epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

ज्योतिषाची परीक्षा

             ज्योतिषाची परीक्षा

       : बऱ्याच दूरवरून एक ज्योतिषी आशेने महाराजांच्या भेटीसाठी आला होता. कोल्हापूरच्या काही बड्या ऑफिसरांची व त्यांची ओळखही होती. तो प्रत्यक्ष भेटण्यापूर्वीच त्याची वर्दी महाराजांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली होती; त्यामुळे त्याच्या भेटीची तयारी, अर्थात मनाची तयारी झालीच असणार. महाराजांचा देवाधर्मावरचा विश्वास गेलेला नव्हता, पण त्यांची अंधश्रद्धा मात्र नव्हती. त्यांनी आपली विवेक बृद्धी अद्याप गहाण टाकलेली नव्हती. भट सांगेल ते प्रमाण या अंधश्रद्धेच्या पलीकडे ते गेलेच होते. उलट या दलालांचा तिटकारा आल्यामुळेच त्यांनी मराठा पुरोहितवर्ग निर्माण केला होता, आणि हेही तितकंच खरं की ते नास्तिकही नव्हते. या त्यांच्या मानसिक आंदोलनाच्याच दरम्यान ज्योतिषाचे आगमन झाले होते. ज्योतिषी येताच त्यांनी त्याला दुसरे दिवशी निवांत भेट घेण्यास सांगितले. तोही दुसरे दिवशी आपली भेट होणार या आशेने परत गेला. आल्यासारखी लवकर भेट होणार म्हणून त्याला साहजिकच आनंद झाला. महाराजांनी ज्योतिषाला दुसरे दिवशी यायला सांगितले आणि तो गेल्याबरोबर लागलीच म्हैसकर फौजदाराला बोलावून सांगितले, की तो ज्योतिषी दुसरे दिवशी माझी गाठ घ्यायला येऊ लागला की त्याला परस्पर अटक कर आणि पोलिस स्टेशनवर नेऊन ठेव. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे म्हैसकर फौजदारांनी त्याला अटकेत ठेवले. दुसरे दिवशी पुनः त्याला सोनतळीस आणायचा हुकूम दिला. महाराजांचे दर्शन घडताच तो 'काही एक गुन्हा केला नसताना मला निष्कारण अटक केली आहे. आपण न्याय दिला पाहिजे.' म्हणून रडू लागला. त्यावर महाराज ज्योतिषाला म्हणाले, "तुम्ही तर दुसरे दिवशी येणार म्हणत होता. तुम्हाला हे अटकेचं माहिती असतं तर, तुम्ही तशी कबुली कशी दिली असती? तुम्हाला तुमचे भविष्य समजायला पाहिजे होतं. महाराजांनीच हा सर्व प्रकार केल्याचे पाहून तो हिरमुसल्यासारखा झाला व आपल्या गावाला जातो म्हणून नमस्कार केला. त्यावर आपल्याचमुळे ज्योतिषाला त्रास झाला; म्हणून त्याला शंभर रुपये द्यायला दिवाणजीला सांगितले. महाराजांचा थट्टेखोर स्वभाव जाणून तो म्हणाला, “एकूण माझ्या नशिबात शंभर रुपये होते, हेच खरं.' " त्यावर लगेच जवळच्या हुजऱ्याला म्हणाले, 'घे रे हिसकून. आण इकडं, त्याचं नशीब आताच पाहूया. शंभराचं आहे काय ते !" असे म्हणून तांदळाने भरलेली दोन ताटे घेऊन यायला सांगितली व त्या प्रत्येकात पाच रुपयेच पुरून ठेवायला सांगितले व मग ती दोन्ही ताटे ज्योतिषासमोर ठेवून म्हणाले, “उचल यातलं कोणचं ते." त्यानं उचललं. त्यात पाचच रुपये मिळाले. "घ्या, तुमच्या नशिबात तेवढेच होते. घ्या आणि जावा तुमच्या गावाला." महाराज म्हणाले. ज्योतिषी पूर्ण पराभूत व निराश झाला. नमस्कार करून महाराजांचा निरोप घेऊ लागला. त्या वेळी महाराजांनाच वाईट वाटले व म्हणाले, "अरे दे त्याला ५०० रुपये. जाऊ दे, बिचारा फार दूरवरून आलाय."|

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा