोत. अशा वैभवशाली परंपरेमुळे आमचा अभ्युदय कुणीही अडवू शकत नाही, कारण पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ पण एकच करणे आवश्यक आहे 'मराठा तितुका मेळवावा'

                    मराठा तितुका मेळवणे म्हणजे महाराष्ट्र शक्तिशाली करणे होय. महाराष्ट्र शक्तिशाली बनला की भारत आपोआप शक्तिशाली बनेल. हिमालय संकटात सापडला की सह्याद्री अपरिहार्यपणे त्याच्याकडे धावून जातो, हा इतिहास आहे. कार्य शक्तीने सिद्ध होते. म्हणून शक्तिशाली महाराष्ट्र ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे, आपण 'पराक्रमाचा तमाशा' दाखवलाच पाहिजे.         

                   समाजाच्या उत्कर्षाला जी अनेक प्रकारची धने अवश्य असतात, त्यात मानवधन हे सर्वांत जास्त महत्वाचे आहे. मानधन हेच राष्ट्राचे खरे धन होय. हे धन असल्यावर इतर धने। नसली तरी निर्माण करता येतात किंवा आयात करता येतात. पण हे धन नसेल तर इतर धने असून नसल्यासारखी होतात. तानाजी हा नरदुर्ग नसता तर कोंडाण्याचा सिंहगड झालाच नसता. नरदुर्ग हाच राष्ट्राचा खरा आधार होत. 

                   ' फादर स्टीफन, महानुभाव किंवा ज्ञानेश्वरांसारखे मराठीवर प्रेम करणारे, महात्मा फुले किंवा महर्षी शिंदे यासारखे समतेसाठी जिवाची बाजी लावणारे, शिवाजी किया शाहू महाराजांसारखे लोकसंग्रह करणारे आणि समतेचा ध्वज उंच धरणारे ते सारे मराठे होत. मराठा तितुका मेळवून महाराष्ट्र समर्थ व बलशाली व्हावा आणि त्यांनी गावे - बहु असोत सुंदर संपत्र की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा