epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

एका क्रांतिकारकाचे मनोगत '

                          एका क्रांतिकारकाचे मनोगत 

 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार' 

अखेर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हा कारागृहातील एकांतवास आम्हाला पत्करावा लागला. अनेक शहाण्या लोकांनी आम्हाला वेडे ठरवले. पण ज्याच्या अंतःकरणात मातृभूमीविषयीचे नितांत प्रेम आहे त्याच्या भावना या क्षुद्र स्वार्थी लोकांना कशा कळणार?

                  क्रांतिकार्यात भाग घेण्याचे मी निश्चित केले तो क्षण मला आठवतो. क्रांतिकारकांच्या मेळाव्यात मी गुप्ततेची शपथ घेतली तरीही मी क्रांतिच्या मार्गातील संकटांना तोंड देऊ शकेनच अशी क्रांतिकारकांना खात्री नव्हती. त्यांनी माझ्या कठोर परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांत मी उत्तीर्ण झालो. माझा क्रांतिकारक गटात समावेश झाला. केवढा आनंद झाला मला त्यावेळी!

              माझ्या या निर्णयाची घरच्यांना कल्पनाच नव्हती. पण घरी माझे रात्री-अपरात्री येणे आणि अबोल राहणे यावरून त्यांना शंका येत असे. 'भलत्या भानगडीत पडू नकोस' असे घरच्यांनी मला वारंवार बजावले होते. तरीही मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. बंदिस्त भारतमातेच्या मुक्ततेचे वेड मला महत्त्वाचे वाटले.

              एकदा हे कार्य स्वीकारल्यावर मी मोहाचे आणि मायेचे सर्व धागे तोडून टाकले. क्रांतिकार्य ही एकच धुंद होती. स्वातंत्र्याचे ध्येय ताऱ्यासारखे डोळ्यापुढे होते. ते गाठण्यासाठी बेहोश होऊन काट्यांच्या आणि अग्नीच्या रस्त्यावरुन आम्ही धावत होतो. संकटांना तुडवीत होतो.  

                आणि ती अशुभ रात्र आली. कुणीतरी पोलिसांना बातमी दिली. आम्ही सगळेच पकडलो गेलो. पोलिसांनी बेदम मारले पण आमच्या तोंडून शब्दही बाहेर पडला नाही. न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हाही आम्ही 'वंदे मातरम्' हाच जयघोष केला.                           तुरुंगातही आम्ही क्रांतिचाच जयजयकार करीत होतो. आमच्या हातापायात बेड्या घातल्या होत्या पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आमच्या देशासाठी आम्ही काय करतो आहोत याचा आम्हाला अभिमान होता. माझा देश पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यासाठी आम्ही साम्राज्यवाद्यांना परोपरीने सांगून पाहिले पण आम्ही सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत असा त्यांनी समज करुन घेतला होता. हा समज आम्ही कृतीने दूर केला होता

                    आमचा आवेश अथांग होता. आम्ही जाणूनबुजून हे सतीचे वाण स्वीकारले होते. स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी आम्ही बेहोश झालो होतो. ना आम्ही मागे वळून पाहिले, ना विश्रांतीसाठी थांबलो ना संसार प्रेम कीर्ती संपत्ती यांचे धागे आम्हाला आमच्या ध्येयापासून दूर करु शकले. आम्हाला दिसत होता फक्त एकच तारा आणि तो म्हणजे स्वातंत्र्य । 

        हीच भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'माझे मृत्युपत्र' या कवितेतून हीच भूमिका, आणि हेच तत्त्वज्ञान तात्त्विक अधिष्ठानावर मांडताना म्हटले आहे की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने लब्ध- प्रकाश इतिहास-निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुध्याचि वाण धरिले करि हे सतीचे

                  सावरकर म्हणतात की आम्ही तीनच भाऊ आहोत, आणि सर्वांनी देशासाठी समर्पण केले आहे. सात भाऊ असतो तरी हेच केले असते. राष्ट्रासाठी त्याग केल्यानेच आम्ही कृतार्थ झालो आहोत. यातून कवीने माझेच नव्हे तर साऱ्याच क्रांतिकारकांचे मनोगत व्यक्त केले आहे. 

                स्वातंत्र्याचा ध्वज फडकविण्यामुळे आमच्या हातात बेड्या पडल्या. मातृभूमीचे स्तवन केल्यामुळे आमच्या गळ्याला फास लागला. आमच्या राष्ट्राची आम्ही पूजा केली म्हणून आम्ही अपराधी ठरलो. पारतंत्र्यात राहणाऱ्या शहाण्यांनी आम्हाला वेडे ठरवले. पण आम्हाला त्याची खंत नव्हती कारण आम्हाला ठाऊक होते की, आमच्या या बलिदानातून, आमच्या पेटलेल्या चितेतून भावी क्रांतीचे नेते उदयाला येणार आहेत. या

                 अंधारकोठडीत विचारमग्न असताना माझ्या डोळ्यासमोर उभी राहते ती माझी आई। माझा निरोप घेताना तिच्या डोळयात असू आले. पण तिने ते ताबडतोब पुसून टाकले आणि क्रांतिकारकाच्या आईला शोभेल असा आशीर्वाद दिला..

                 आमचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारक तयार होतील. आणि आम्ही गात राहू - कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या उजालातून भावी क्रांतीचे नेते.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा