epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

कृतघ्न सिंह

                  कृतघ्न सिंह



             एका घनदाट जंगलात एक सिंह रहात होता. छोट्याछोट्या प्राण्यांची शिकार करून खात होता. एकदा काय झालं, सिंह जंगलात खूपखूप फिरला. पाणवठ्यावर मनसोक्त पाणी प्याला. निळ्याशार थंडगार पाण्यात त्याने एक डुबकी मारली व अंग शहारत काठावर आला. इतक्यात झाडावर लपलेल्या शिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी सूऽसूड करत मागच्या उजव्या पायातून आरपार गेली. सिंहानं रागानं एकच गर्जना केली. सारं जंगल हादरून गेलं. या अकल्पित घटनेनं सिंह घाबरून पळत सुटला. पायातून भळभळा रक्त गळत होते. कशीबशी त्यांने गुहा गाठली. गुहेत जाऊन सिंह आडवा झाला. त्याला खूप वेदना होत होत्या. सिंहाला ताप चढला. जखमी सिंह दोन-चार दिवस तसाच पडून होता. त्याचं जंगलात फिरणं बंद झालं होतं. अन्न पाणी मिळत नव्हतं, गुहेच्या जवळच एक लांडगा रहात होता. दररोज दिसणारा सिंह का बरं दिसत नाही म्हणून उत्सुकतेने त्याने गुहेत डोकावलं तर कण्हत पडलेला आजारी सिंह त्याला दिसला. लांडग्यान लांबूनच त्याची | विचारपूस केली. सिंहाने घडलेला प्रसंग सांगितला. लांडग्याला त्याची दया आली. सिंहाला मदत करण्याचे त्याने ठरविले. आपल्या शिकारीतला थोडा भाग तो सिंहाला देऊ लागला. सिंहाची सेवा करू लागला. सिंहाला बरे वाटले. त्याच्या पायाची जखम भरून आली. पाय बरा झाला. सिंह आणि लांडगा यांच्यात मैत्री झाली. दोघेही जंगलातून सोबतीनं फिरू लागले. दोघं मिळून शिकार करू लागले. सिंहाबरोबर फिरताना लांडग्याला खूप मजा वाटायची. जंगलाचा राजा त्याचा मित्र होता ना! काही दिवस मजेत गेले. पण एक दिवस काय झालं, जंगलात वणवा शिरला. सारं जंगल जळून खाक झालं. जंगलातले प्राणी मरून गेले. गुहेमुळे सिंह आणि लांडगा मात्र वाचले, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दोघांनाही उपवास घडू लागला. शिकार काही मिळेना केवळ पाणी पिऊन दिवस काढणं जमेना. पोटात आग होऊ लागली तसा सिंह लांडग्यावर चिडू लागला. सिंहाच्या | मनातलं कपट लांडग्याच्या लक्षात आले. आता आपली धडगत नाही हे त्यानं ओळखलं. पण, फार उशीर झाला होता लांडग्यांने पळण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. सिंहानं लांडग्याचा खरपूस समाचार घेतला. म्हणून शत्रूला मदत अन् त्याच्याशी मैत्री कधीच करू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा