epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

पंडित मोतीलाल नेहरू

            'पंडित मोतीलाल नेहरू 

         भारताचा शिल्पकार': (जन्म ६ मे १८६१, मृत्यू ६ फेब्रुवारी १९३१) - 'सुप्रसिद्ध बंगाली कवीं आनंदयोगी रविंद्रनाथ टागोर आणि पंडित मोतीलाल नेहरू यांचा जन्मदिवस एकच असावा, हा एक विलक्षण योगायोग आहे. ता. ६ मे १८६१ हाच तो दिवस. नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण घराण्यातील पांढरा शुभ्र खादीचा पोशाख, वर काश्मिरी शाली घेतलेला त्यांचा फोटो एका प्रसन्न व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवितो. लहानपणापासून 'कायद्याचा अभ्यास' हा त्यांच्या आवडीचा विषय. हायकोर्ट वकिलीच्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले. मोतीलालजींचा जन्म होण्यापूर्वीच तीन महिने अगोदर त्यांच्या पित्याचे निधन झाले. त्यांचे वडीलबंधू नंदलाल यांनी मोतीलालजींचे पालन, पोषण, शिक्षण केले होते; पण मोतीलालजी वकिलीची परीक्षा पास झाल्यानंतर थोड्याच दिवसात नंदलाल यांचे निधन झाले आणि साऱ्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी मोतीलालजींवर पडली. पण मोतीलालजींनी आपल्या वकिलीच्या व्यवसायावर ती सहजपणे पेलली. त्या व्यवसायात त्यांनी लाखो रुपये मिळविले. युरोपच्या सहली केल्या. पं मोतीलालजींना स्वरुपाराणीपासून पं. जवाहरलाल, विजयालक्ष्मी व कृष्णा हाथीलिंग अशी तीन मुले झाली. मोतीलाल हे स्वतः उदारमतवादी इंग्रजी चालीरिती पाश्चात्य संस्कृतीचे प्रशंसक व समर्थक होते. युरोपमधील अनेक राजदरबारी घराण्यांशी त्याचे निकटचे संबंध होते; पण १९१९ मध्ये पंजाबमध्ये मार्शल लॉ पुकारून इंग्रजी राजसत्तेने जे अश्लाघ्य बर्तन केले, त्यामुळे पं. मोतीलालजींच्या विचारात मोठेच परिवर्तन घडून आले. महात्मा गांधीजींनी शासनाशी पुकारलेल्या असहकाराच्या आंदोलनात ते सामील झाले. भारताच्या स्वांतत्र्यप्राप्तीच्या काँग्रेस पक्षात ते सामील झाले. गांधीजींच्या मवाळ धोरणाशी प्रथम ते सहमत नव्हते; पण नंतर पंडित जवाहरलालजींनी महात्माजींचे नेतृत्व स्वीकारले, तेव्हा सारे नेहरू घराणे गांधीजींच्या विचारांनी भारले गेले. १९२८ साली ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर १९२९ च्या काँग्रेसचे अध्यक्षपद जवाहरलालजींकडे आले. घराण्यातील वारसा राजकीय वारसात परावर्तित झाला. संपूर्ण स्वराज्याचा ठरावही याच अधिवेशनात पास झाला. काँग्रेसला युवा नेतृत्व लाभले. पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण, रशियन राज्यक्रांती, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाशी समन्वय साधण्यासाठी नेहरूंच्या पाठीशी सारे राष्ट्र उभे राहिले. मोतीलालजी मृत्यूपूर्वी गांधीजींना म्हणाले होते, 'मी काही स्वराज्य पहाण्यास जगणार नाही पण तुम्ही मात्र स्वातंत्र्य पाहण्यास जगणार आहात.' ६ फेब्रुवारी १९३१ साली त्यांचे अलाहाबाद येथे निधन झाले. त्या वेळी साऱ्या भारतात शोककळा पसरली. पं. जवाहरलाल नेहरूसारखा सुपुत्र देशाला अर्पण करून पं. मोतीलालजींनी भारताचे भाग्यविधातापद भूषविले. बॅ. चित्तरंजनदार व पं. मोतीलाल नेहरू यांचे मोलाचे सहकार्य म. गांधीजींना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मिळाले, हे भारताचे फार मोठे भाग्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा