epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

            'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले'


 

           (जन्म ३ जाने. १८३१, मृत्यू १० मार्च १८९७) महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणांच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व दलितोद्धाराचे कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले ह्या सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. पण लग्न झाल्यावर त्यांनी ज्योतिबांकडून आवश्यक ते शिक्षण घेतले. सन १८४८ साली ज्योतिबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समजत असत, सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकमंठ लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल बगैर फेकीत पण सावित्रीबाईंनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले. ज्योतिबाचे जुन्या विचारांचे वडील - कर्मठ लोकांनी त्यांचे कान फुंकल्यामुळे बिथरले आणि त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर घालवून दिले. त्या प्रसंगीही पतीच्या मागे त्या खंबीरपणे इभ्या राहिल्या व त्यांच्याबरोबर त्याही घराबाहेर पडल्या. पुढे त्या काळी 'अस्पृश्य' मानण्यात येणाऱ्या जातीतील मुलांसाठीही ज्योतिबांनी शाळा काढली आणि त्यांनाही शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी जीव ओतून पार पाडली. पुढे फसलेल्या विधवांना आत्महत्येपासून किंवा अपत्यहत्येपासून वाचविण्यासाठी ज्योतिबांनी आपल्या घरात 'बालहत्या प्रतिबंधगृह' काढले तेव्हा अशा तीस-पस्तीस बियांना आईची माया देऊन त्यांची बाळतपणे सुद्धा त्या माऊलीने केली. इतर जातीच्या लोकांची गोष्ट तर सोडूनच द्या पण ज्या माळी जातीत ज्योतिबा व सावित्रीबाई यांचा जन्म झाला होता ते लोकही त्या दोघांचा 'धर्म बुड़वे' म्हणून इल्लेख करु लागले. तरीही सावित्रीबाईंचे मन कधी विचलित झाले नाही. भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. पण, हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, कार्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. म्हणून पतिनिधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे 'समता आंदोलन' पुढे चालू ठेवले. त्या कविताही करीत १८५४ साली त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला 'मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' व ज्योतिबांची भाषणे या पुस्तकाचेही त्यांनी संपादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा