epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

घराच्या अंगणाचे आत्मवृत्त

                       घराच्या अंगणाचे आत्मवृत्त 



                         पहाट फुलते. उदयाचळी मित्र येतो. आपल्या कोमल किरणांनी मला स्पर्श करतो. तेवढ्यात लगबगीनं दार उघडून गृहलक्ष्मी माझ्याजवळ येते. माझ्यावरचा केरकचरा झाडून टाकते. शीतल पाण्याच्या सड्याने माझी आंघोळ घालते. मग माझ्या हृदयावर मंगलसूचक रांगोळी काढते. स्वस्तिक रेखते. या प्रतीकाचा खोल अर्थ लावणारा एखादा केशवसुत येतो आणि म्हणतो, 

                   'साध्याही विषयात आशय किती मोठा कधी आढळे            

             मी एक खेड्यातील घराचे अंगण आहे, म्हणून मी भाग्यशालीच म्हटलो पाहिजे. कारण मी जर शहरातील घराचे अंगण असतो तर मधुकर केचे आपल्या 'आंगण'या लेखात लिहितात त्याप्रमाणे माझ्याजवळ कसली तरी विलायती फुलावळ कागदी चेहऱ्यानं उभी असती. ऊन पाण्यानं काळवंडलेला एखादा मुर्दाड झोपाळा तिथं बिनपोराच्या व्यथेत असल्यासारखा स्वतःशीच झुलत असता. निर्जीव कळा असलेली काही रोपटी असती. सारं काही आखीव बंदिस्त असतं. जीवनाच्या खुणा किंवा खेळकरपणाच्या कळा नसत्या. माझ्या सभोवताली घातलेली एक कंपाउंडी भिंत असती. तिच्या उग्र दराऱ्यानं माझा थरकाप झाला असता. फाटकाजवळील पाटीवर 'कुत्र्यांपासून सावध' (जणू येथे माणसे नव्हेत तर कुत्रेच राहतात) 'येता जाता फाटक लावून घ्यावे इत्यादी वाक्ये लिहिलेली असती आणि त्यामुळे माझ्या डोळ्यातील स्वागताचा भावच ओसरुन गेला असता. या सूचनांमागील 'कृपया' या शब्दालाही क्रूररुप प्राप्त झाले असते. 

                मी चाळीतील अंगण झालो नाही याबद्दल देवाला शतशः धन्यवाद. चाळीतील इमारतींना वर्षोवर्षी रंग नसतो, त्या वय गेलेल्या खप्पड दिसतात आणि त्यातून आंगण तर आणखीनच बेवारस. जवळ पैसा नसल्यामुळं किंवा तो असूनही सरकारनं बंदी केल्यामुळं बांधता न आलेली जागा म्हणजे चाळीचं आंगण. त्यावर शेवाळ पसरणं, ते निसरडं राहणं व घातमानाप्रमाणे धूळ चिखल इत्यादी असणं हेच त्याचं नशीब, बरे झाले देवा शहाचे अंगण नाही झालो नाहीतर गुदमरुन गुदमरून असतो मेलो. 

               मी खेड्यातलं आंगण आहे म्हणून मला घरापेक्षाही जास्त मानपान आहे. कारण घरच्याचं जीवन घरापेक्षाही माझ्यातच जास्त रमते. इथे जीवनाच्या आवश्यकतेतून भोळ्याभाबड्या सौंदर्याच्या व पावित्र्याच्या कल्पनेतून माझं रुप घडलं आहे. माझं आवार एवढं मोठं आहे की घरात न मावणारे सारे सामान मी सहज सामावून घेतो. घरात न मावणाऱ्या धान्याच्या कणग्या, मोडलेला छकडा, इंधनाची रास, अंग धुवायचा भला मोठा गोटा, तखतपोस हे सारं माझ्या हक्काचं आहे. घरातल्या चिल्यापाल्यांना घरातल्यापेक्षा माझ्याजवळच खेळणं बागडणं अधिक आवडतं.शाळेत जाणारी पोरं असली तरी त्यांच्या पायांचा मुक्काम घरापेक्षा माझ्याजवळच जास्त असतो. गंगोनीचा पाला चिरडून त्याच्या रसात न्हालेल्या पाट्या माझ्याजवळच उन्ह खात पडलेल्या असतात. एखादं गोणपाट टाकून पोरगा येएक बे रटत असतो. त्याचा नंदीबैल, विटीदांडू किया बाराखडीचं पुस्तक माझ्याजवळच पडलेलं असतं. ढोरं तिकडे गोठ्यात बांधायची असतात वासर, कालवडी, वगारं माझ्याजवळच्या खुंट्याला किंवा डाळिंबाच्या बुडखाला बांधलेली असतात. 

                माझ्याजवळ बसण्याच्या वेळाही ठरलेल्या नाहीत. प्रत्येकजण माझ्याकडे धाव घेतो. लेकरू न्हाणायचं आहे, मग मांडा पाट अंगणात. उन्हात जेवायचं- चांदण्यात जेवायचं- चला आंगणात. केस विचरायचे तर मग कुणाची चोरी थोडीच आहे, विंचरा अंगणात. अशी माझ्या घरची संस्कृती माझ्यातच नांदते.  

               'आमच्या अक्षताचं लग्न आहे हे माझ्याजवळ वाळणाऱ्या शेवयांच्या प्रमाणावरून साऱ्या गावाला माहीत झालं होतं. ऊन उतरल्यावर शेजारपाजारच्या मैत्रिणी अलश्रीला मदत करायला यायच्या. सारी कामं हसतखिदळत आणि गप्पागोष्टीत केव्हा उरकायची ते त्यांना कळत देखील नसे. मी मनातून आनंदलो होतो. लग्नाच्या दिवशी सारे सजले तसं मलाही शृंगारलं होतं. तोरणं लाचली होती, मांडव उभारला होता, विजेची रोषणाई केली होती. मी मंगलवाद्यांनी निनादून गेलो होतो. माझ्या मांडीवर पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. सासरी जायला निघालेली अक्षता आपल्या आईवडिलांना बिलगली. आजी आजोबांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू उतरले. त्यावेळी माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं.. 

                माझ्या मांडीवर अख्ख्या गावाचीच संस्कृती नांदते. गोंधळी असो की शाहीर असो, माझ्याजवळ येऊनच गात असतो. बिल्लोरवाला येतो आणि बांगड्यांची पाटी मांडून माझ्याजवळ बसतो. हे शेजारीपाजारी कसं कळत कुणास ठाऊक पण साऱ्या सुवासिनी लगेच आतुरतेनं बिल्लोरवाल्याभोवती माझ्याजवळ गोळा होतात. मण्यारीवाल्याचंही तसंच.

               एखाद्या सायंकाळी माझ्या मांडीवर खेळणाऱ्या आपल्या लेकराकडे व आकाशातल्या सूर्याकडे पाहून त्याची आई मनात म्हणते, सूर्यनारायणा, अंगणात खेळणाच्या माझ्या लेकराला आईच्या मायैहून कोमल करांनी गोंजारा, सांभाळा, तिच्या डोळ्यातली भाषा मला वाचता येते. 

             माझ्या मांडीवर जाई-जुई फुलल्या असतात. सायंकाळी उदास चेहऱ्यानं घरची नवविवाहिता माझ्याजवळ येते आणि अस्पष्ट सूरात गुणगुणते, 'अंगणात फुलल्या जाई जुई, जवळी ग पती माझा नाही.' आमच्या शेजारच्या घरालाही माझ्यासारखेच एक आंगण आहे. त्यानं मोठ्या हौसेने एक पारिजात जोपासला आहे. त्या पारिजातकाला पाहून मला नेहमी रुक्मिणी सत्यभामेची आठवण होत असते आणि कुणा कवीच्या ओळी माझ्या ओठावर येतात. फुलला पारिजात दारी फुले का पड़ती शेजारी ***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा