epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

पूरग्रस्ताचे मनोगत.

           पूरग्रस्ताचे मनोगत.     



 ह्या गंगेमधी गगन वितळले शुभाशुभांचा फिटे किनारा' या मर्ढेकरांच्या काव्यक्तीची आठवण व्हावी असा एकदा आमच्या गावच्या नदीला महापूर आला होता.

                  पहाटे चार वाजता नदीचे पाणी बाजारात घुसले. यामुळे शेजारच्या अशोकने मला आवाज देऊन मला साखरझोपेतून उठवले. तसाच उठून मी धावतच मंदिरात गेलो. पिंपळाजवळ पोचेपर्यंत रस्त्यावर कंबरभर पाणी झाले होते. मंदिरातल्या महाराजांना मंदिर सोडून चला असा मी आग्रह केला. मला देवाच्या भरवशावर सोडून तुम्ही निघून जा असे ते म्हणाले. लगेच आम्ही लाऊडस्पीकरवरून लोकांना पुरापासून प्राणविण्याबद्दल आवाहन केले. 

                    मला टायटानिक बोटीच्या कॅप्टनची आठवण झाली. समुद्रात बुडणाऱ्या बोटीतून बायकामुलांचे प्राण वाचवता वाचवता तो स्वतः धीरगंभीर वृत्तीने बोटीसोबत समुद्रतळात जाऊन संपला होता, 

                     या वेळपर्यंत परकोटावरुन पाणी गावात शिरले होते. लोक भीतीने सैरावैरा पळत होते. परकोट फुटला आणि गाव चारी बाजूंनी पाण्याने वेढले गेले. महाप्रलय झाला. उषःकाल होता होता काळरात्र झाली. अर्ध्यावर गाव गपकन खाली बसले. किती कुटुंबे, माणसे, गुरे वाहून गेली याची गणतीच नाही. एखाद्याच घरी वंशाचा दिवा उरला असेल.

                     पूर ओसरला, गेले ते गेले पण राहले ते वेड्यासारखे आपल्या उद्ध्वस्त घरासमोर बसून होते. कुणाची आई गेली, कुणाचे पोर गेले, कुणाचे वडील तर कुणाचे सर्वस्व गेले. त्यांचा आकांत हृदय चिरत होता. एक तीन मजली इमारत आमच्या डोळ्यादेखत पाहता पाहता चेंडूसारखी वाहून गेली. त्या इमारतीच्या गच्चीवर सव्वाशे लोकांनी आश्रय घेतला होता. ते सारेच्या सारे पायासकट इमारतीबरोबर वाहून गेले. लोकांनी दोर फेकून, झाडावर बसून पाण्यातून बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण धरणीमातेने त्यांनाही आपल्या उदराशी घेतले. पण काही लोक चमत्कारिक रीत्या वाचले. पाच वर्षे वयाचा मुलगा पुरात वाहत गेला. आणि मंदिराच्या मुकुटाला अडकल्याने वाचला. 

                     पूर हळूहळू ओसरला. सर्व गावभर घरांचा मलबा पडून होता. पाण्यात बुडून मेलेल्या पण वाहत न गेलेल्या दोन गायी रस्त्यावर पडून होत्या. बाजार सायकलचे दुकानच्या दुकान जमिनीत गडप झाले होते. सायकलींची हँडल्स फक्त वर दिसत होती. धान्याची पोती, कित्येक हातठेले, भांडीकुंडी मधूनमधून वर आलेली दिसत होती. एक नवा कोरा ट्रॅक्टर आणि सोसायटीची तिजोरी जमिनीत आकंठ फसली होती. 

                     पुरामुळे टेलिफोन संपर्क तुटला होता. वीजही गेली होती.

                     तरी महापुराची बातमी हा हा म्हणता सर्वदूर पसरली. ताबडतोब पोलीस आले, बीजमंडळाचे अधिकारी आले. सरकारी माणसे आली, मदतीसाठी लष्कर धावून आले आणि आप्तांना पाहण्यासाठी दूरचे जवळपासचे नातलगही आले. आपला माणूस गेल्याचे ऐकून हंबरडा फोडत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुतकी भाव होता, प्रत्येकजण मनातून हलला होता. चिखल आणि घराचा मलबा यामुळे गावातून चालणे कठीण होते. गावात इतकी पाग व दुर्गंधी होती की रोगराईचाही महापूर येतो की काय अशी भीती वाटत होती. काळोख व चिखल यामुळे प्रत्येक कामात अडथळे येत होते. जवान आणि पोलिस मृतांचा शोध व बेपत्ता लोकांचा अंदाज घेत होते. मृतदेह हुतात्मा स्मारक परिसरात आणत होते. नळयोजना उद्ध्वस्त झाल्यामुळे पुरातून वाचलेल्या एकुलत्या एकानळावर पिण्याच्या पाण्यासाठी झुंबड झाली. मदतछावणीत दीड हजार लोकांनी आश्रय घेतला होता. आमच्या गावात पुराचा प्रलय का आला याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. वास्तविक नदीचा पूर म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया.

                   पण आमच्या गावात आलेला महापूर ही नैसर्गिक आपत्ती नव्हती, ती मानवनिर्मित होती. नोकरशाहीची लालफित, बोजड प्रशासकीय नियम, फुटीचे राजकारण आणि वशिल्याचे कंत्राट या सर्वांनी मिळून हा नरसंहार घडवून आणला होता. पण पाहता पाहता आणखी एक चमत्कार घडला. या पुराला लाजवील असा दुसरा एक महापूर आला. हा मदतीचा महापूर होता. आमच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व संस्थांनी, शासकीय नोकरांनी, आणि जवळजवळ प्रत्येकानेच सढळ हाताने कपडे, औषधी, धान्य, दूध, पुस्तके आम्हाला पाठवली. छोट्या छोट्या मुलांनी आपल्या खाऊचे पैसे आमच्यासाठी पाठवले आणि मानवी हृदय महापुराहून कितीतरी भव्य असल्याची साक्ष दिली. शासनाने पैसे दिले. आता नवी घरे, नव्या शाळा, नवी वस्ती तयार होत आहे. अणुबाँबने उद्ध्वस्त झालेल्या जुन्या हिरोशिमा-नागासाकीहून नवे हिरोशिमा-नागासाकी जसे सुंदर आहे, तसे काहीसे आमच्या गावाचे चित्र बदलणार असे वांटू लागले आहे. वाहून गेलेल्या दुर्देवी जीवांचे चिरंतन स्मारक शासन उभारणार आहे असेही कळले.

                        पुराने वाहून नेले त्यापेक्षा कितीतरी अधिक मानवतेच्या महापुराने दिले, पण तरीही त्या जखमा अजून ओल्या आहेत कारण रक्त आणि अश्रू कोणतेही वैभव परत देऊ शकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा