epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

श्रेष्ठ मूर्ती

                   'श्रेष्ठ मूर्ती



          एकदा इराणच्या बादशहाने एका आकाराच्या एका वजनाच्या व एकसारख्या दिसणाऱ्या एकाच धातूच्या तीन मूर्ती | बादशहाकडे पाठविल्या व सोबत पत्र दिले. या तीन मूर्तीत श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ असा क्रम लावून मूर्त्या आमच्याकडे पाठवा. जर आपण तसा | क्रम देऊ शकला नाहीत तर शरणागती पत्करल्याचे पत्र सोबत पाठवा म्हणजे आपल्या दरबारातील हुशारी संपली आहे असे आम्ही समजू. बादशहाने पत्र वाचले. तिन्ही मूर्ती न्याहाळल्या. बराच वेळ त्यांचे निरीक्षण केले, परंतु बादशहाला त्या मूर्तीत कोणताही फरक आढळत नव्हता. शेवटी त्याने त्या मूर्ती बिरबलाला दाखविल्या. बिरबलाने त्या आपल्या घरी नेऊन त्यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्ती घेऊन आणि त्यांना क्रम देऊन बिरबल दरबारात हजर झाला. बादशहाने आश्चर्याने विचारले, "बिरबल, तू कसा क्रम लावलास ? मला तर यात काहीच फरक आढळत नाही. बिरबल म्हणाला, 'महाराज ज्या अर्थी या तीन मूर्ती क्रम लावण्यासाठी आपल्या दरबारात आल्या आहेत. त्याअर्थी त्यांच्यात निश्चितच फरक असणार, हे मी ओळखले. शोधता शोधता मला प्रत्येक मूर्तीच्या कानात आतील एक छिद्र दिसले. मी त्या छिद्रातून एक तार आत घातली', "अरे बापरे ! मग काय झालं ?" बादशहाने उत्सुकतेने विचारले, “महाराज, ती तार एका मूर्तीच्या एका कानातून सरळ पोटात घुसली.  तिला मी श्रेष्ठ म्हणून निवडले. कारण ही मूर्ती कानाने सर्व ऐकून पोटात ठेवते, ती सर्वांना सांगत सुटत नाही. त्याची बडबड करीत नाही. तसेच कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करीत नाही अशा माणसांचे नेतृत्व करते. अशी माणसे श्रेष्ठ म्हणून ओळखली जातात म्हणून ही मूर्ती श्रेष्ठ." "अच्छा ! बहोत खूब ! आता दुसऱ्या मूर्तीबद्दल सांग." बिरबल म्हणाला, “ही मध्यम क्रमांकाची मूर्ती आहे. हिच्या कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही एका कानाने ऐकलेले दुसऱ्या कानाने सोडून देणाऱ्या माणसांचे प्रतिनिधित्व करते. ही माणसे जे कानाने ऐकतात. त्याचा उपयोग करीत नाहीत. परंतु कुणाचेही नुकसान करीत नाहीत. म्हणून ती मध्यम प्रतीची असतात.' 'अच्छा! आता कनिष्ठ मूर्तीबद्दल सांग." बादशहा  म्हणाला, ही तिसरी मूर्ती कनिष्ठ, कारण हिच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर पडली. म्हणजे ही कानाने ऐकलेले सर्व लोकांना सांगत सुटणाऱ्या माणसांचे प्रतिनिधित्व करते, ही माणसे कानाने ऐकलेले गुप्त ठेवीत नाहीत. सर्वांना सांगत सुटतात, बडबड करतात, त्यामुळे ती समाजात कनिष्ठ प्रतीची ठरतात. म्हणून ही मूर्ती कनिष्ठ !” बिरबलाने दिलेला निकाल ऐकून बादशहा खूष झाला. त्याने त्या तिन्ही मूर्ती त्यांच्या गळ्यात श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ अशा चिठ्या अडकवून इराणच्या बादशहाकडे पाठवून दिल्या. इराणचा बादशहा खूष झाला. थोड्याच दिवसांत त्याचे बादशहाला स्तुतिपत्र आले. अकबर बादशहाने बिरबलाला बरेच मोठे इनाम देऊन त्याचा गौरव केला.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा