epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

एका कष्टकरी स्त्रीचे मनोगत ...

                              एका कष्टकरी स्त्रीचे मनोगत ..



“दोन दिवस वाट पाहण्यात गेले. दोन दुःखात गेले, हिशोब करते आहे किती राहले आहेत डोईवर उन्हाळे - 

माझं आयुष्य कष्ट करता करता आणि झिजून झिजून असंच संपणार का?

 लहानपणीही माझ्या जीवनाचं वाळवंट झालेलं होतं. आजीसोबत मोलमजुरी करुन जगणारी मी एक उपेक्षित मुलगी. ज्या वयात मैत्रिणींबरोबर खेळायचं, पुस्तक वाचायची, शिक्षण घ्यायचं मी वावरातून शहरात गवताचे भारे डोक्यावर वाहून आणत असे. डोईवरचे गवताचे भारे बाजारात नेताना पंधरा पंधरा वीस वीस कि.मी. अंतर पायी चालून जात असे. पक्वान्नं तर सोडाच पण बाजारात उघडयावर मिळणारी शेव खाण्याचीही माझी इच्छा गरिबीमुळं अतृप्त राहत असे. ताजी भाकर आणि त्यावर दूध हे माझे कधीही पूर्ण न झालेले बालपणीचे स्वप्न होते. 

               लग्न झालं तरी दिवस बदलले नाही. तोही मजूर आणि मीही मजूर, दोघांना मिळणा पैशातून कसाबसा संसार रेटायचा, कधी कुठे दुसऱ्यांच्या घरच्या टी. व्ही. वर एखादा सिनेमा बघायला मिळे. त्यातली नायिका बघून माझ्याही मनात कल्पनांचे तरंग उठत. स्वप्नात चंद्र येई तारे फुलत, रात्र धुंद होई पण नंतर मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. मी लहानपणी गाणी म्हणायची, माझा गळा गोड होता असे सारेच म्हणायचे. पण दारिद्रयानं माझा गळा केव्हा घोटला तेही मला कळलं नाही.

                 कष्टकरी स्त्रियांना तारुण्य हे वय नसतेच. एकतर त्या किशोरी असतात आणि नंतर एकदम प्रौढ होतात. संसार आणि कष्ट यामुळे त्यांचं तारुण्य मधल्यामध्येच लोप पावते. माझे कष्ट करणारे हात हे माझं सर्वस्व एम ते नेहमीच दारिद्रयाकडे गहाण राहलेले, आमच्या संसाराच्या वेलीला शेखर आणि सीमा अशी दोन फुलं आली. जीव त्यांच्यात गुंतला आणि माझ्या व्यथा, वेदना मी विसरुन गेले. 

                 एकदा माझा भाऊ मला भेटला. मी त्याची एकुलती एक बहीण असूनही तो भाऊबिजेला कधी येत नसे. पण यावेळी मात्र मी येईनच असं त्यानं वचन दिलं मी मनात हरखले. दिवाळीला गोडधड थोडं अधिक केलं. नवऱ्याच्या चोरुन भावाकरिता एका मडक्यात लपवून ठेवलं. किशोर सीमानं दुसऱ्या दिवशी सणाचं गोड मागितलं तेव्हा ते सारं तुम्हीच खाऊन संपवून टाकलं असं मी त्यांना सांगितलं. भाऊबिजेला संध्याकाळी मी चंद्राला ओवाळलं आणि भावाची वाट पाहत बसले. रात्र झाली पण तो आला नाही. वाटलं, बस चुकली असेल. येईल उद्या. दोन दिवस वाटेकडे डोळे लावून बसले. मुलं म्हणायची, 'मामा आला नाही का ग? मी डोळ्याला पदर लावायची. पंचमीच्या दिवशी मंडपात गोड काढलं न् पोरांना देऊन टाकलं, दारिद्रयात गणगोतही आपल्याला सोडून जातात. 

                  कुंतीनं कृष्णाला वर मागितला होता. माझ्यावर संकट येऊ दे पण त्यांच्याशी संघर्ष करण्याचं, ती झेलण्याचं धैर्य माझ्यात असू दे. प्रत्येक कष्टकरी स्त्री कुंती आहे असं मला वाटतं. उन्हात कधी कधी थंड वाऱ्याची झुळूक यावी तसे माझ्याही जीवनात हास्यविनोदाचे काही क्षण डोकावून गेले आहेत, नाहीच असं नाही. निवडणुका येतात, सभा भरतात, त्यात माणसांची गर्दी असायला हवी असते. आमच्या मजुरीच्या दुप्पट पैसे देऊन काही प्रतिष्ठित माणसं आम्हाला सभेला नेतात. विशिष्ट खूण झाली की आम्ही टाळ्या वाजवतो. आम्हाला रोजी मिळते म्हणून सभा कोणत्याही पक्षाची असली तरी आम्ही जातो. कारण कष्टकऱ्यांना पक्षच नसतो. 

                  कष्ट न करता आम्हाला जगता आलं असतं काय? जगता आलं असतं पण इमान विकावं लागलं असतं. ते मी विकलं नाही. म्हणून कष्टातही मला सुख वाटते. मुलं अंगाला बिलगतात तेव्हा अश्रूंचीही फुलं होतात. मी देखील उद्धव शेळके यांच्या 'जिद' मधील कौतिकसारखी समाजव्यवस्थेशी टक्कर देत देत जिद्दीने उभी आहे. स्वबळावर संसाराचा गाडा रेटताना मोडून पडण्याचे अनेक प्रसंग आले. पण प्रत्येक वेळी विझता विझता स्वतःला सावरलं आहे. माझे शील आणि स्वाभिमान शिवापलीकडे जपला आहे. पण कधी कधी अशी झुंज देताना मी पार कोसळते, देह जणू निष्प्राण होतो, एकही पाऊल पुढे टाकवत नाही इतकी थकून जाते. वाटतं, आता विश्रांती हवी. किती चालायचे, किती चालायचे अजुनि चालतोचि वाट! माळ हा सरेना विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा