लम्पी आजार प्रसार कसा होतो लक्षणे कोणती,नियंत्रण व प्रतिबंध कोणते ?
लम्पी आजार प्रसार कसा होतो लक्षणे कोणती,नियंत्रण व प्रतिबंध कोणते ?
गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांना जडणारा देवीसारखा दिसणारा विषाणूजन्य आजार आहे. आजारात त्वचेवर आणि इतर भागांवर गाठी येतात. कॅप्रीपॉक्स (Capripox Virus) या देवीवर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो.
सूर्यप्रकाशात हा विषाणू निष्क्रिय होतो. मात्र ढगाळ वातावरणात असेल , अंधारे ठिकाणी आणि बाधित गोठ्यात काही महिन्यापर्यंत सक्रिय राहतो. हा आजार दमट आणि उष्ण वातावरणात जास्त प्रमाणात वाढतो.
संकरित जनावरे आणि छोट्या वासरांमध्ये आजाराची तीव्रता अधिक आणि मृत्युदरही अधिक असतो. तुलनेने देशी जनावरांच्यामध्ये या आजाराची तीव्रता आणि मृत्युदर खुप कमी असल्याचे दिसून आले आहे. गायींच्या दूध उत्पादनात भरपूर प्रमाणात घटही होते. गुरांच्या प्रजननात अडथळे येतात. त्वचेवर गाठी येत असल्याने त्वचा खराब होते.
प्रसार ः
- वाहतुकीमुळे या आजारास कारणीभूत विषाणू लांब ठिकाणापर्यंत संक्रमित होवू शकतो. आजाराचे विषाणू बाधित जनावरांच्या रक्तात किमान ५ दिवस ते २ आठवडे पर्यंत राहतात. अशा जनावरांचे रक्त शोषण करणारे किटक रोगप्रसाराचे काम करतात.
- एडीस प्रजातीच्या किटकाव्यतिरिक्त स्टोमॉक्सीस माशा आणि रिफिसेफॅलस गोचिडा पासून या आजाराचा प्रसार अधिक होतो. लक्षणे दाखवीत असलेल्या जनावरांच्या त्वचा, अश्रू, लाळ आणि शेंबुडावाटे अठरा ते वीस दिवसांपर्यंत विषाणूचे उत्सर्जन होते.
- विषाणूने प्रदूषित शारीरिक स्रावाचा प्रादुर्भाव चारा आणि पाण्यात झाल्यास त्यमधुन रोगप्रसार होवू शकतो.
- बाधीत वळूच्या वीर्यात विषाणू उत्सर्जीत होतात. त्यामुळे विषाणू प्रदूषित विर्यातून रोगप्रसार होण्याची शक्यता अधिक असते.
- बाधा झालेल्या जनावराच्या दुधात सुद्धा विषाणू उत्सर्जन होते. दुधावाटे वासरांमध्ये रोगप्रसार होतो.
- माणसात याचा प्रसार होत नाही. तरी दूध १००°तापमानावर उकळून प्यावे.
लक्षणे:
संक्रमण झाल्यानंतर विषाणू साधारणतः २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये वास्तव्य करतात. त्यानंतर ते शरीराच्या इतर भागातही संक्रमित होतात. शरीराच्या विविध भागात विषाणू संसर्गाने वेदनादायी आग निर्माण होतो. जनावरे अत्यवस्थ होतात.
- विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बाधित जनावरे साधरणतः १ ते ५ आठवड्या नंतर लक्षणे दाखविण्यास सुरुवात करतात. सर्वप्रथम डोळ्यातून अश्रू आणि नाकातून शेंबूड वाहण्यास सुरुवात होते. डोळ्यांवर चिपडे येतात. खांदा आणि मांडीतील लसिका ग्रंथीवर सुज येते.
- ४०.५ अंश सेंल्सिअसपेक्षा जास्त ताप येतो. ताप एक आठवड्यापर्यंत राहू शकतो.
- दूध उत्पादन अचानक घट होते.
- ताप आल्यानंतर ४८ तासांत त्वचेवर दहा ते पन्नास मिलिमीटर परिघाच्या गाठी तयार येतात.
- या गाठी एकट्या, गोलसर, फुगलेल्या, टणक आणि दाह करणाऱ्या असतात. अशाच गाठी पचनसंस्था, श्वसनसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या विविध शरीराच्या भागगात दिसतात. त्यात पूसारखे द्रव्य साठते.
काही काळानन्तर गाठी छोट्या आणि कमी होत जातात. त्या ठिकाणी डाग तयार होतात. व्रणाच्या सभोवताली खपल्या तयार होतात.
- तोंड आणि नाकाच्या श्लेष्म त्वचेवर डाग दिसतात. पू मिश्रित शेंबुड दिसून येतो. लाळ जास्त प्रमाणात गळत असते
- क्वचित डोळ्यांमध्ये सुद्धा डाग तयार होतात. त्यामुळे जनावर अंध बनू शकते.
- बाधित जनावरांत फुफ्फुसाची आग, कासेची आग आणि पायावर सूज दिसून येते.
- गुरे लंगडतात, चारा कमी खातात, रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.
- वळू काही काळसाठी किंवा नेहमीसाठी नपुंसक बनू शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भ पडून जातो. संसर्गजन्य गायी कित्येक महिने फळत नाहीत.
- बाधित जनावरे साधरणतः दोन ते तीन आठवड्यात बरी होतात. मात्र बरी झालेली जनावरे पुढील चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत विविध स्त्रावांत विषाणू उत्सर्जन सुरूच ठेवतात.
नियंत्रण आणि प्रतिबंध ः
- आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक मात्र प्रभावी योजना आहे.
- सर्व गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांचे दरवर्षी नियमित लसीकरण करून घ्यावे..
- सध्या आपल्या देशात या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शेळ्यांच्या देवीची लस वापरतात. .
- सामान्यतः लसीची मात्रा प्रती जनावर १०३ टी.सी.आय.डी.५० असावी. मात्र उद्रेक तीव्र असल्यास प्रती जनावर १०३.५ टी.सी.आय.डी.५० एवढी मात्रा द्यावी.
- आजाराच्या उद्रेका दरम्यान जनावरांची वाहतूक इतरत्र करू नये. तसेच बाजारात खरेदी - विक्री सुद्धा करू नये.
- संसर्गित जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. त्यांचा उपचार त्याच ठिकाणी करावा.
- जनावरांवर किटक, माशा आणि गोचिडांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. त्यासाठी किटक रिपेलंट आणि किटकनाशकांचा वापर करावा.
- गोठे आणि प्रक्षेत्र किटकमुक्त असावेत..
- लसीकरणानंतर जनावरांना किमान अठठावीस दिवस चरण्यासाठी सोडू नये.
- गोठ्याची आणि परिसराची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करत रहावे.
- प्रक्षेत्र आणि गोठ्यात जैवसुरक्षेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी.
No comments:
Post a Comment